हिस्सार : भारताच्या हरयाणा राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या ३,०१,२४९ (२०११). हे नवी दिल्लीच्यापश्चिमेस १६४ किमी.वर वसलेले आहे. हे नॉर्दर्न रेल्वे झोनचे प्रमुखस्थानक असून लोहमार्ग व रस्त्यांनी अन्य शहरांशी जोडलेले आहे.येथे विमानतळ आहे. जस्तविलेपित लोखंड उत्पादनाचे हे शहर भारतातील प्रमुख केंद्र असून येथील पोलाद उद्योगामुळे यास ‘सिटी ऑफ स्टील’ म्हणतात.
दिल्लीचा राजा फीरूझशाह तुघलक (कार. १३५१–८८) याने१३५६ मध्ये हे वसविले. हे शहर चौदाव्या शतकात तुघलक व तद्नंतर काही काळ सय्यद व लोदी घराण्यांच्या अखत्यारीत होते. १३९८ मध्ये तैमूरलंगाने यावर स्वारी केली होती. सोळाव्या शतकात हे मोगलांच्या ताब्यात होते. १८०१ मध्ये हे शिखांच्या व तद्नंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. १८५७ च्या बंडाच्या वेळी या शहरातील ११ यूरोपीय व काही स्थानिक ख्रिश्चन मारले गेले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे पंजाब राज्यात व १९६६ मध्ये हरयाणा राज्यनिर्मितीनंतर हरयाणा राज्यात समाविष्ट झाले आहे.
येथे १८६७ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. शहरात मोटारगाडी दुरुस्ती व सुटे भाग विक्री हे उद्योग विकसित झाले आहेत.येथे शेती व पशुवैद्यकीय संशोधनकेंद्र असून येथील नॅशनल रिसर्चसेंटर ऑन इक्वाइन्स, सेंट्रल शिप ब्रीडिंग फार्म, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोज या संस्था महत्त्वाच्या आहेत. येथे चौधरी चरणसिंग हरयाणा ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, गुरू जांभेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, लाला लजपतराय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटेरिनरी अँड ॲनिमल सायन्सेस, छपाई तंत्रज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणाची जीजेयूएस्टी संस्था इ. उच्च शैक्षणिक संस्था आहेत. येथील नेहरू ग्रंथालय, लाला लजपतराय नगर ग्रंथालय इ. प्रसिद्ध आहेत. शहरात सीमा सुरक्षा दलाच्या व भारतीय संरक्षण दलाच्या तेहेतिसाव्या तुकडीचे मुख्यालय आहे.
येथील फीरूझशाह पॅलेस कॉम्प्लेक्स, गुजरी महल, सेंट थॉमस चर्च, गुरुसिंग सभा श्री गुरुद्वारा, बनहोरी देवी मंदिर, ओ. पी. जिंदल नॉलेज सेंटर, मधुबन पार्क, डिअर पार्क इ. प्रवाशांची आकर्षणे आहेत.
गाडे, ना. स.
“