हिल्टन, जेम्स : (९ सप्टेंबर १९००–२० डिसेंबर १९५४). इंग्रज कादंबरीकार. लँकाशरमधील ली येथे जन्म. त्याचे वडील जॉन हिल्टन हे एका शाळेत शिक्षक होते. ख्राइस्ट्स कॉलेज, केंब्रिज येथेशिकत असतानाच तो लिहू लागला. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी त्याने लेखन केले कथाकादंबऱ्यांची समीक्षा केली. कॅथरिन हरसेल्फ ही त्याची पहिली कादंबरी १९२० मध्ये प्रसिद्ध झाली तथापि तिला म्हणावे तसेयश मिळाले नाही. त्याच्या कादंबऱ्यांपैकी लॉस्ट होरायझन (१९३३), गुडबाय मि. चिप्स (१९३४) आणि रँडम हार्व्हिस्ट (१९४१) ह्या कादंबऱ्या विशेष लोकप्रिय झाल्या. त्याची लॉस्ट होरायझन ही कादंबरी खूप गाजली. १९३५ पासून हॉलिवुडच्या चित्रपटव्यवसायाशी त्याचासंबंध आला. लॉस्ट होरायझन मध्ये शांग्री-ला ह्या तिबेटमधील एका ठिकाणी एक इंग्रज माणूस नंदनवनाचा अनुभव कसा घेतो, ह्याची कथा आहे. शांग्री-ला हा शब्द दूरस्थ, यूटोपियन भूमीसाठी ह्या कादंबरीमुळे आला. गुडबाय मि. चिप्समध्ये एका वृद्ध, मरणोन्मुख शिक्षकाच्यास्मृती आहेत. रँडम हार्व्हिस्टमध्ये स्मृती गमावून नंतर ती परत आलेल्या माणसाची कहाणी आहे. ह्या सर्व कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आणि ते अत्यंत यशस्वी ठरले. 

अमेरिकेतील लाँग बीच, कॅलिफोर्निया येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.