हिमालयातील शैलसमूह : भौगोलिक दृष्ट्या हिमालयाचे पंजाब, कुमाऊँ, नेपाळ व आसाम असे विभाग केले जातात. अर्थात हिमालयाचे लांबीला अनुसरून तीन समांतर क्षेत्रविभागांतही वर्गीकरण करतात. हे तीन क्षेत्रविभाग एकमेकांपेक्षा पर्वतीय घटकगुणांच्या बाबतींत अगदी वा स्पष्टपणे भिन्न आहेत. कायम हिम-बर्फ असणाऱ्या उंचीपेक्षा अधिक उंच पर्वतशिखरे असलेला सर्वांत आतील बृहत् हिमालय (किंवा हिमाद्री), याहून कमी उंचीचा मधला हिमालय (किंवा शिवालिकटेकड्या) आणि बाहेरील हिमालय (किंवा शिवालिक पर्वतरांगा) हे तीन क्षेत्रविभाग होत. भूवैज्ञानिक संरचना व वय या दृष्टीने पाहता हिमालयाचे पुढील तीन स्थूल स्तरवैज्ञानिक पट्ट्यांत वा क्षेत्रविभागात विभागणीकेली जाते : (१) उत्तरेचे वा तिबेटी क्षेत्रविभाग सर्वांत उंच पर्वतीय भागापलीकडे पसरलेला आहे. या क्षेत्रविभागात विपुल जीवाश्म (शिळारूप झालेले जीवावशेष) असलेल्या सागरी गाळाच्या खडकांच्या अखंड माला आहेत. यातील खडकांची वये सर्वांत आधीचा पुराजीव महाकल्पापासून(सु. ६० कोटी वर्षांपूर्वीपासून) ते इओसीनपयर्र्ंतच्या (५.५ ते ३.५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या) काळातील आहेत. वायव्य टोकाजवळील हजारा व काश्मीरमधील भाग वगळता या क्षेत्रविभागातील खडक हिमाच्छादित शिखरांच्या रेषेच्या दक्षिणेकडील भागात आढळत नाहीत. (२) मध्य वा हिमालयी क्षेत्रविभागात मधला व बृहत् हिमालय येतात. हा क्षेत्रविभाग मुख्यतः स्फटिकी व रूपांतरित खडकांचा बनलेला असून यांत ग्रॅनाइट, पट्टिताश्म व सुभाजा (चपट्या थरांत सहज विभागणारे) हे खडकआहेत तसेच अतिशय प्राचीन अशापुराण महाकल्प व गणातील जीवाश्म नसलेले अवसादी (गाळ) निक्षेपही यात आहेत. (३) उपहिमालयी किंवा बाह्य क्षेत्रविभाग हा शिवालिक पर्वतरांगांशी समतुल्य असून तो जवळजवळ पूर्णपणेतृतीय संघा तील आणि मुख्यतः उत्तर तृतीय कल्पातील (सु. ३.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) नदीतील अवसादी खडकांचा बनलेला आहे [→ शिवालिक टेकड्या शिवालिक संघ]. सदर नोंदीत हिमालयातील सर्वांत जुन्यापासून सर्वांत अलीकडच्या काळातील शैलसमूहांची माहिती थोडक्यात दिली आहे. 

 

आर्कीयन : कँब्रियन-पूर्व म्हणजे ६० कोटी वर्षांहून अधिक जुन्या खडकांपैकी पट्टिताश्म व सुभाजा या रूपांतरित खडकांना उद्देशून ⇨आर्कीयन संज्ञा वापरतात. समुद्राच्या तळावर साचलेल्या गाळांचे व लाव्ह्यांचे थर आणि त्यांच्यात घुसलेल्या मुख्यतः ग्रॅनाइट या अग्निज खडकांच्या राशी यांच्यावर भूकवचाच्या हालचालींचा परिणाम होऊन व त्यांचे रूपांतरण होऊन आर्कीयन पट्टिताश्म व सुभाजा तयार झालेले आहेत. मध्य व हिमालयी क्षेत्रविभाग ग्रॅनाइट, ग्रॅन्युलाइट, पट्टिताश्म, फायलाइट, सुभाजा इ. स्फटिकी वा रूपांतरित खडकांचा बनलेला असून यांपैकी पुष्कळ पट्टिताश्म अंतर्वेशी शिलारस घुसून तयार झालेले आहेत. याचा अर्थ त्यांचे वय बरेच कमी आहे व ते सिद्ध झालेले नाही. काश्मीर हिमालयातील अंतर्वेशी ग्रॅनाइट असलेले तथाकथित मूलभूत पट्टिताश्मांचा थोडाच भाग आर्कीयन काळातील आहे. येथे कृष्णाभ्रक ग्रॅनाइट, हॉर्नब्लेंड ग्रॅनाइटव टुर्मलीन (तोरमल्ली) ग्रॅनाइट आहेत. काश्मीर ते आसामपर्यंत सर्वाधिक आढळणारा हिमालयी पट्टिताश्म पुष्कळदा पृषयुक्त असून त्यांत ५ ते१० सेंमी. लांबीचे ऑर्थोक्लेज खनिजाचे बृहत् स्फटिक असतात. यानंतर कृष्णाभ्रक सुभाजा हा वरचेवर आढळणारा खडक आहे. या खडकांमध्ये विपुल प्रमाणात भित्ती, खोड व सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या अल्पसिकत राशी यांची अंतर्वेशने (घुसण्याची क्रिया) झालेली आढळतात. पट्टिताश्मी खडक उत्तर व वायव्य भाग, झास्कर पर्वतरांगव गीलगिट, बाल्टिस्तान आणि लडाख यांच्या पलीकडील भागांत आढळतात. मात्र काश्मीर खोऱ्याच्या दक्षिणेस ते गौण प्रमाणात आढळतात. [→ आर्कीयन]. 

 

वरील पट्टिताश्म व सुभाजा यांच्याएवढ्या किंवा अधिक वयाच्या सर्वांत प्राचीन रूपांतरित अवसादी खडकांच्या अवसादी आर्कीयन प्रणालीलाधारवाडी संघ म्हणतात. हिमालय पर्वतरांगांमधील पूर्व व उत्तर (सिमला) भागांत हे खडक आढळतात. आर्कीयन सुभाजांच्या वर असलेल्या जुटोग, सलखला व चैल या मालांमध्ये आणि काझीनाग येथे धारवाडी खडक आढळतात. उत्तर हजारा, इंडस कोहिस्तान, गीलगिट, लडाख व झास्कर पर्वतरांग ते सतलज नदीच्या पलीकडेपर्यंतच्या क्षेत्रांत हे आढळतात. यांमध्ये पाटीचे दगड (स्लेट), फियलाइट (पुष्कळदा ग्रॅफाइटयुक्त), सुभाजा, क्वार्ट्झाइट स्फटिकी चुनखडक व डोलोमाइट हे खडक आहेत. 

 

स्पिती ही सतलजची उपनदी असून तिचे खोरे कांग्रा जिल्ह्याच्या ईशान्य पर्वतरांगांमध्ये येते. येथे पुराजीव (सु. ६० ते २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व मध्यजीव (सु. २३ ते १४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील शैलसमूहांचा बहुतेक सर्व क्रम उघडा पडला आहे. यात कँब्रियन ते क्रिटेशसपर्यंतचे (सु. ६० ते १४ कोटी वर्षांपूर्वीचे) सर्व भूवैज्ञानिक संघ आहेत. अनेक भूवैज्ञानिकांनी या शैलसमूहांचे सविस्तर अध्ययन केले आहे. अशा प्रकारे वरील शैलसमूह व विपुल जीवाश्म यांच्यामुळे स्पिती खोरे हे भारतीय भूविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अभिजात क्षेत्र आहे. 

 

मध्य हिमालयाच्या या भागात अतिशय वलीभवन झालेले अभ्रकी सुभाजा, पाटीचा दगड व फियलाइट हे खडक असून त्यांना वैक्रितासंघ हे नाव आहे. शेल व क्वार्ट्झाइट हे या संघातील प्रमुख खडकआहेत. याच्यावर कँब्रियन (सु. ६० ते ५० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील शैलसमूह वसलेले आहेत. कँब्रियन संघाचे खडक आर्कीयन पट्टिताश्मां-खाली आहेत. संपूर्ण कँब्रियन संघातील तीव्र वलीभवन झालेल्या व विक्षुब्ध गाळाच्या थरांची जाडी प्रचंड आहे. स्पिती कँब्रियन गटाच्या वरील सु. ३५० मी. जाडीच्या भागात प्राण्यांचे विपुल जीवाश्म आढळतात. उदा., ट्रायलोबाइट, ब्रॅकिओपॉड, एकायनोडर्म, क्रिनॉइड, शंखधारी इत्यादी. कँब्रियन शैलसमूहातील पाटीच्या खडकांमधील पिंडाश्माची उत्पत्ती भूवैज्ञानिक अध्ययनाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे व ते क्रिटेशस या काळातील शैलसमूहात आढळतात. 

 

जीवाश्मयुक्त कँब्रियन खडक काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पर्वतांवर झेलमच्या उत्तरेस मोठ्या प्रमाणात आढळतात. हुंदवोरच्या पुराजीव द्रोणीच्या उत्तरेस या खडकांचा रुंद अनियमित पट्टा आहे. उदा., पीरपंजाल, किशनगंगा खोरे व हजारा येथे डोग्रा स्लेट तसेच हजारा स्लेट व सिमला स्लेट. 

 

हिमालयाच्या मोठ्या भागाचे सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात व तपशील-वारपणे करावयाचे राहिले आहे. माउंट एव्हरेस्ट लगतचा भाग, तसेच हजारा-काश्मीर व सिमला-चक्रात भागाचे मानचित्रण काहीशा तपशीलाने केले आहे. गढवाल व कुमाऊँच्या पर्वतीय भागाला भूवैज्ञानिकांनी प्रसंगेविशेषीय भेट दिलेली आहे. नेपाळ-आसाम हिमालयाचा जवळजवळ पूर्ण पट्टा बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला आहे. सिक्कीममधील छोटे क्षेत्र याला अपवाद आहे. 


 

तथापि, स्पितीतील शैलसमूहांत यांशिवाय ऑर्डोव्हिसियन, सिल्यु-रियन, डेव्होनियन, कार्बॉनिफेरस, पर्मियन, ट्रायासिक, जुरासिक व क्रिटेशस या काळांतील जीवाश्मयुक्त खडक आढळतात [→स्पितीतील शैलसमूह]. यांपैकी काही शैलसमूह पुढीलप्रमाणे आहेतः काश्मीरमधील ऑर्डोव्हिसियन, काश्मीरातील व स्पितीतील सिल्युरियन, मुथ माला व चित्रळमधील डेव्होनियन, स्पितीमधील प्रॉडक्टस शेल व काश्मीरातील झेवान थर, सॉल्ट रेंजमधील प्रॉडक्टस चुनखडक, मध्य कार्बॉनीफेरस-मधील फेनेस्टेला शेल व उत्तर कार्बॉनिफेरस कालीन प्रॉडक्टस चुनखडक. [→सैंधवी पर्वतरांगेतील शैलसमूह]. 

 

पो मालेतील फेनेस्टेला शेल हे उत्तर कार्बॉनिफेरस, पिंडाश्म, ग्रिट व क्वार्ट्झाइट, चूर्णीय वालुकाश्म (स्पिरीफर जीवाश्म), प्रॉडक्टस शेल हे पर्मियन तर ओटोसेरास क्षेत्रविभाग पूर्व ट्रायासिक कालीन शैलसमूह हिमालयात आढळतात. गँगॅमॉप्टेरिस थर (पूर्व गोंडवन), प्रोटोरेटेपोरा चुनखडक (पर्मियन), सिमला व गढवाल येथील क्रोल माला (उत्तर कार्बॉनिफेरस व पर्मियन), काराकोरम व चित्रळ येथील पर्मियन वपर्मोकार्बॉनिफेरस थर हे लक्षणीय आहेत. 

 

हिमालयाच्या संपूर्ण उत्तर सीमेलगत ट्रायासिक संघाचे खडक आढळतात. यांत कॉयपर, मुश्शेलकाल्क व बुंटर या शैलसमूहांचा अंतर्भाव होतो. हजारातही ट्रायासिक खडक आढळतात. माला जोहार व चिटिचुन येथील विदेशी (एक्झॉटिक) ट्रायस समूह प्रसिद्ध आहे. स्पितीतल्याप्रमाणे काश्मीरातही ट्रायासिक निक्षेप पण कमी प्रमाणात विकसितझालेले दिसतात. 

 

जुरासिक काळातील खडक हिमालयात विविध ठिकाणी आढळतात. उदा., स्पिती, गढवाल व कुमाऊँ येथील झास्कर पर्वतरांगेत किओटो चुनखडक व स्पितीशेल या काळातील आहेत. मधील पूर्व हिमालयातील माउंट एव्हरेस्टच्या प्रदेशातील जुरासिक खडकांची माहिती माउंट एव्हरेस्ट-वरील गिर्यारोहकांच्या मोहिमांतून मिळाली आहे. गढवाल उपहिमालयातील जुरासिक खडक ताल माला होय. हजारातील स्पितीशेल व काश्मीरमधील लडाख भागात जुरासिक खडक आढळतात. सैंधवाच्या पर्वतरांगेतील शैल-समूहातही जुरासिक खडक आहेत. सिंधू नदीवरील कालबाघजवळ तसेच रोख बुडीन टेकड्या व सुरघर पर्वतरांगेत जुरासिक खडक आढळतात. 

 

स्पितीतील गिऊमल वालुकाश्म, चिक्कीम माला, चित्रळमधील हिप्प्युराइट व ऑर्बिटोलाइट चुनखडक, माला जोहार, कुमाऊँ येथील क्रिटेशस खडक, रुपशू झास्करमधील चिक्कीम माला तसेच ॲस्टर, बर्झिल व द्रास येथील क्रिटेशस ज्वालामुखी माला, लडाख व हजारा, सिंध( कार्डिटा ब्यूमाँटी थर), सैंधवी पर्वतरांगा येथेही क्रिटेशस कालीन खडक आढळले आहेत. 

 

हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या टेकड्या मुख्यतःशिवालिक संघातील खडकांच्या बनलेल्या आहेत, सुमारे ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या तृतीय संघातील शैलसमूह हा सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतच्या (पोटवार पठार) हिमालयाच्या बुटक्या पायथ्या-टेकड्यांत आढळतो. पुराजीवविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला जीवाश्मांचा समृद्ध साठा यांच्यात आढळल्याने हा संघ जगभर प्रसिद्ध झाला. या संघाचे उत्तर, मध्य व पूर्व शिवालिक असे तीन गट केले जातात. [→शिवालिक संघ]. याव्यतिरिक्त काश्मीर, सिंधू खोरे (अंतर्गत हिमालय) व जम्मू टेकड्या येथेही तृतीय कल्पातील शैलसमूह आढळतात. 

 

सिंध, बलुचिस्तान, कोहाट, पोटवार, हजारा, काश्मीर, बाह्य हिमालय, सैंधवी पर्वतरांगा इ. ठिकाणी राणीकोट, लाकी व कीर्थर या मालांमधील ⇨इओसीन कालीन खडक आढळले आहेत.ऑलिगोसीन काळातील खडक भारतात विरळाच आढळतात. ते बलुचिस्तान व सिंध येथे आढळतात. यामानाने पूर्वमायोसीन काळातील खडक पुष्कळच मोठ्या प्रमाणात सिंध, सैंधवी पर्वतरांगा, पोटवार, जम्मू टेकड्या, बाह्य हिमालय या प्रदेशांत आढळले आहेत. मध्य व उत्तर मायोसीन ते पूर्वप्लाइस्टोसीन काळातील खडक हे शिवालिक संघात येतात. प्लाइस्टोसीनहिमकालातील खडक काश्मीर (कारेवा माला), ⇨ हिमोढ,उच्च पातळीवरील नदीतटमंच येथे आढळले आहेत. 

 

पहा : भारत भूविज्ञान शैलसमूह, भारतातील हिमकाल हिमालय. 

 

संदर्भ : 1. Dey, A. K. Geology of India, New Delhi, 1968.

           2. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.

          3. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, 3 Vols., Delhi., 1965.

          4. Wadia, D. N. Geology of India, London, 1961. 

ठाकूर, अ. ना.