हिब्रू लिपि : हिब्रू लिपीचा अंतर्भाव साधारणतः सेमिटिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिपिसमूहात केला जातो. वर्णमालांचा वापर करणाऱ्या लिप्या सेमिटिक राष्ट्रांमध्ये आजही वापरल्या जातात. या लिपिसमूहाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती साहजिकच हिब्रू लिपी-नेही अंगीकारली आहेत. या लिपितील वर्णमाला केवळ व्यंजने व्यक्त करणाऱ्या चिन्हांनी बनलेली आहे. तिच्यातील व्यंजने अर्थवाहक असतात. स्वर-चिन्हे असलीच, तर ती केवळ व्याकरणगत रूपे पुरविण्याचे दुय्यम काम करतात. 

 

सेमिटिक लिपी चे दोन मुख्य प्रकार मानले गेले आहेत : (१) नॉर्थ सेमिटिक, (२) साऊथ सेमिटिक. यांपैकी नॉर्थ सेमिटिक लिपीला प्राचीन सेमिटिक लिपीचा दर्जा दिला जातो कारण या लिपीत अत्यंत प्राचीन लेख लिहिलेले सापडतात. हे स्मारक लेख फिनिशिया या प्राचीन भूमीवर सापडले असल्याने नॉर्थ सेमिटिक लिपीला फिनिशियन (phoenician) लिपीचा दर्जा दिला जातो मात्र या विचारांचे समर्थन होऊ शकत नाही कारण इ. स. पू. नवव्या शतकाच्या आसपास केवळ फिनिशियनच नव्हे, तर इतर लिप्याही विकसित होत होत्या. यांमध्ये काननाइटिक आणि ॲरेमाइक या दोन लिप्यांचा समावेश आहे. यांतील ॲरेमाइक ही लिपी सर्वांत दूर पसरलेली होती. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात ॲरेमाइक लिपी निअर ईस्टच्या बऱ्याच भागात वापरली जात होती. तिचे स्वरूप बरेचसे एकसंध (होमोजीनिअस) असे होते. त्यानंतर मात्र, निअर ईस्टमध्ये माजलेली राजकीय दुफळी, त्यामुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या जमाती, त्यांच्यातील राजकीय व सांस्कृतिक भेद या सर्वांचा परिणाम ॲरेमाइक लिपीवरही झाला. ती अनेक तुकड्यांत विभागली गेली. त्यांतील प्रत्येक तुकडा आपल्याच पद्धतीने विकसित होत गेला. या सर्वांतून बऱ्यापैकी लक्षवेधी पद्धतीने विकास पावलेल्या ॲरेमाइकच्या दोन शाखा म्हणजे (१) हिब्रू लिपी व (२) पामिरीन लिपी. 

 

हिब्रू लिपी ही ज्युविश, स्क्वेअर ब्लॉक लिपी (चौरसाकृती चिन्हांची लिपी) अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. हिब्रू, ज्युविश, यिद्दिश, लदिन आणि जुदिओ या अरेबिक भाषांत हिब्रू लिपीचा वापर केला जातो. हिब्रू लिपी दोन स्वरूपांत वापरली जाते. (१) मूळची प्राचीन हिब्रू लिपीजी पॅलिओ हिब्रू म्हणून ओळखली जाते. ही लिपी बदललेल्या रूपातसुमेरी लिपीमध्ये जतन करून ठेवली आहे. आधुनिक स्क्वेअर ही हिब्रूलिपी म्हणून ओळखली जाते. ॲरेमाइक लिपीचे शैलीदार पद्धतीने घडविलेले रूप म्हणजे या लिपीतील वर्णमाला होय. हिब्रू अक्षरे लिहिण्याच्या वेगवेगळ्या शैली–आधुनिक भाषेत फॉन्ट्स–अस्तित्वात आहेत. (२) कर्सिव्ह हिब्रू या नावाचीही एक लिपी प्रचलित आहे. जीस्थळकाळानुसार बदलत गेली आहे. हिब्रू लिपीत एकूण २२ अक्षरे आहेत. ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. मुळात हिब्रू वर्णमाला केवळ अब्जद म्हणजे केवळ व्यंजनांची बनलेली होती. नंतर इतर अब्जदांप्रमाणे (उदा., अरेबिक वर्णमाला) तिच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरबिंदूंनी स्वर दर्शविण्याच्या पद्धती विकसित झाल्या. त्यांना हिब्रूमध्ये निगुड असे म्हणतात. रब्बिनिक प्रकारच्या हिब्रूमध्ये ही अक्षरे निर्देशित करण्यासाठी वापरली जातात. यिद्दिश लेखनपद्धती खऱ्या अर्थाने मुळाक्षरांवर आधारलेली आहे. आधुनिक पद्धतीप्रमाणे यिद्दिश आणि हिब्रू या दोन्ही लिप्यांत स्वराक्षरे वापरली जातात किंवा स्वरर्निर्देशक अक्षरे वापरून पूर्ण वर्ण लिहिण्याकडे त्यांचा कल आहे. 

 

सध्या प्रचलित असलेली लिपी स्वीकारण्यापूर्वी ज्यू आणि सॅमरिटन हे प्राचीन इझ्राएली लोक पॅलिओ हिब्रूचा उपयोग करीत असत. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात ज्यू लोकांनी ॲरेमाइक मुळाक्षरे विशिष्ट शैलीयुक्त स्वरूपात वापरायला सुरुवात केली. याउलट, सॅमरिटन्सनी पॅलिओ-हिब्रू लिपीचाच वापर चालू ठेवला. सध्याची स्क्वेअर हिब्रू लिपी ही ॲरेमाइक मुळाक्षरांचे शैलीबद्ध रूप आहे. पर्शियन साम्राज्याच्या अस्तानंतर ज्यू लोक या दोन्हीही लिपी वापरत असत. 

कुलकर्णी-जोशी, सोनल