कैथी वर्णमाला

कैथी लिपि : बंगाल-बिहारमध्ये कायस्थ (कायथ) लोक जलद गतीने लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग करीत. त्यावरून या लिपीला ‘कैथी’ (कायथी) लिपी असे नाव पडले. ही लिपी नागरी लिपीपासूनच उत्पन्न झाली आहे. या लिपीमध्ये ‘ॠ’, ‘ङ’, ‘ञ’ ही अक्षरे नाहीत.त्याचप्रमाणे ‘व’ आणि ‘ब’ या वर्णांत फरक न  दर्शविता ते सारखेच लिहिले जातात. ‘अ’, ‘ख’ आणि ‘झ’ ही अक्षरे नागरी लिपीहून भिन्न आहेत. ‘अ’ हे अक्षर लेखणी न उचलता लिहिल्यामुळे नागरी ‘श्र’ प्रमाणे दिसते आणि ‘ख’ या अक्षराचे नागरी ‘ष’ शी साम्य आहे. पूर्वी ही लिपी गुजरातीप्रमाणे शीर्षदर्शक लपेटीने युक्त होती परंतु आधुनिक काळात छपाईच्या कलेचा प्रसार झाल्यावर छपाईच्या सोयीसाठी अक्षरावरील लपेटी आता काढीत नाहीत. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पूर्वी मोडी लिपी प्राथमिक शाळेत शिकवीत असत, त्याचप्रमाणे बिहारमध्ये प्राथमिक शाळेत ही लिपी शिकवितात. या लिपीचेच मैथिली, मागधी आणि भोजपुरी असे आणखी तीन प्रादेशिक प्रकार आहेत.

संदर्भ : ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९. 

गोखले, शोभना ल.