हायरोग्लिफिक लिपि :एक प्राचीन चित्रलिपी. तिचा उगम इ. स. पू. ४००० मध्ये ईजिप्त येथे झाला. लिपी आणि अक्षरे यांचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात कलेच्या माध्यमातून या लिपीचा उगम झाला. ही लिपी समजून घेण्याचे अनेक प्रयत्न झाले पण त्यांना खरी दिशा १७९९ मध्ये मिळाली. या वेळी नेपोलियनच्या सैन्याला रोझेटा शिलालेखा चा शोध लागला. त्या शिलालेखावर हायरोग्लिफिक आणि डेमॉटिक लिपींमध्ये लिहिलेला लेख आणि त्याचा ग्रीक अनुवाद होता. या लेखावरून हायरोग्लिफिक लिपीचे वाचन शक्य झाले (१८२४). त्याचेश्रेय झां फ्रान्स्वा शांपॉल्याँ या फ्रेंच ईजिप्तविद्यातज्ञास व टॉमस यंगया ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञास द्यावे लागते. या लिपीतील प्रत्येक स्वतंत्र चिन्हाला हायरोग्लिफ असे म्हटले जाते. हायरोग्लिफ याचा अर्थ देवाचेशब्द, शब्दावयव किंवा वर्ण दाखविण्यासाठी वापरलेली आकृती वाचित्र होय. ईजिप्तमधील प्राचीन लोकांची ही औपचारिक लेखनपद्धतीहोती. या लिपीत चित्रलिपी आणि मुळाक्षरे यांचा एकत्रित वापरकेलेला दिसतो. विशेषतः धार्मिक साहित्य पपायरस आणि लाकूड यांच्यावर कर्सिव्ह (जोडून) हायरोग्लिफचा वापर करून लिहिले जाते. या कर्सिव्ह हायरोग्लिफचा उल्लेख हायरॅटिक (पवित्र देवासंबंधीचा) म्हणून केला जातो.या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील हायरॅटिकॉस या शब्दापासून झालाआहे. त्या वेळी ही लिपी फक्त धार्मिक लिखाणासाठीच वापरली जातअसे. हायरॅटिक लिपीची जडणघडण ही बरीचशी हायरोग्लिफिकसारखीच आहे. केवळ वेगाने लिहिताना, ब्रश आणि शाईने लिहिण्यासाठी जे काही थोडेफार बदल करावे लागतात, तेच इथे केलेले दिसतात. त्यामुळे कधी- कधी मूळ चित्राचा माग लागणे थोडे अवघड होऊन जाते. अक्षरांना एकमेकांशी जोडण्यासाठी काही बंधांचा वापर आणि दोन सारख्या चिन्हांमधील वेगळेपणा दाखवण्यासाठी उच्चारचिन्हांचा (डायक्रिटिकल मार्क्स) उपयोग केला जात असे. कार्यालयातील निविदा, पत्रलेखन इ. लिहिण्यासाठी या लिपीचा वापर केला जात असे. सुमारे इ. स. सातव्या शतकात कार्यालयातील कामकाजासाठी या लिपीच्या जागी डेमॉटिक लिपीचा वापर करण्यास सुरुवात झाली.

 

डेमॉटिक लिपीचा शोध इ. स. पू. ६६० मध्ये पहिल्यांदा लागला.या लिपीतील चिन्हांचा हायरॅटिक लिपीतील चिन्हांशी संबंध आहे पणतो कसा, हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. सुरुवातीच्या काळातया लिपीचाही वापर औपचारिक कारणांसाठीच केला जात असे. यालिपीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक चिन्हांच्या समूहाऐवजी त्या शब्दाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून त्यानुसार त्याच्या रूपात पर्यायी बदल केले गेले आहेत. दैनंदिन कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीला डेमॉटिक (popular) म्हटले जात असे. हा शब्द डीमॉटिकॉस किंवा डीमॉस (सामान्य जनता) या ग्रीक शब्दापासून आलेला आहे.

 

हायरोग्लिफिक या शब्दाचा अगदी तंतोतंत अर्थ लावताना शिला-लेखांवर कोरलेले लिखाण असा लावला जातो पण एकोणिसाव्या शतकानंतर या शब्दाचा अर्थ बदलला. असे कोणतेही लिखाण, ज्याच्यात चित्रांचा वापर लिपीतील चिन्हे म्हणून केला गेला आहे, त्याला हायरो-ग्लिफिक असे संबोधले जाऊ लागले. याच तर्‍हेची चिन्हे असणाऱ्यासिंधू संस्कृती आणि सुमेरियन संस्कृतीमधील शिलालेखांविषयीही त्यामुळे हायरोग्लिफिक हाच शब्द वापरला जातो. या लिप्यांच्या चित्रमय स्वरूपामुळे आता अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही लेखन पद्धतीत त्यांचा वापरकेला जात नाही. राजघराण्यातील लोकांकडून स्वतःची वैयक्तिक ओळखआणि काही विशेष घटनांची किंवा युद्धांची नोंद ठेवण्याच्या गरजेतून अशाचित्रांचे कोरीव काम केले गेले पण पुढील काळात सामान्य माणसांनीहीस्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या चित्रलिपीचा वापर केला.

 

या चिन्हांचा धार्मिक समजांशी फार जवळचा संबंध जोडलेला दिसतो. काही नकारात्मक किंवा धोकादर्शक चिन्हे ही मृत व्यक्तींच्या थडग्यांवर( ग्रेवयार्डवर), त्यांना या चिन्हातील वस्तूंनी त्रास देऊ नये म्हणून, कोरली जात असत. यांत काही व्यक्ती आणि विंचू व साप असे धोकादायक प्राणी यांचा समावेश असे. याच्या उलट काही चिन्हांना सकारात्मक दृष्टीने वापरले जात असे. यांच्यात पुष्कळदा देव, राजा, काही ठिकाणे यांचा समावेश असे. उदा., ‘देवाचा सेवक’ असा शब्द लिहायचा असेल, तरदेव शब्दाचे चिन्ह पहिल्यांदा आणि त्यानंतर सेवक अशा पद्धतीनेलिहिले जात असे. सर्व कालखंडांमध्ये ही लिपी समजू शकणारी काही ठरावीक माणसे होती.

 

हायरोग्लिफिक लिपीची लक्षणे : हायरोग्लिफिक लिपीतील बहुतांशचिन्हे ही निसर्ग किंवा विश्वातील वस्तूंचे प्रतिनिधित्व करणारी असतात. त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत करता येईल.

 

(१) लोगोग्राम : शब्द हा एकाच चित्रातून व्यक्त केला जातो. ध्वनी आणि अर्थ हे दोन्ही त्या एका चित्रातून व्यक्त केले जातात. याच्याच अंतर्गत आयडिओग्राम पण येतो. ज्याच्यात ते चित्र प्रत्यक्ष त्याचाचअर्थ व्यक्त करते किंवा काही अधिक अर्थाला अभिव्यक्त करते. उदा., एक काठीसारखे चित्र असेल, तर ते लाकूड किंवा काठी असा अर्थव्यक्त करेल. एक वर्तुळ आणि त्याच्यात एक बिंदू असे चित्र असेल, तर ते सूर्य (एक देव) अशा काही अधिक अर्थाला व्यक्त करेल.

 

(२) फोनोग्राम : ही चिन्हे ध्वनींना अभिव्यक्त करतात आणि यांचे वैशिष्ट्य असे आहे की, ते फक्त एकाच स्वनिमाचे प्रतिनिधित्व करत नसून अनेक वेळा ते एकाहून अधिक स्वनिमांचे प्रतिनिधित्व करतात (बायलॅटरल, ट्रायलॅटरल ).

 

(३) डिटर्मिनेटिव्ह्ज : हा एक असा वर्ग आहे, जो कोणत्याहीध्वनींचे प्रतिनिधित्व करत नाही पण ते एका अर्थाची अभिव्यक्ती करतात आणि शब्दांचा विच्छेद करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदा., [→ ी ? ींहे स्वनिक लिखाण ‘जाणे’ या क्रियापदाला अभिव्यक्त करते. तसेच ते शिशिर ऋतूलाही व्यक्त करते किंवा एखाद्या फळाची बी असाही अर्थ अभिव्यक्त करते.

 

ईजिप्तमधील लिखाणाच्या अभिजात काळात या लिपीतील चिन्हसंख्या ७०० होती पण पुढील काळात या संख्येत भर पडत गेली. ही लिपी साधारणतः उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. बहुतांश धार्मिक किंवा सौंदर्यवृद्धी करण्याच्या हेतूने काही वेळेला याच्याविरुद्ध दिशेने लिखाणकेले जाते. ईजिप्तमधील बहुतेक कलाविष्कार हा सममितीच्या तत्त्वावर आधारलेला असतो. मंदिरे किंवा घुमट ही दोन्ही बाजूंनी या लिपीने अलंकृत केलेली असतात. ही लिपी दगडावर कोरण्यासाठी( लिहिण्यासाठी) तिच्या कलाकारांनी छिन्नी आणि हातोडा, तर लाकूड किंवा त्यासारख्या मऊ साधनांवर लिहिण्यासाठी ब्रश आणि रंग यांचावापर केला.

 

पहा : रोझेटा शिलालेख.

 

संदर्भ : 1. Davies, Nina M. Picture Writing in Ancient Egypt, London, 1958.

           2. Diringer, David, The Book Before Printing : Ancient, Medieval and Oriental, 1983.

           3. Watterson, Barbara, Introducing Egyptian Hieroglyphs, New York, 1981.

 

 बिदनूर, जान्हवी