रोमन लिपि : यूरोपियन संस्कृतीमध्ये रोमन वा लॅटिन लिपीचे अतिशय महत्व आहे. रोमन लिपी इ. स. पू. अकराव्या शतकात सिरिया आणि पॅलेस्टाइनमध्ये नॉर्थ सेमिटिक लिपीतून उत्पन्न झालेल्या ⇨ फिनिशियन, ग्रीक आणि इट्रुस्कन या लिपिपरंपरेतून उत्क्रांत झाली. [ ⟶ सेमिटिक लिपि]. या लिपीच्या सुरुवातीच्या इ.स. पू. सहाव्या पाचव्या शतकांतील इतिहास फारच त्रुटित स्वरूपाचा आहे. या लिपीत इ. स. पू. सहाव्या शतकात लिहिलेला सर्वांत प्राचीन लेख असून तो इ. स. १९२६ मध्ये सापडला. तो उजवीकडून डावीकडे लिहिलेला असून एका सोनेरी खंजिराच्या म्यानावर कोरलेला आहे. प्रस्तुत लेख रोममधील म्युस्को पिगोरिनी येथील संग्रहालयात जतन करून ठेवलेला आहे. त्यानंतरचा शिलालेख रोमन सभागृहातील एका चौकोनी दगडी खांबावर चारी बाजूंना नांगरटी पद्धतीने उभा लिहिलेला आहे. १८९९ मध्ये तो सापडला. इ.स. पू. सातव्या शतकाचा शेवट किंवा सहावे शतक हा त्याचा कालखंड मानतात. या लेखाची लिहिण्याची नांगरटी पद्धत असून तो खराब झालेला असल्यामुळे त्यातील कित्येक शब्द निश्चित स्वरूपात वाचता येत नाहीत. तिसरा शिलालेख ‘ड्यूनॉस शिलालेख’ म्हणून ओळखला जातो. हा रोममध्ये क्विरिनलजवळ १८८० मध्ये सापडला. हा लेख तीन भांडी असलेल्या मोठ्या रांजणाच्या मध्य भागावर लिहिलेला असून त्याचा काळ इ.स.पू. चौथे शतक आहे. या लेखाची लिहिण्याची पद्धत मात्र उजवीकडून डावीकडे आहे.

इ.स.पू. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकांतील काही शिलालेख उपलब्ध आहेत तथापि इ.स.पू. पहिल्या शतकानंतरचे मात्र या लिपीतील असंख्य लेख सापडतात. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा लेख ऑगस्टसचा असून तो Monumentum Ancyranum म्हणून ओळखला जातो. त्याचा काळ इ.स.पू. ६३ ते इ.स. १४ या दरम्यानचा आहे.

वरील लेखांच्या आधाराने रोमन लिपीच्या उत्पत्तीविषयी विद्वानांनी काही मते व्यक्त केली आहेत. काहींच्या मते रोमन किंवा लॅटिन लिपीची उत्पत्ती ⇨ ग्रीक लिपीपासून झाली असावी. त्यांच्या मते लॅटिन लिपी ही ग्रीकच्या चॅलसिडिअन प्रकाराशी ‘g’  आणि ‘p’ ह्या दोन अक्षरांचा अपवाद सोडल्यास तंतोतंत जुळते. परंतु नंतर मात्र हा विचार मागे पडून ब्रील यांनी ⇨ इट्रुस्कन लिपीपासून लॅटिन लिपीची उत्पत्ती झाली, असे मत मांडले. त्यामुळे इट्रुस्कन लिपी ही ग्रीक आणि लॅटिन यांना जोडणारा दुवा आहे, असे मानण्यात आले. ज्या इट्रुस्कन लिपीपासून रोमन लिपीची उत्पत्ती झाली असे मानण्यात आले, त्या इट्रुस्कन लिपीत सव्वीस अक्षरे होती. रोमन लोकांनी त्यांपैकी एकवीस अक्षरांचा स्वीकार केला. ‘ह’ वर्णाचा उच्चार असलेली महाप्राणयुक्त अक्षरे kh, ph, th यांना त्यांतून वगळण्यात आले. वरील अक्षरांत थोडा बदल करून आकडे दर्शविण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला, असेही मत काहींनी व्यक्त केले आहे.

यांशिवाय वरील तीन अक्षरांतून आकडे तयार न होता ते स्वतंत्रपणे उभ्या-आडव्या रेघांनी तयार झाले, असेही एक मत आहे. इ.स.पू. सातवे शतक किंवा इ.स.पू. सहाव्या शतकाच्या सुरुवातीस अभिजात लॅटिन लिपी ही तेवीस अक्षरांची होती. त्यांपैकी पुढील एकवीस अक्षरे इट्रुस्कन लिपीतून घेतलेली होती : A, B, C, (with sound K), D, E, F, G, H, I, K, L, M, N, O, P, Q, P (काही ठिकाणी R असेही आढळते), S, T, V, X.

इ. स. पू. पहिल्या शतकात रोमन लोकांनी ग्रीसवर विजय मिळविला आणि ग्रीक शब्द लॅटिनमध्ये वापरताना सोपे जावेत, म्हणून ‘Y’ आणि ‘Z’ या अक्षरांचा समावेश या लिपीत झाला. तसेच अकराव्या व बाराव्या शतकांत ‘V’ या अक्षराचे द्वित्व होऊन ‘W’  या जर्मन अक्षरांचा तीत समावेश झाला. १५४२ मध्ये ‘J’ हे अक्षर व्यंजन आणि ‘i’ हे अक्षर स्वर म्हणून लूइ मायग्रेट या फ्रेंच लिपितज्ञाने १५४२ मध्ये तीत उपयोगात आणले. ‘कॅपिटल लिपीत’ ‘V’ आणि ‘U’ मध्ये फरक केला जात नव्हता. ‘V’ हे अक्षर दोन्हींसाठी वापरले जाई, तर ‘युन्सिअल लिपीत ‘U’ हे अक्षर ‘U’ आणि ‘V’ साठी वापरले जाई परंतु दहाव्या शतकात, ‘V’ हे –  विशेषतः आद्याक्षरांसाठी- ‘मिनुस्कुल लिपी’ त उपयोगात आणले. त्याच वेळी ‘u’ हे स्मॉल लेटर म्हणून वापरले गेले. लॅटिन शब्द हे बऱ्याच वेळा ‘V’ या अक्षराने सुरू होतात. म्हणून ‘V’ हे अक्षर व्यंजन, तर ‘U’ हे अक्षर स्वर म्हणून सतराव्या शतकापासून मानण्यात आले. अशा प्रकारे या विविध अक्षरांचा समावेश होऊन रोमन लिपी सध्याच्या लिपीप्रमाणे सव्वीस अक्षरांची बनली.


या रोमन लिपीचे त्या त्या काळाच्या गरजेनुसार विविध प्रकार अस्तित्वात आले. त्यांमध्ये शिला, मृत्तिका किंवा धातूवर कोरण्यासाठी सोयीची म्हणून ‘कॅपिटल’ किंवा ‘मॉन्युमेंटल’ लिपी वापरलेली आहे. तसेच तिसऱ्या शतकात प्राचीन बायबलच्या हस्तलिखितांत आणि अभिजात वाड्मयाच्या हस्तलिखितांतही हीच लिपी आढळते.

चौथ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत ‘कॅपिटल’चाच जरा वेगळ प्रकार ‘रस्टिक’ म्हणून आढळतो. या लिपीचा वापर शिला आणि ब्राँझ यांव्यतिरिक्त पपायरस आणि प्राचीन हस्तलिखितांत आढळतो.

दुसऱ्या शतकाच्या मध्यानंतर कॅपिटल लिपीचा पुस्तकांतून उपयोग कमी झाला आणि ‘कर्सिव्ह’ (हस्तलिखितांतील धावती लिपी) लिपीचा उदय झाला. पुस्तकांतून शीर्षकांसाठी किंवा आद्याक्षरांसाठी कॅपिटल लिपीचा उपयोग होऊ लागला. कॅपिटल लिपीतूनच ‘युन्सिअल लिपी’ उत्क्रांत झाली आणि चौथ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत पुस्तकांसाठी युन्सिअल लिपीचा प्राचुर्याने उपयोग करण्यात आला. या लिपीतील सु. ३९० धार्मिक हस्तलिखिते उपलब्ध आहेत. या लिपीचा सर्वांत प्राचीन पुरावा तिसऱ्या शतकातील असून तो उत्तर आफ्रिकेतील शिलालेखांत मिळतो. कॅपिटल लिपीप्रमाणे या लिपीत फारशी वळणे नव्हती आणि अक्षरे एकमेकांना जोडलेलीही नव्हती. सातव्या-आठव्या शतकांपासून युन्सिअलच्या अवनतीस सुरुवात झाली.

दरम्यान ‘कर्सिव्ह कॅपिटल’ किंवा ‘मॅजुस्कूल कर्सिव्ह’ या प्रकाराचा उदय कॅपिटलमधून झाला. ही लिपी पुस्तकांसाठी आणि दैनंदिन उपयोगासाठी होती. अशा प्रकारे लिहिण्याची पद्धती यापूर्वी ईजिप्तच्या पपायरसवर इ.स. च्या पहिल्या शतकाच्या मध्यात ज्ञात होती. पाँपेई येथे १८७५ मध्ये मेणाच्या १३२ पट्ट्या वा इष्टिका मिळाल्या. त्यांवर या लिपीत लिहिलेले सावकारी हिशोब होते. त्यांचा काळ इ. स. ५३ ते ६२ आहे. कॅपिटल कर्सिव्हमध्ये अक्षरांचा आकार कमी करण्याकडे व अक्षरे जोडून लिहिण्याकडे कल दिसतो. तसेच दुरेघी पद्धतीवरून चौरेघी पद्धतीचा अवलंब झाल्याचेही दिसते. त्यामुळे प्रत्येक अक्षराची उंची व आकार निश्चित होतो. या पद्धतीस ‘हाफ युन्सिअल’ असे सबोधण्यात आले. ख्रिस्ती वाङ्‌मयात पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत हा प्रकार सर्वमान्य म्हणून अस्तित्वात होता. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर ‘हाफ युन्सिअल’ पश्चिम आणि दक्षिण गॉलमधून आयर्लंडमध्ये गेला. त्यामुळे या लिपीला विशेष महत्त्व आहे.

  रोमन वर्णमाला


सातव्या शतकात ‘मिनुस्कूल लिपी’ पुस्तकांसाठी आणि रोजच्या व्यवहारात होती. यातही चौरेघी पद्धतीचा अवलंब दिसतो. या लिपीला ‘न्यू आयरिश लिपी’ हे नाव देण्यात आले. या लिपीच्या अक्षरांच्या आकारात अकराव्या-बाराव्या शतकांपासून आजतागायतही फारसे फरक झाले नाहीत. आयरिश धर्मप्रारकांमार्फत ही लिपी जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये गेली आणि तेथील लिप्यांवर तिचा प्रभाव पडला. यावेळी ब्रिटनवर एकीकडून रोम आणि दुसरीकडून आयर्लंड ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पाडत होते. अशा वेळी रोमन लोकांची युन्सिअल आणि आयरिशांची हाफ युन्सिअल यांचा ब्रिटनमध्ये मिलाफ झाला आणि त्यातून ‘अँग्लो सॅक्सन’ लिपीचा उदय झाला. तीत काही नवीन चिन्हांचाही समावेश करण्यात आला.

रोमन लिपीला नवव्या शतकात एक निश्चित वळण मिळून ‘कॅरोर्लिजिअन मिनुस्कूल’ हा प्रकार अस्तित्वात आला आणि त्याचा प्रसार कॅरोर्लिजिअन राज्यात तर झालाच, पण त्याव्यतिरिक्त ११००च्या सुमारास उत्तर आणि दक्षिण यूरोपातही झाला. या काळातील लॅटिन पुस्तके या लिपीत लिहिलेली आढळतात.

बाराव्या-तेराव्या शतकांत ‘गॉथिक’ प्रकारात मोडणारी ‘ब्रोकन लिपी’ अस्तित्वात आली. तिला ‘गॉथिक मिनुस्कूल’ म्हणून संबोधण्यात आले. पंधराव्या शतकात मुद्रणासाठी ‘ह्युमॅनिस्टिक अँटिका’ किंवा ‘रेनेसन्स मिनुस्कूल’ नावाची लिपी अस्तित्वात आली. अशा प्रकारे ज्या लिपीत ‘कर्सिव्ह’ लिपीची वैशिष्ट्ये आहेत. ती रोजच्या व्यवहारासाठी किंवा कागदपत्रांसाठी उपयोगात राहिली, तर तेराव्या-चौदाव्या शतकांत व्यापारी उद्देशांसाठी व्यापारी लिपी अस्तित्वात आली. या लिपीत अक्षरे एकमेकांना जोडून लिहिली जात. सोळाव्या शतकात धावत्या लिपीचा (रनिंग लिपी) प्रारंभ झाला.

रोमन लिपीने इतर सर्व इटालियन लिप्यांना हळूहळू बाजूला सारून त्यांचे स्थान बळकावले आणि ही पश्चिमेकडील निम्म्या रोमन साम्राज्याची लिपी बनली. ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांनी तिचा प्रसार उत्तर, पश्चिम आणि मध्य यूरोपात केला. फक्त दक्षिण आणि पूर्व यूरोप याला अपवाद आहेत. यांशिवाय इतर यूरोपीय देशांत आणि अमेरिकेतही या लिपीचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला. ही लिपी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, हंगेरियन, फिनिश वगैरे कितीतरी यूरोपीय भाषांसाठी वापरली जाते. यावरून या लिपीचे महत्त्व ध्यानात येते.

संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.

           2. Diringer, David, Writing, London, 1962.

           3. Jensen, Hans, Trans. Unwin, George. Sign, Symbol and Script, London, 1970.

           4. Lindsay, W. M. The Latin Language, New York, 1963.  

आरोळे, मीरा