शिलालेखाचा नमुना : पळसदेव (ता. दौंड, जि. पुणे) येथील सरडेश्वराच्या देवळातील खांबावर खोदलेला मराठी शिलालेख, शक १०७९ (इ. स. ११५७).लेखनसाहित्य : ज्यावर, वा ज्याच्या साहाय्याने लेखन केले जाते, अथवा कोरले जाऊ शकते, असे साहित्य वा सामग्री. लेखन हे केवळ विचारप्रकटनाचे साधन नसून भाषाप्रसाराचे माध्यम मानले जाते. लेखनासाठी प्राचीन काळापासून निरनिराळी माध्यमे वारपलेली आढळतात. प्रारंभी लेखन भूर्जपत्र, कातडी, शंख, मातीच्या विटा, कापड, प्रस्तर, लोखंड, कथिल, कासे, रुपे, सुवर्णपत्र, पितळ इत्यादींवर केले जाई. पुढे लेखणी, शाई यांच्या साहाय्याने कागदावर लेखन केले जाऊ लागले व मुद्रणकलेचा शोध लागून त्याचा प्रसार झाला. अशा लेखनावरून तत्कालीन साहित्याचा व विकासाचा आढावा घेता येतो.

प्राचीन लेखनसाहित्यांत प्रस्तराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचे कारण त्याचे चिरस्थायित्व. धातू झिजतात ऊन, वारा व पाऊस यांमुळे ते गंजतात. प्रस्तर गंजत नाहीत धातूंच्या तुलनेत त्यांची झीज अत्यल्प असते. त्यामुळे प्राचीन कालीन प्रस्तराची लोकप्रिय लेखन साहित्यांत गणना करावी लागेल. दगडावर लेख लिहिण्यापूर्वी तो गुळगुळीत करण्यात येई. त्यावर काळ्या शाईने अगर खडूने मजकूर लिहीत. नंतर कोरक्या छणीने खोदून तो मजकूर पक्का केला जाई. अशा तऱ्हेने लेखरचना करणारा विद्वान, अक्षरे वळणदार काढणारा आणि कोरक्याचे काम करणारा, अशी तीन माणसे शिलालेखासाठी लागत. 

भारतातील सर्वांत प्राचीन शिलालेख सम्राट अशोकाचे आहेत. शैलस्तंभांवरही त्याचे लेख आढळतात. देवळासमोर स्तंभ उभारतात, त्याला ध्वजस्तंभ किंवा दीपमाळ म्हणतात. बेसनगर येथील ध्वजस्तंभावर हेलिओडोरस या ग्रीक राजदूताचा लेख आहे. प्राचीन काळी दिग्विजयानंतर राजे कीर्तिस्तंभ उभारीत. मंदसोर व ताळगुंद येथील अनुक्रमे यशोधर्मा आणि कदंबराज काकुस्थवर्मा यांचे कीर्तिस्तंभ प्रसिद्ध आहेत. अलाहाबाद येथे अशोकस्तंभावरच समुद्रगुप्ताचा दिग्विजय लेख आहे. अशा कीर्तिलेखास ‘प्रशस्ति’ म्हणतात. एखादा शूर वीर युद्धात मारला गेल्यास, त्याच्या नावाने त्याच्या गावी शिला उभारली जात असे तीवर त्याचे नाव, कालखंड कोरलेले असत. अशा शिलेला ‘वीरगळ’ म्हणतात. मृत वीराची पत्नी सती जात असे. तिच्यासाठी उभारलेल्या शिळेवर पति-पत्नींची नावे कोरली जात. त्या शिळेस ‘सतीचा दगड’ असे संबोधतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यात्रेकरू पुण्यप्राप्तीसाठी स्तंभावर आपली नावे कोरवीत त्याला ‘दानस्तंभ’ म्हणतात. नागार्जुनकोंडा, भारहूत येथील बौद्धकालीन स्तूपांच्या भग्नावशेषांत अशा तऱ्हेचे स्तंभ सापडतात. मृत नातेवाईकांच्या नावानेही स्तंभ उभारले जात त्यांना ‘गोत्रशैलिका’ म्हणतात. काही वेळा स्तंभावर मृताची प्रतिकृती दाखविलेली असते त्या स्तंभास ‘छायास्तंभ’ म्हणतात. यज्ञस्तंभावर लेख असतात त्या स्तंभास ‘यूप’ असे संबोधतात. एका अक्षरापासून सबंध ग्रंथ दगडांवर कोरल्याची उदाहरणे आहेत. मेवाडमध्ये विजौत्याच्या जैन मंदिराजवळ १२२६ मध्ये उन्नतपुराण कोरलेली एक शिला आहे. शिलालेखामध्ये लेखाच्या आंरभी आणि शेवटी एखादे मंगलसूचक स्वस्तिकासारखे चिन्ह असते. तसेच इष्ट देवतेला वंदन केलेले असते. कित्येक वेळा ‘सिद्धम्’ हा शब्द सुरुवातीला आढळतो. विषय समाप्तीनंतर कमळ, वर्तुळही दाखविण्याची प्रथा होती. शिलालेखाचे दोन प्रकार आहेत : एक खोदलेल्या अक्षरांचे आणि दोन उठावाच्या अक्षरांचे. अरबी, फार्सी लेख उठावाच्या अक्षरांनी लिहिलेले असतात. दगडी भांडी, मूर्तीची आसनपट्टी, विहिरीची अगर मंदिराची कोनशिला यांवर लेख आढळून येतात. 

ताम्रपटावरील कोरीव लेखनाचा नमुना : सामंत नागदेव याचा पल्लिका (गाव) संस्कृत-मराठी ताम्रपट (पत्रा दुसरा), शक १२७४ (इ. स. १३५२). ताम्रपट : प्रस्तराप्रमाणेच प्राचीन काळात ताम्रपट अतिशय लोकप्रिय असल्याचे दिसून येते. बौद्धविहारांत ताम्रपत्रे असल्याचा चिनी यात्रेकरू फाहियान याने उल्लेख केलेला आहे. ताम्रपत्रांचे आकार लहानमोठे असले, तरी लांबट-चौकोनी आकार वैशिष्ट्यपूर्ण आढळतो. राजमुद्रा ओतीव असून तिची कडी शासनपत्राच्या बाजूला असलेल्या वर्तुळाकार छिद्रांतून घातलेली असते. राज्यशासनाची पत्रे तीन असली, तर पहिल्या पत्राच्या आतील बाजूस लिहीत असत वरची बाजू तशीच मोकळी ठेवीत. मधल्या पत्रावर दोन्ही बाजूंनी लिहीत.तिसऱ्या पत्रावरील बाहेरील बाजूला लिहीत नसत. त्यामुळे लिहिलेला मजकूर सुरक्षित राही. पत्राच्या कडा बाजूने थोड्या वर करीत त्यामुळे अक्षरे झिजत नसत. ताम्रपटावर शाईने किंवा कोरणीने लेख लिहीत नंतर छणीने ते लेख कोरीत. कित्येक वेळा भांड्यांवर नावेघातल्याप्रमाणे वरील लेख लिहिले जात. लेखनातील अक्षरांची चूक छणीने रेघा ओढून बरोबर करण्यात येई. एखादे अक्षर गळले, तर ते समासात लिहीत. केवळ राजेलोक ताम्रपटावर लिहीत असे नाही, तर ब्राह्मणांची आणि जैनांची यंत्रे ताम्रपटांवर आढळतात. कुशाणराजा कनिष्काने बौद्ध धर्मग्रंथ ताम्रपटांवर कोरवून घेतले होते. ते लेख आज अस्तित्वात नाहीत. ताम्रपत्राचा आकार ताडपत्राप्रमाणे लांबट-चौकोनी असला, तरी त्रिकोणाकृती आणि चतुष्कोणाकृती आकारांचीही ताम्रपत्रे आढळतात. त्यांचे वजन सु. ५०० ग्रॅम असे. पूर्वीचे धर्मशील राजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मकरसंक्रांत, कर्कसंक्रांत अशा पर्वकाली विद्वान ब्राह्मणांना जमिनी दान करीत, त्याचा सर्व तपशील या ताम्रपटांत असे. राजाची वंशावळ, दान दिलेल्या ब्राह्मणांची वंशावळ दानप्रसंगी उपस्थित असलेल्या सरदारांची नावे-गावे इ. माहिती त्या तपशिलात असे. ताम्रमूर्तीच्या आसनपटावर वरील लेख आढळून येतात. सोने व रूपे या धातूंप्रमाणे तांबे दुर्मिळ नसल्यामुळे ताम्रपट लेखनसाहित्य म्हणून लोकप्रिय झाले.


भुर्जपत्र : लेखनासाठी भूर्जपत्राचा उपयोग करण्याची कला भारतात फार प्राचीन काळापासून आहे. स्वारीच्या वेळी सिकंदरासोबत आलेल्या क्यू कर्टिअस ह्या सेनापतीने भारतीय लोक भूर्जपत्रांचा लेखनासाठी उपयोग करीत असल्याचे नमूद केले आहे. हिमालयामध्ये भूर्जवृक्ष विपुलतेने आढळतात. भूर्जवृक्षाच्या अंतर्साली काढून त्या घासून गुळगुळीत करण्याची, त्यांना चकाकी आणण्याची कला काश्मिरी पंडितांना अवगत होती. संस्कृत वाङ्मयामध्ये भूर्जपत्राचे कितीतरी उल्लेख आहेत. चीनमधील  खोतान येथे दुसऱ्या शतकातील खरोष्ठी लिपीत भूर्जपत्रावर लिहिलेली धम्मपदाची पोथी आहे. ताडपत्राच्या पोथीप्रमाणेच मध्यभागी गोल भोक पाडून दोन लाकडी पाट्यांत भूर्जपत्रांची ही पोथी ठेवीत. बक्शाली येथे सापडलेले अंकगणिताचे पुस्तक आठव्या शतकातील असून ते भूर्जपत्रावर लिहिलेले आहे. व्हिएन्ना, बर्लिन तसेच पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात आणि डेक्कन कॉलेजमध्ये भूर्जपत्रांवरील पंधराव्या शतकातील पोथ्या आढळतात.

ताडपत्र : ताडपत्रांचा लेखनासाठी प्रामुख्याने दक्षिण भारतात उपयोग केला जाई. तक्षशिला येथे पहिल्या शतकातील ताम्रपट सापडला. त्याचा आकार ताडपत्रासारखा होता. गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर लगेच भरलेल्या मेळाव्यातील विधिनियम ताडपत्रांवर लिहिले होते, असे चिनी यात्रेकरू ह्युएनत्संगने आपल्या प्रवासवृत्तातलिहून ठेवले आहे. ताडपत्रांचा उपयोग करण्यापूर्वी ती वाळवीत नंतर पाण्यात उकळून काढून पुन्हा वाळवीत. पानाला गुळगुळीतपणा येण्यासाठी शंखाने अगर दगडाने घासून ते योग्य आकाराचे कातरीत असत. काश्मीर आणि पंजाबचा काही भाग सोडला, तर भारतात ताडपत्रांचा लेखनासाठी बराच उपयोग लोक करीत असत. दक्षिण भारतात ताडपत्रांवर लोखंडी अणकुचीदार सुईने टोचून अक्षरे लिहीत नंतर त्यावर कोळसा अगर शाई लावीत. ताडपत्रांच्या पोथीला पानांच्या मध्यभागी गोल भोक पाडीत. त्यामध्ये दोरा ओवून लिहिलेली सर्व पाने एकत्र बांधीत. पानांची लांबी जास्त असेल, तर दोन भोके ठेवीत. त्याच आकाराच्या दोन लाकडी पाट्या करून त्यांमध्ये पोथी ठेवीत असत. नेपाळच्या ताडपत्राच्या पोथीसंग्रहात सातव्या शतकातील स्कंदपुराण आणि लंकावतार या प्राचीन पोथ्या आहेत.

कातडी : भारतामध्ये कातड्यांवर लिहिलेले लेख अद्याप सापडले नाहीत. धार्मिक दृष्ट्या कातडे निषिद्ध मानल्यामुळे कदाचित त्याचा लेखनासाठी फारसा उपयोग करीत नसत. सुबंधूच्या (इ. स. सू. आठव्या शतकाचा पूर्वार्ध) वासवदत्ता नाटकात कातड्याचा लेखनासाठी उपयोग करीत, असा उल्लेख आहे. उंटाच्या कातड्यावर खरोष्ठीतील लेख आढळतात. कातड्यावरील लेख प्रामुख्याने पश्र्चिम आशिया आणि यूरोपमध्ये सापडतात.

कापड : इ. स. पू. तिसऱ्या शतकात भारतातील लोक कापडाचा लेखनासाठी उपयोग करीत, असा उल्लेख नीआर्कसने केला आहे. लेखनाच्या कापडाला पट, पटिका आणि कार्पासिक पट असे संबोधतात. कर्नाटकातील काही व्यापारी अजूनही कापडावर लिहितात. प्राचीन काळी कापडाला चिंचोक्याची अगर कणकेची पातळ खळ लावून शंखाने गुळगुळीत करीत आणि त्यावर खडूने अगर काळ्या पेन्सिलीने लिहीत असत. ह्युएनत्संगाच्या प्रवासवृत्तात व हर्षचरितात कापडावरील लेखाचा उल्लेख आहे. अशा तर्‍हेची कापडी पुस्तके शृंगेरीच्या मठात उपलब्ध आहेत. सुती कापडाप्रमाणेच रेशमी कापडाचा लेखनासाठी उपयोग करीत असल्याचे दिसून येते. अर्थात रेशमी कापडाचा सर्रास उपयोग करीत नसत. जैसलमीर येथे चौदाव्या शतकातील रेशमी कापडावर लिहिलेली जैन सूत्रांची यादी सापडलेली आहे [→ कापड उद्योग].

फलक : लाकडी फळ्यांवर लिहिण्याचा फार प्राचीन काळापासून प्रघात आहे. विनयपिटकात धर्मसंमत देहत्यागाचे विधिनियम काष्ठफलकावर लिहू नयेत, असे सांगितले आहे. क्षहरातराजा नहपान याच्या नासिक येथील लेखात लाकडी फळ्यांचा उल्लेख आहे. दंडीच्या दशकुमारचरितात अपहारवर्म्याने गुळगुळीत केलेल्या लाकडी फळ्यांचा उल्लेख आहे. शाळेत जाणारी मुले प्रारंभी धुळपाटीचा उपयोग करीत. मध्य आशियात खरोष्ठी लिपी असलेल्या लाकडी फळ्या सापडलेल्या आहेत. भाजे येथे लाकडी तुळईवर ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत.

सुवर्णपत्र : प्राचीन काळी श्रीमंत, सावकार आपला कुलवृत्तांत, महत्वाच्या घटना सुवर्णपत्रांवर लिहीत. धार्मिक नीतिनियमही त्यांवर कोरवून घेत. सुवर्ण अतिशय दुर्मिळ असल्यामुळे सुवर्णपत्राचे नमुने सुलभतेने आढळत नाहीत. तक्षशिलेजवळील गंगू येथील स्तूपात सुवर्णपत्रावर खरोष्ठी  लिपीत लिहिलेले दानपत्र सापडले आहे.

रुपे : सोन्याप्रमाणेच रौप्यपत्रे दुर्मिळ आहेत. भट्टिप्रोलू येथील स्तूपात आणि तक्षशिला येथे रौप्यपत्रावरील लेख असून जैनमंदिरांतून रौप्यपत्रांवरील यंत्रेही आढळून येतात. 

लोखंड : लोखंड गंजत असल्यामुळे लोहपत्रे आढळत नाहीत. दिल्लीजवळ मेहरोली येथे चंद्र नावाच्या राजाचा लेख सापडलेला आहे तो बहूधा द्वितीय चंद्रगुप्तकालीन असावा, असा विद्वानांचातर्क आहे अबूपासून ६ किमी.वर असलेल्या अचलगढ येथील अचलेश्र्वराच्या मंदिरात लोंखडी त्रिशूलावर पंधराव्या शतकातील लेख असून त्यापुढील काळात लोखंडी तोफांवर लेख आढळून येतात.

 

कथिल : या धातूचा उपयोग क्वचितच आढळतो, ब्रिटिश संग्रहालयात कथिलाच्या पत्र्यांवरील लेख आहेत.

पितळ : पितळी पत्र्याचा लेखनासाठी होत असलेला उपयोग प्राचीन नाही. पितळी घंटांवर आजही देणगीदारांची नावे आढळून येतात.


कासे (ब्राँझ) : पितळेप्रमाणे काशाच्या घंटा करीत व त्यांवर देणगीदारांची नावे लिहीत. काशाच्या मूर्तीच्या आसनपटावर मूर्तीचे नाव, लेख किंवा कोरक्याचे नाव लिहिलेले असते. मणिक्यला येथे कुशाणकाळातील खरोष्ठी लिपी असलेला काशाचा लहान करंडक सापडला आहे. सोहगौरा येथे सापडलेला लेख काशाच्या पातळ पत्र्यावर लिहिलेला आहे तो लेख सम्राट अशोकपूर्व-काळातील आहे, असे काही विद्वानांचे मत आहे.

शंख : आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम जिल्ह्यातील शालिहुडंम येथे सापडलेल्या बौद्ध अवशेषांत शंखावरील लेख आढळतो. तसेच हस्तिदंताच्या पट्ट्या, कासवाची पाठ यांचाही लेखनासाठी उपयोग केल्याचे प्रत्ययास येते.

मातीच्या विटा : मातीच्या विटांवर लिहिण्याचा प्रघात भारतात फार प्राचीन काळापासून आहे. बौद्ध धर्मीय सूत्रे विटांवर लिहिलेली आढळून येतात. पहिल्या शतकातील राजे दाममित्र आणि शीलवर्मा यांनी यज्ञ केल्याचा लेख मातीच्या विटेवर आहे व दाममित्राचा लेख असलेली वीट लखनौ येथे संग्रहालयात आहे. मातीच्या विटांवर लिहिलेले लेख भिंतीमध्ये किंवा यज्ञवेदीवर बसवीत असत. मृत्कुंभ ओले असताना त्यांवर कुंभार एखादे वेळी आपले नाव लिहीत किंवा एखादी खूण करीत. तक्षशिला, कौशाम्बी आणि नालंदा येथील उत्खननांत मृण्मय मुद्रा सापडलेल्या आहेत. या मुद्रांवर व्यक्तिनामे, बोधशब्द अथवा वाक्ये असत. मातीच्या विटांवर अगर दानमुद्रांवर त्या ओल्या असताना वरील बोधशब्द लिहीत व नंतर त्या भाजून काढीत.

 

कागद : चिनी इतिहासातील नोंदीप्रमाणे कागद तयार करण्याच्या कृतीचा शोध इ. स. १०५ साली त्साइ लुन यांनी लावला. पुढे चिनी प्रवाशांच्याबरोबर ही कला भारतात आली. परंतु ख्रि. पू. ३२७ च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर हिंदुस्थानात आलेल्या नीआर्कसने भारतीय लोक कापसाचा लगदा करून कागद तयार करीत, असे नमूद केले आहे. हातकागद तयार करण्याची कला भारतीयांना अवगत होती. या कागदाला तांदळाची खळ लावून शंखाने घोटीत असत. भोज राजाच्या कारकीर्दीत (१०००-१०५५) माळव्यात कागदाच्या कलेचा प्रसार झाला होता, असे काही संशोधकांचे मत आहे. काश्मीरमध्ये अकराव्या शतकातील आणि गुजरातेत तेराव्या शतकातील कागदांवरील हस्तलिखिते सापडली आहेत. मध्य आशियात यार्कंद येथे पाचव्या शतकातील कागदावरील लेख सापडला आहे. एवढे मात्र खरे, की मुसलमानी अमदानीपासून भारतात प्रसाद जादा प्रमाणात झाल्याचे आढळते. [→ कागद].

शाई : प्राचीन काळापासून लेखनासाठी शाईचा उपयोग होत असल्याचे दिसून येते. झाडाच्या अंतर्सालींचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई,असे कर्टिअस याने स्पष्टपणे नमूद केले आहे. इ. स. पू. ४ पासून लोक शाईचा उपयोग करीत, असा काही संशोधकांचा तर्क आहे. पक्की शाई तयार करण्यासाठी पिंपळाच्या डिंकाची बारीक भुकटी पाण्यात मिसळून व ती मडक्यात घालून उकळीत. नंतर त्यात टाकणखार आणि लोघ्र मिसळून फडक्याने गाळीत. भूर्जपत्रावर लिहिण्यासाठीबदामाच्या साली जाळून त्यांची वस्त्रगाळ पूड करीत व ती गोमूत्रात उकळून शाई तयार करीत. या शाईने लिहिलेला मजकूर पाण्याने नाहीसा होत नसे. मोहरीच्या तेलाच्या दिव्याची काजळी धरून काळी शाई तयार करीत. अलित्यापासून लाल शाई आणि हरताळापासून पिवळी शाई तयार करीत. सोनेरी आणि रूपेरी शाईसाठी सोन्याची आणि रुप्याची भुकटी शाईत मिसळीत. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये आणि अशोकाच्या शिलालेखांत ‘लिपि’ हा शब्द आलेला आहे. त्यावरून शाईने लिहिण्याची प्रथा फार प्राचीन होती, असे स्पष्ट होते. अजिंठ्याच्या लेण्यांतून पाचव्या शतकातील रंगाने लिहिलेली अक्षरेआहेत.

लेखणी : या शब्दात कोरणी, कुंचला, बोरू या सर्वांचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. ललितविस्तरमध्ये ‘वर्णक’ हा शब्द आलेला आहे. दशकुमारचरितामध्ये ‘वर्णवर्तिका’ हा रंगीत लेखनीसाठी शब्द आढळतो. राजशेखराच्या काव्यमीमांसेत लिहिण्यासाठी लोहकंटकाचा, लाकडी फळ्याचा आणि खडूचा उपयोग करीत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अजिंठ्याच्या गुंफांत कुंचल्याने रंगीत अक्षरे लिहिली आहेत.

रेखापाटी : ओळी सरळ येण्यासाठी लोक रेखापाटीचा उपयोग करीत. लाकडी पाटीवर एका बाजूला दोरे बांधून समांतर ओळी तयार करीत. त्याच्या मध्यभागी एक पट्टी घालीत. ती पट्टी फिरविली, की समांतर रेषा तयार होत. कित्येक वेळा पाटीच्या दोन्ही बाजूंना छिद्रे पाडून व त्यांत दोरा ओवून समांतर रेषा तयार करीत. शाईच्या रेघा ओढण्यासाठी आजही लोक रूळाचा अगर पट्टीचा उपयोग करतात.

पहा : कोरीव लेख.

संदर्भ : 1. Britt, K. W. Ed. Handbook of Pulp and Paper Technology, New York, 1964.            2.  Dani, A. H. Indian Palaeography, Oxford, 1963.

           3.  Diringer, David, Writing, New York, 1962.            4. Driver, Godfrey R. Semitic Writing from Pictograph to Alphabet, London, 1976.

           5.  Hall, A. J. A Handbook of Textile Dyeing and Printing, London, 1955.

           6. Hawkes, Jaquetta Woolley, Leonard, Ed. History of Mankind, Vol. 1, London, 1963.

           7. Hultzsch, E. Corpus Inscriptionium Indicarum, Vol. 1, Varanasi, 1969.

           8.  Mcmurtrie, D. C. The Book, The Printing and Bookmaking, London, 1957.  

           ९. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.  

गोखले, शोभना