मलयाळम्‌लिपि : पाश्वात्य भाषाविदांनी मलयाळम् भाषेचा द्राविडी गटात अंतर्भाव केला आहे. या भाषेची प्राचीन लिपी गोलाकार वळणाची (वट्ट-एळुत्तु) अशी आहे. काही विद्वानांच्या मते मलयाळम् लिपीचा उद्‌गम केरळमधील गुंफामधून सापडणाऱ्या ब्राह्मी लिपीपासून झाला आणि ती लिपी अशोकपूर्वकालीन होती.काहींच्या मते तिची उत्पत्ती अशोक-ब्राह्मीपासून झाली. अशोक-ब्राह्मी सर्व भारतीय लिप्यांची जननी आहे. त्यामुळे अशोक लिपीचा या लिपीवरील प्रभाव नाकारता येत नाही.

मलयाळम् वर्ण मालासंस्कृत भाषा ज्याप्रमाणे निरनिराळ्या लिप्यांत लिहीत असत त्याप्रमाणे मलयाळम् भाषा ग्रंथ, ⇨वट्‌टेळुत्तू, कोळेळुत्तू, आर्यएळुत्तू या लिपींतून लिहिली जात असे. ग्रंथ लिपिचा उपयोग संस्कृत भाषा लिहिण्यासाठी करीत. पुढे संस्कृत शब्दांचा मलयाळम् भाषेत पुष्कळ उपयोग होऊ लागल्यावर मलयाळम् लिपीमध्येही ग्रंथ लिपीची उत्क्रांती झाली. तमिळ ग्रंथ आणि मलयाळम् लिपीमधील ताम्रपट, शिलालेख आणि हस्तलिखिते पाहिली तर तमिळ, ग्रंथ आणि मलयाळम् यांच्यातील साधर्म्य व नाते लक्षात आल्यावाचून राहात नाही. तमिळ लिपीचेच दोन प्रकार आहेत : (१) चेर-पांड्य या लिपीतून वट्टेळुत्तू आणि (२) पल्लव-चोल मधून कोळेव्टुत्तू अशा दोन लिपी निर्माण झाल्या.

 

चोल सम्राट राजराज याने पांड्यदेश जिंकला त्यावेळी राज्यामध्ये लिपीमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी वट्टेळुत्तू या लिपीऐवजी कोळेळुत्तू या लिपीचा वापर जारी केला परंतु चेरदेशात म्हणजे केरळमध्ये हस्तलिखितासाठी वट्टेळुत्तू या लिपीचा उपयोग करीत. 

 

मलयाळम् भाषेतील सर्वांत जुना लेख ८ व्या शतकातील असला, तरी ही भाषा त्याहून प्राचीनतर आहे. वट्टेळुत्तू लिपीचा उल्लेख प्राचीन शिलालेखांत आढळतो, त्याबरोबर दक्षिण मलयाळम्, नामम्‌ मुलम्‌, चेरपांड्य एळुत्तू अशीही तिची नावे आहेत. ह्या लिपीत जोडाक्षरे आढळत नसली, तरी अक्षरे ‘अर्धी’ करण्याचे चिन्ह तिच्यात होते. १० व्या शतकातील राजराज व राजेंद्र इ. चोल सम्राटांनी तमिळनाडू जिंकले व तेथे प्राकृत व तमिळ भाषांसाठी कोळेळुत्तू शैलीतील लिपी ताडपत्रावर कोरण्यास उपयुक्त म्हणून चासू केली. फार प्राचीन काळापासून मलयाळम् भाषेत संस्कृत तद्‌भव व तत्सम शब्द प्रचलित होते. ‘स्वतिश्री’ ही प्रारंभीची अक्षरे तमिळ लेखांत ग्रंथ शैलीत लिहीत. अठराव्या शतकात केरळात वट्टेळुत्तूचा उपयोग कमी होऊन ‘आर्य-एळुत्तू’ किंवा ‘तुळू-मलयाळम्’ शैलीचा वापर वाढला. कारण या काळात केरळात ब्राह्मण वर्गाचा प्रभाव फार वाढला होता तसेच संस्कृतचा वापरही फार वाढला होता. काव्यातील मणिप्रवाळ शैलीला सुद्धा तुळू- मलयाळम् अधिक सोयीची होती. 

 

उकारादी खालची चिन्हे समोर आणि जोडाक्षरे फोडून हलन्तयुक्त लिहिण्याची लिपिसुधारणा १९७० च्या सुमारास घाईने अंमलात आली, त्यामुळे मलयाळम् लिपी इंग्रजी टंकलेखनयंत्र व एकटंकक (मोनोटाइप) या जुळणी यंत्रावर आरूढ होऊन तीत मुद्रणसुलभता आली व देशी वर्तमानपत्रांचाही खप वाढला. मलयाळम् लिपीत देवनागरीपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण ध्वनींची सोय आहे, ती ऱ्हस्व ‘ए’, ‘ओ’, ‘ळ’ (ष)’, ‘र्र’, ‘ट्ट’ ह्या अधिक वर्गांमुळे मात्र जोडाक्षरे फोडणे तसेच मात्रांची एका ओळीत योजना करणे यांमुळे ह्या सुधारित लिपीने छापण्यास १२ टक्के जागा अधिक लागते. म्हणून लिपीसुधारणेबाबत पुनर्विचाराची भाषा केरळात ऐकू येऊ लागली आहे.

संदर्भ :  1. Mallaseri, S. Radhakrishnan, ‘‘ Evaluation of Malayalam Script’’, CALTIS-84, Pune, 1984.

            2. Ravivarma, L.A. Ancient Kerala Scripts, Trichur, 1971.

            ३. ओझा, गौरीशंकर, म. अनु. लक्ष्मीनारायण भारतीय, प्राचीन भारतीय लिपिमाला, नवी दिल्ली, १९७७.

वाकणकर, ल. श्री.

Close Menu
Skip to content