फिनिशियन लिपि : नॉर्थ सेमिटिक वा प्राचीन सेमिटिक लिपीत या लिपीचा अंतर्भाव होतो. फिनिशिया या प्राचीन देशाची नेमकी व्याप्ती ठरविणे अवघड आहे त्याचप्रमाणे फिनिशियन लोक, त्यांचा वंश, भाषा या गोष्टीही नेमक्या ठरविणे कठीण आहे. फिनिशियन लोक ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचे लेख सापडले आहेत आणि देशकालानुरूप त्यांमध्ये फरकही पडले आहेत. सर्वसाधारणपणे सध्याच्या लेबानन, दक्षिण सिरिया व इझ्राएलचा उत्तर भाग यास फिनिशिया असे म्हणत. या भागात ही लिपी प्रथम प्रसृत झाली, म्हणून ‘फिनिशियन’ पडले. सध्या ही लिपी प्रचलित नाही. मेसोपोटेमिया व ईजिप्त येथे भरभराटीस आलेल्या दोन समृद्ध संस्कृतींशी दुवा जोडण्याचे कार्य या भागाने केले. फिनिशियाचे उत्तरेकडून ॲनातोलिया, पश्चिमेकडून क्रिट, सायप्रस, ग्रीस या देशांशी सांस्कृतिक संबंध होते. आधुनिक इझ्राएलचा प्रदेश म्हणजे या नानविध संस्कृतींना जोडणारा व्यापारी मार्ग होता. विविध संस्कृतींशी या विभागातील लोकांचा संबंध आल्यामुळे येथील लोक व्यापारी आणि हरहुन्नरी म्हणून प्रसिद्ध होते. या विभागातील लोकांनाही फिनिशियन लोक म्हणत. हे फिनिशियन लोक ऋग्‍वेदातील पणी असावेत, असा ब्यूलर यांचा तर्क आहे. व्यापारनिमित्त यूरोप तसेच ईजिप्त, आशिया येथील लोक या भागातूनच ये-जा करीत असत. त्यामुळे फिनिशियन लोकांचा विविध संस्कृतींशी जवळून परिचय होत असे. लिपी ही मुख्यतः व्यापाऱ्यांची गरज असल्यामुळे ही लिपी प्रथम व्यापारी लोकांनी शोधली असावी, असा सर्वसामान्य समज आहे. फिनिशियन लोकांनी ईजिप्ती लोकांप्रमाणे लेखनासाठी पपायरसचा उपयोग केला. व्यापारानिमित्त या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी वसाहती केल्या, त्या त्या ठिकाणी म्हणजे सध्याचा सायप्रस, ग्रीस, उत्तर आफ्रिका, मॉल्टा, सिसिली, मार्से, स्पेन इ. ठिकाणी फिनिशियन लिपीमधील लेख सापडले.

फिनिशिअन वर्णांचा उगम व विकास

या लिपीतील सर्वांत प्राचीन असे दोन शिलालेख १९४५ साली एम्. ड्यूनंड यांना बिब्‍लस (प्राचीन गिबल व सध्याचे जुबेल, लेबानन) येथे सापडले. त्यांतील एक लेख मोठा व दुसरा लहान आहे. त्यांचा काळ अनुक्रमे इ. स. पू. १७०० व १५०० असा आहे. या लेखांचा शोध लागेपर्यंत गिबलचा राजा ह्यूरमचा लेख सर्वांत प्राचीन समजला जाई. त्या लेखाचा काळ इ. स. पू. १३-११ वे शतक असून त्याचा शोध फ्रेंच संशोधक प्येअर माँते यांनी १९२३ मध्ये लावला. ह्यूरमच्या लेखानंतरच्या काळातील म्हणजे इ.स.पू.सु १२ व्या शतकातील राजा येहिमेलेकचा मंदिरलेख बिब्‍लस येथेच सापडला. त्यानंतरच्या व फिनिशियन लिपीची वैशिष्ट्ये दर्शविणारा लेख म्हणजे इ.स.पू. नवव्या शतकातील मोआबाइट लोकांचा राजा मिशा याचा लेख. या लेखाचा शोध १८६८ मध्ये दायबान (सध्याचे दिबॅन) येथे लागला. या लेखाची भाषा प्राचीन हिब्रू आहे.

फिनिशियन वसाहतींमध्ये प्रचलित असलेली फिनिशियन लिपी : (अ) सायप्रो-फिनिशियन लिपी : इ.स.पू. १००० ते इ.स.पू. २०० या कालखंडातील लेखांतून ही लिपी दिसून येते. इ.स.१८७६ मध्ये सायप्रस बेटावर एक लेख सापडला. त्या लेखात फिनिशियन लिपीचे जुने स्वरूप पहावयास मिळते. हा लेख पंचरसी धातूच्या दोन बश्यांवर आहे. याचा काळ इ.स.पू. ६९५ ते ६५० असा आहे. या लिपीतील सर्वांत प्राचीन लेख ए. एम्. हनिमन यांनी आपल्या इराक (१९३९) ह्या ग्रंथात प्रसिद्ध केला. त्याचा काळ इ.स.पू. ९०० असा आहे.

(आ) सार्डिनियन लिपी : फिनिशियन लिपीपासूनच उत्पन्न झालेल्या या लिपीमध्ये असलेले इ.स.पू. ९०० मधील दोन लेख सार्डिनियामध्ये मिळाले आहेत.

(इ) कार्थेजियन लिपी : फिनिशियन लिपीपासूनच उत्पन्न झालेल्या ज्या मुख्य शाखा आहेत, त्यांत या लिपीचा अंतर्भाव होतो. इ.स.१८४५ मध्ये मार्से येथे इ.स.पू. ३०० मधील लेख सापडला. त्यामध्ये देवतेसाठी केलेल्या यज्ञाचा उल्लेख आहे. या लेखातील लिपीमध्ये बराच फरक पडलेला आढळून येतो. कार्थेजजवळ जे लेख सापडले, त्या लेखांमध्ये पपायरसच्या वापरामुळे लिपीची घसेटी पद्धत आढळून येते. तीस प्यूनिक लिपी म्हटले जाते. ही लिपी इ.स. तिसऱ्या शतकापर्यंत तेथे तीस प्यूनिक लिपी म्हटले जाते. ही लिपी इ.स. तिसर शतकापर्यत तेथे प्रचलित होती. फिनिशियन लिपी व तिच्या शाखा यांचा विकास प्राचीन ⇨ हिब्रू लिपी व ⇨ ॲरेमाइक लिपीप्रमाणे बाह्यांगाने झाला. अक्षराचे वळण बदलले, तरी त्यांचे उच्चारणमूल्य बदलले नाही. प्राचीन हिब्रू लिपीचे वळण कालमानाने जाड व बसके झाले. उलटपक्षी फिनिशियन लिपीतील अक्षरांचे वळण लांबट व बारीक झाले.

पहा: सेमिटिक लिपि.

संदर्भ: 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols., London, 1968.

2. Jensen, Hans, Sign, Symbol and Script, London, 1970.

गोखले, शोभना