सेमिटिक लिपि : सेमिटिक लिपी ही एकच लिपी नसून हा एक लिपिसमूह आहे. या समूहातील लिप्यांचा उगम सिनाई (भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र यांच्या मधला त्रिकोणी भूभाग) भागातील प्राचीन सिनाईटिक लिपीतून झाला, असे मानले जाते. माल्टीज ही भाषा वगळता (माल्टीज रोमन लिपीत लिहिली जाते) इतर सेमिटिक भाषा या लिपिसमूहातील लिप्या वापरतात. त्याचबरोबर फार्सी, उर्दू, सिंधी यांसारख्या इंडो–युरोपियन भाषादेखील सेमिटिक लिपींपासून उद्भवलेल्या लिप्या वापरतात.
प्राचीन सिनाईटिक लिपी ही प्राचीन सुमेरियन कीलमुखी म्हणजे ⇨ क्युनिफॉर्म लिपीपासून उत्पन्न झाली असे मानले जाते. जगातील आद्य संस्कृती मानली जाणाऱ्या सुमेरियन संस्कृतीत (इ. स. पू. ३५००–१९००, मेसोपोटेमिया भागात, आजचे दक्षिण इराक) बोलीभाषेचे सर्वप्रथम लिपीकरण झाले. इ. स. पू. ३००० मध्ये ही लिपी पहिल्यांदा वापरली गेली असावी. इ. स. पू. २५०० च्या सुमारास अकेडियन ही सेमिटिक भाषा बोलणाऱ्या लोकसमूहाचा सुमेरांशी संपर्क झाला. त्यांनी सुमेरांच्या कीलमुखी लिपीमध्ये आपल्या भाषेला अनुरूप असे बदल केले. सुमेरी ही विग्रहप्रवण (ॲग्लुटिनेटिव्ह) भाषा असल्यामुळे तिची लिपी पदरेखी (लोगोग्रॅफिक) होती. मात्र अकेडियन ही विकारप्रवण (इन्फ्लेक्टिंग) भाषा होती. त्यांनी मुळातल्या पदरेखित चिन्हाचा (लोगोग्रॅम) सेमिटिक भाषेत अनुवाद केला. पुढे हाच अनुवादित शब्द विशिष्ट चिन्हाचे नावनिर्देशक म्हणून वापरला जाऊ लागला. उदा., :> हे चिन्ह ‘वळू’ या प्राण्याचा निर्देश करायचे. ‘वळू’ला सेमिटिक भाषेत ‘अलेफ’ म्हणतात. यावरून या चिन्हाचे नाव ‘अलेफ’ असे ठरवण्यात आले. तसेच M हे पदरेखित चिन्ह पाण्याचा निर्देश करायचे. सेमिटिक भाषेत पाण्याला ‘मेम’ म्हणतात. यावरून या चिन्हाचे नाव ‘मेम’ असे पडले. या प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या तत्त्वाला ‘फोनोग्रॅफिक प्रिन्सिपल’ असे म्हणतात.
सेमिटिक लिपी सेमिटिक भाषासमूहातील भाषांच्या पदव्यवस्थेला अनुरूप अशी आहे. दोन किंवा तीन व्यंजनांचे मूळ व त्यात साधक किंवा विकारी प्रत्यय म्हणून स्वरांचा वापर अशी ही व्यवस्था आहे. सेमिटिक लिपीत केवळ २२ व्यंजनांसाठी चिन्हे आहेत, स्वरांसाठी नाहीत. म्हणून या लिपीला व्यंजनरेखी (कॉन्सोनंटल) लिपी म्हणता येईल. सेमिटिक भाषेत या लिपीला ‘अब्जद’ असे नाव आहे. ही लिपी उजवीकडून डावीकडे आणि वरून खाली अशी लिहिली जाते. अक्षरांचा/लिपीतील चिन्हांचा उपयोग अंकांचा निर्देश करण्यासाठी देखील होतो. प्राचीन सिनाईटिक लिपीतून नंतर ग्रीक (पर्यायाने सर्व यूरोपीय) हिब्रू, अरबी, ब्राह्मी इ. लिप्यांचा उगम झाला. प्राचीन सिनाईटिक लिपीपासून तयार झालेल्या काही लिप्या खालील आकृती १ मध्ये दाखवल्या आहेत :
सेमिटिक भाषांनी अर्वाचीन काळात मूळ सेमिटिक लिपीत बदल केले आहेत. यांपैकी अरबी आणि हिब्रू ही दोन प्रमुख उदाहरणे.
अर्वाचीन अरबी लिपीत व्यंजनांचा आणि दीर्घ स्वरांचा निर्देश करणारी २८ चिन्हे आहेत. या शिवाय ऱ्हस्व स्वर, व्यंजनांचे द्वित्व, कंठद्वारीय स्पर्श (ग्लॉटल स्टॉप) इ. दाखवण्यासाठी शद्दा <w>, हम्जा π यांसारख्या भेदक चिन्हांचा वापर होतो. ऱ्हस्व स्वरांचा निर्देश करणाऱ्या चिन्हांना वगळून ही लिहिता येते. यामुळे या लिपीला लवचिकपणा प्राप्त झाला आहे. नंतरच्या काळात अरबी अक्षरांच्या वळणात बदल झाले. या अक्षरांचा क्रमसुद्धा प्राचीन सेमिटिक लिपीपेक्षा वेगळा आहे. हा क्रम दृश्य साम्यावर आधारलेला आहे. या शिवाय फार्सी, उर्दू, सिंधी या भाषांसाठी ⇨ अरबी लिपी आवश्यक बदल करून वापरली जाते.
अर्वाचीन ‘हिब्रू स्क्वेअर’ लिपी (चौरसाकृती चिन्हांची लिपी) ⇨ ॲरेमाइक लिपीपासून निर्माण झाली. यात २२ व्यंजन चिन्हांचा समावेश होतो. कालांतराने बोलीभाषेत जसजसा फरक पडत गेला, तसतसा लिपीत काही व्यंजन चिन्हांचा उपयोग स्वर चिन्हे म्हणून केला जाऊ लागला. य, व, ह या ध्वनींचा निर्देश करणाऱ्या व्यंजन चिन्हांचा अशा प्रकारे वापर होतो. या चिन्हांचा हिब्रू भाषा वाचण्यासाठी उपयोग होतो, म्हणून त्यांना ‘मात्रे लेक्सिओनिस’ असे म्हणतात. धार्मिक उपयोगासाठी बायबलमध्ये अजूनही प्राचीन हिब्रू लिपीचा वापर होतो.
संदर्भ : 1. Coolmas, Flowriyan, Writing Systems : An Introduction to The Lingustic Analysis, Cambridge, 2003.
2. Diringer, David, The Story of Alpha-bet, New York, 1960.
3. Driver, G. R. Semitic Writing : From Pictograph to Alphabet, London, 1976.
4. Sampson G. Writing Systems, London, 1985.
कुलकर्णी-जोशी, सोनल