क्यूनिफॉर्म लिपि : क्यूनिफॉर्म लिपी (कील लिपी) जगातील सर्वांत प्राचीन लिपी म्हणून गणली जाते. ही लिपी युफ्रेटीस आणि टायग्रिस नद्यांच्या खोऱ्यांमधील प्रदेशात लिहिली जात असे. सुमेरियन, अकेडियन, बॅबिलोनियन व ॲसिरियन बोली या लिपीमध्ये लिहिलेल्या आढळून येतात. ही लिपी केव्हा निर्माण झाली, हे सर्वस्वी अज्ञात आहे; परंतु इ. स. पू. सु. ३५०० मध्ये ती अस्तित्वात होती, हे मात्र निश्चित. एलमाइट लोकांची रेखालिपी तसेच हायरोग्लीफिक लिपी आणि सिंधुलिपी (मोहें-जाे-दडो) यांच्याशी क्यूनिफॉर्मचे संबंध होते किंवा नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. या लिपीचे मूलस्थान कोणते, याबाबतही विद्वानांत मतभेद आहेत. परंतु ते मूलस्थान मेसोपोटेमिया असणे अधिक संभवनीय वाटते; कारण क्यूनिफॉर्म लिपीमधील हजारो मृण्मय मुद्रा मेसोपोटेमिया मध्ये सापडलेल्या आहेत.

क्यूनिफॉर्म लिपीचे प्राथमिक स्वरूप पाहिले, तर ती ⇒ चित्रलिपीच होती असे आढळून येते. चित्रलिपीमुळे बोलण्यातील आशय व्यक्त होऊ शकत असे; परंतु भाषेतील इतर अंगांची अभिव्यक्ती करण्यास ही चित्रांकित लिपी उणी पडत असे, यात शंका नाही. सर्वनामे, क्रियाविशेषणे, विशेषनामे, अव्यये हे प्रकार सूचित करण्यास ही लिपी असमर्थ होती. क्यूनिफॉर्म लिपीचे दुसरे स्वरूप म्हणजे कल्पनाचित्रांचे. एका चित्रामध्ये वस्तू, आशय आणि उच्चारण इतक्या गोष्टी अभिप्रेत असत. उदा., सूर्याकृतीने दिवस दर्शविला जात असे. शब्दसमूहासाठी आणि उच्चारण निर्देशासाठी क्यूनिफॉर्म लिपीमध्ये विशिष्ट खुणा वा चिन्हे आहेत. या खुणा क्यूनिफॉर्म लिपीचे वैशिष्ट्य असून त्या नानाविध होत्या. काही खुणा एकापेक्षा अधिक उच्चारणांची अभिव्यक्ती करीत. तसेच रेखाकृति-अक्षरांच्या आगे मागेही खुणा असत त्यामुळे शब्दनिश्चिती होत असे. या खुणांमुळे शब्दांची वर्गवारीही होत असे. उदा., देवता, पर्वत, पक्षी, वृक्ष, घर, कुंभ इ. वर्ग. बैल अपेक्षित असेल, तर बैलाचे डोके काढल्याचे दिसून येते. हातासाठी पाच बोटे माणसाचे तोंड अपेक्षित असेल, तर मनुष्याकृतीमध्ये हनुवटीवर आडवी रेघ दिलेली आढळून येते. तेलाच्या घागरीचा निर्देश असेल, तर कुंभाकृतीवर आडव्या रेघा असल्याचे दिसून येते. पुढे पुढे या चित्रलिपीचे रूपांतर रेखालिपीत झाल्याचे दिसून येते आणि नंतर या रेखालिपीचे कीलाकृती म्हणजे पाचरेसारख्या अक्षरात रूपांतर झाल्याचे दिसून येते.

कीलाकृती लेख मेसोपोटेमियामध्ये विशेष आढळून येतात. मेसोपोटेमिया हा सुपीक गाळाचा प्रदेश असल्यामुळे, तेथे मृण्मय मुद्रांचा लेखनसाहित्य म्हणून सुमेरियन लोक प्राचुर्याने उपयोग करू लागले. या मृण्मय मुद्रांवर चित्रलिपीच्या जागी नंतर कीलाकृती अक्षरे दिसू लागली. मृण्मय मुद्रांवर चित्रलिपीतील वक्ररेषा, वर्तुळ इ. काढणे अवघड होते. म्हणून लोक कोरण्यापेक्षा बोरू, हाडाची कांडी यांनी दाबून लिहू लागले आणि चित्रांच्या ऐवजी, चित्र अभिप्रेत असलेल्या कीलाकृती काढू लागले. ओल्या मातीवर बोरू अगर हाडाच्या कांडीने आडव्या किंवा उभ्या कीलाकृती दाबून काढीत. त्यामुळे मृण्मय मुद्रांवरील ही अक्षरे डाव्या बाजूला किंवा वरच्या टोकाला खिळ्याच्या डोक्यासारखी जाड व पुढे निमुळती होत गेली आहेत म्हणून या अक्षरांना क्यूनिफॉर्म म्हणजे कीलाकृती अक्षरे म्हणतात. ही अक्षरे डावीकडून उजवीकडे लिहिली जात.

क्यूनिफॉर्म लिपीचा प्रथम अवलंब करणारे लोक सुमेरियन असले, तरी ती त्यांनी शोधून काढली किंवा नाही, याबद्दल निश्चित माहिती नाही. तथापि तीत सुधारणा मात्र त्यांनी निश्चितपणे घडवून आणल्या. सुमेरियन लोक इ. स. पू. ४००० च्या सुमारास मेसोपोटेमियामध्ये आले. हजारो वर्षे सेमाइट लोकांशी त्यांचे युद्ध चालू होते. इ. स. पू. २५०० मध्ये सेमाइट लोकांनी सुमेरियान लोकांना हुसकून लावले. राजकीय दृष्ट्या सुमेरियन लोक पराभूत झाले, तरी त्यांचे सांस्कृतिक वर्चस्व इतके जबरदस्त होते, की सेमाइट लोकांनी सुमेरियन लोकांच्या लिपीबरोबरच त्यांची भाषा व साहित्यही आत्मसात केले. इ. स. पू. ३७५० ते १२५० या कालखंडात सुमेरियन लोकांनी मोठ्या तोलामोलाची साहित्यनिर्मिती केली. देवदेवतांच्या कथा, सूक्ते, महाकाव्ये इ. साहित्याचा त्यात अंतर्भाव होतो. असे साहित्य असलेल्या जवळजवळ ३,००० मुद्रा सापडलेल्या आहेत. त्यांमध्ये न्यायालयीन कायदे, त्यांचे निर्णय, हिशेब आणि खाजगी पत्रव्यवहारही सापडला आहे.

 

इ. स. पू. १८०० नंतर सुमेरियन ही बोलभाषा राहिली नाही ती धार्मिक स्वरूपाच्या लेखनाची तसेच विद्वज्जनांची भाषा बनली. क्यूनिफॉर्म लिपीचा अस्त होईतो, बॅबिलोनियन, ॲसिरियन, हिटाइट आदी बुद्धिजीवी लोक तिचा अभ्यास करीत असत.

क्यूनिफॉर्म लिपीमध्ये कालमानानुसार विशिष्ट बदल होत गेले. हे कालखंड एकूण सहा आहेत : (१) प्राचीन अकेडियन कालखंड इ. स. पू. सु. पंचविसावे ते एकोणिसावे शतक, (२) प्राचीन बॅबिलोनियन कालखंड – इ. स. पू. सु. अठरावे ते सोळावे शतक, (३) कॅसाइट कालखंड – इ. स. पू. सु. सोळावे शतक ते इ. स. पू. ११७१, (४) ॲसिरियन कालखंड – इ. स. पू. सु. बारावे ते सातवे शतक, (५) नवबॅबिलोनियन कालखंड – इ. स. पू. सु. सहावे शतक आणि (६) क्यूनिफॉर्म लिपीच्या पुनरुज्जीवनाचा व अस्ताचा कालखंड – इ. स. पू. तिसरे ते इ. स. पहिले शतक. हामुराबी (इ. स. पू. सु. १७२८—१६८६) राजवटीचा कालखंड बॅबिलोनियन साहित्याचा व विज्ञानाचा सुवर्णकाल समजला जातो. तसेच ॲसिरियातील इ. स. पू. नववे ते सातवे शतक हा कालखंडही या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. या दोन कालखंडांत साहित्य व विज्ञानासोबतच क्यूनिफॉर्म लिपीचाही पुरेपूर विकास झाला. विस्तृत विधिसंहिता कोरलेला हामुराबीचा शिलालेख (इ. स. पू. सु. १७००) प्रख्यात आहे. हामुराबीच्या काळातील जवळजवळ सर्वच प्रकारचे साहित्य व ज्ञान क्यूनिफॉर्ममध्ये लेखनबद्ध करून ठेवलेले आढळते. इ. स. पू. ८७० मधील सूर्यदेवतेच्या मृण्मय मुद्रेवर, बॅबिलोनियन राजा नबुअपलिद्दीन याने सिपारच्या मंदिराची डागडुजी केल्याचा उल्लेख आहे. ॲसिरियन राजांच्या ग्रंथालयात धर्मशास्त्र, गणित, न्याय, इतिहास, वैद्यक, ज्योतिषशास्त्र इ. विषयांचे मृण्मय मुद्रांवरील हजारो ग्रंथ आहेत. ॲसिरियन राजांनी त्यांच्या स्वाऱ्‍या आणि राजकीय हालचालीही लंबवर्तुळाकार मृण्मय मुद्रांवर लिहून ठेवल्या आहेत.

क्यूनिफॉर्म लिपी आणि अकेडियन भाषा इ. स. पू. २००० ते १२०० मध्ये आंतरदेशीय आदानप्रदानाचे माध्यम होती. सुमेरियन, बॅबिलोनियन, ॲसिरियन लोकांची क्यूनिफॉर्म हीच लिपी होती. तसेच निरनिराळ्या वंशांच्या लोकांनी आणि विविध भाषिकांनीही ही लिपी आत्मसात केली. एलमाइट, हिटाइट, मितानियन, हुरियन, ऊरार्तू, पर्शियन इ. लोकांनी ही लिपी आत्मसात केली. एलमाइट, हिटाइट, व पर्शियन लोकांनी तर तीत मोलाची भर घातली. पर्शियातील खुझिस्तान प्रांत हाच पूर्वीचा एलम प्रदेश होता. या देशाचा बायबलमध्ये तसेच बॅबिलोनियन आणि ॲसिरियन लेखांतून उल्लेख आलेला आहे. एलमाइट लिपीचे क्यूनिफॉर्म लिपीशी साम्य असल्याचेही दिसून येते. त्यांतील कोणती लिपी अधिक प्राचीन आहे, हा मात्र संशोधकांमध्ये वादाचा मुद्दा आहे.

क्यूनिफॉर्म लिपी इ. स. पू. ५०० नंतर मात्र लेखनातून नाहीशी होऊ लागली. ख्रिस्तकालापावेतो धर्मगुरू, न्यायाधीश, ज्योतिषी यांनी ती जतन करून ठेवली होती. त्यानंतर या लिपीचा अस्त झाला. एकोणिसाव्या शतकात इंग्रज, फ्रेंच, जर्मन, डॅनिश आणि आयरिश विद्वानांनी ही लिपी वाचण्याचे प्रयत्न केले. जार्ज फ्रीड्रिख गॉटफेन्ट या जर्मन माध्यमिक शिक्षकाने १८०२ मध्ये या लिपिवाचनाचा पाया घातला. नंतर सर हेन्‍री रॉलिन्सन याने १८४६ मध्ये तीन भाषांत लिहिलेला ‘बिहिस्तून’लेख वाचला. त्यानंतर बॅबिलोनियन आणि ॲसिरियन लिपी वाचण्यात आल्या आणि त्या लिपींच्या साहाय्याने क्यूनिफॉर्म लिपी वाचली गेली.

संदर्भ :

  • Diringer, David, The Alphabet, Vols. I, II,  London, 1968.
  • Diringer, David, Writing, London, 1962.

 लेखक : गोखले, शोभना ल.