मोहें-जो-दडो लिपी कोरलेल्या तीन मुद्रा, सिंधू, संस्कृती.

मोहें-जो-दडो लिपि : मोहें-जो-दडो लिपी भारत आणि पाकिस्तानातील ज्ञात असलेली सर्वांत प्राचीन लिपी आहे. पाकिस्तानमध्ये मंगमरी जिल्ह्यातील हडप्पा आणि सिंध प्रांताच्या लार्कान जिल्ह्यातील मोहें-ज-दडो या गावी ही लिपी असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या आहेत. १९२२ मध्ये जॉन मॉर्शल यांनी दोन्ही ठिकाणी उत्खनन केले. या उत्खननातून एका ब्राँझयुगीन संस्कृतीचा नव्याने आविष्कार झाला. सिंधूच्या खोऱ्यातील लोकांना लेखनकला अवगत होती, हे या उत्खननांवरून समजले म्हणूनच या लिपीला ‘सिंधुलिपि’ किंवा ‘मोहें-जो-दडो लिपि’ असे नामाभिधान प्राप्त झाले. १९३४ साली जी. आर्, हंटर यांनी ही लिपी वाचण्याचा प्रयत्न केला. एल. ए. वॅडेल यांनी या लिपीचा सुमेरियन लिपिशी संबध जोडला आणि तीत वेदांतील वीरांची नावे असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. प्राणनाथ यांनी या लिपीचा तंत्रमार्गातील चिन्हांशी वा खुणांशी संबंध जोडला. बारुआ आणि शंकरानंद यांनी ही लिपी अक्षरलिपी असल्याचे प्रतिपादन केले. बी. ऱ्होझ्नी यांनी तिचा प्राक्-हिटाइट लिपीशी संबंध जोडला. फादर हेरास यांच्या मते सिंधू संस्कृतीचे लोक द्राविडी असून त्यांची भाषा द्राविडी असावी. मेरिग्गी यांच्या मताप्रमाणे कल्पना आणि उच्चारण यांचा या लिपीत मिलाफ झालेला आढळून येतो. अशा तऱ्हेची या लिपीबाबत संशोधकांची निरनिराळी मतमतांतरे आहेत, परंतु कुणाच्याही संशोधनातून निश्चित स्वरूपाचे उत्तर आजपर्यंत तरी बाहेर आले नाही. सी. एफ्. गॅद, सिडनी, स्मिथ, लँग्डन व हंटर यांनी मुद्रांवरील खुणांची जंत्री केली. प्रत्येक खुणेचा अर्थ काय असेल याचा कयास बांधला. जे फ्रीड्रिख यांनी ज्ञात लिपींतूनच अज्ञात लिपी वाचणे शक्य आहे म्हणून द्वाभाषिक लेख सापडल्याशिवाय मोहें-जो.दडो लिपी वाचली जाणार नाही, असे प्रतिपादन केले. मोहें-जो-दडो येथील उत्खननांत आतापर्यंत मुद्रांवर आणि खापरांवर लिहिलेले फुटकळ लेख सापडले आहेत, परंतु मोठे लेख अद्याप सापडले नाहीत. अहमद हसन दानी यांनी मकॉय आणि मार्शल यांच्या अहवालांतील या लिपीआकृत्यांचे वर्गीकरण केले. त्यानुसार मनुष्याकृती, मत्स्याकृती, पक्ष्यांच्या, आकृती, चतुष्पादप्राणी, भौमितिक आकृत्या, कुंभ, पिंपळपान इ. आकृत्यांचे वर्ग त्यांनी केले. पक्ष्यांच्या खुणांमध्ये घुबड, कावळा, मोर, कोबडी यांची चित्रे आहेत, तथापि खरा प्रश्न आहे तो ह्या चित्रांवरील खुणांचा. काही खुणा पोटावर, तर काही शेपटीवर आहेत. माशांच्या खुणांच्या बाबतीतही तेच आहे. या लिपीतील पक्ष्यांची तोंडे डावीकडे असल्यामुळे लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे असेल असे काही संशोधकांचे मत आहे, तर काहींच्या मते सिंधू लिपी डावीकडे उजवीकडे लिहिली जात असावी. जॉन मार्शल यांच्या मते नांगरटीच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे पहिली ओळ उजवीकडून डावीकडे आणि दुसरी ओळ डावीकडून उजवीकडे अशी क्रमशः ही लिपी लिहिली जात असावी. संशोधकांनी सिंधु लिपीतील कुंभ, फुली, शिंगे, चार-सहा आंस असलेली चक्रे धनुष्यबाण, पाणी, डोंगर, कमानी, झाडे, भौमितिक आकृत्या इ. प्रकारे वर्गीकरण केले आहे, परंतु ती वाचण्याची गुरुकिल्ली अद्याप तरी सापडली नाही. संशोधकांनी ही लिपी वाचण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न केले.

मोहें-जो-दडो लिपीतील मद्रालेखांचे काही नमुने, सिंधू, संस्कृती.एस. के. रॉय, फतेहसिंह, आय्‌. महादेवन, एस. आर. राव प्रभृती अभ्यासकांनी ह्या लिपीच्या वाचनाचे प्रयत्न केले आहेत. पॅसिफिकमधील ईस्टर बेटांवरील (रापा नुई बेटे) लाकडी ठोकळ्यावरील लिपीशी तिचे साम्य असल्याचे हंगेरियन अभ्यासक एम्‌.जी.दे हेव्हेंसी यांनी १९३३ मध्ये म्हटले आणि त्यामुळे ह्या लिपीच्या अभ्यासास एक वेगळीच कलाटणी मिळाली. ईस्टर बेटांवरील लिपीशी तिच्या तुलनात्मक अभ्यासास चालना मिळाली. संगणकाच्या मदतीने ह्या मुद्रांवरील लिपी उलगडण्याचे प्रयत्न रशिया तसेच स्कँडिनेव्हियात सुरू आहेत. सुमेरियन, ⇨ क्यूनिफॉर्म लिपी तसेच ईजिप्ती ⇨ हायरोग्लिफिक या लिपि वाचल्या गेल्या, परंतु सिंधु लिपीच्या बाबतीत संशोधकांना वाचनासाठी निश्चित स्वरूपाचे धागेदोरे अद्याप तरी मिळाले नाहीत.

संदर्भ : 1. Dani, A. H. lndian Palaeography, Oxford, 1963.

             2. Diringer, David. The Alphabet, 2. Vols., London, 1968.

             3. Mahadevan. I. The Indus Script: Texts, Concordance and Tables, New Delhi, 1977.

             4. Rao, S. R. The Decipherment of Indus Script, Bombay, 1982.

             5. Ray, S. K. Indus Script, New Delhi, 1963.

             ६ ओझा, गौराशंकर, प्राचीन भारतीय लिपिमाला, नवी दिल्ली, १९७७.

             ७. गोळेगांवकर, श्री, के. मोहेन्‌जोदरो : लिपि,समाज आणि संस्कृती (पूर्वार्ध), नागपूर, १९७५.

गोखले, शोभना