लेखनविद्या : लेखन करण्याची कला किंवा पद्धत. जगातील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करताना असे लक्षात येते, की माणसाने परस्पर सुसंवाद निर्माण करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला होता. प्रागैतिहासिक काळात मानवाने भोवतालच्या घटना, शिकार व आनंद यांचे प्रसंग दगडांवर रंगीत चित्रे काढून टिपलेले आढळतात. चित्रांशिवाय मानवाने वस्तूंची मोजदाद ठेवण्यासाठी काठ्या, दगड, कवड्या, दोरीच्या गाठी इत्यादींचाही वापर केला. याचा चित्रलिपीशी प्रत्यक्ष संबंध नसला, तरी चित्रांतून सुसंवाद कळतो, ही गोष्ट माणसाच्या ध्यानात आली होती.

जगातील लिप्यांचा अभ्यास करताना असे आढळते, की माणसाने त्याच्या विचारांची अभिव्यक्ती प्रथम चित्ररूपाने केली. लिपीची उत्पत्ती व तिचे स्वरूप या दोन्ही गोष्टी दैवी आहेत, असा सर्वसामान्य समज आहे. बॅबिलोनियात सर्व लेखकांचा देव नबूहोता. ईजिप्त संस्कृतीमध्ये लिपीचा अधिकर्ता थॉन हा होता. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मा ही लिपींची अधिष्ठात्री देवता मानली आहे. जगातील प्राचीन लिपीचा उगम ईजिप्तमध्ये झाला (इ. स. पू. ३०००). मेसोपोटेमिया (इराक) मधील क्यूनिफॉर्म लिपीचा उगम ज्यांतून झाला आहे, ती चिन्हे इ. स. पु. ३५००-३००० या काळातील आहेत. आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी प्रारंभी चित्रांचा वापर केलेला आढळतो. उदा., मेंढ्या कररूपाने द्यावयाच्या असतील, तेथे मेंढ्यांची चित्रे, तर गवताच्या पेंढ्या असतील त्या ठिकाणी गवताच्या पेंढ्यांची चित्रे आढळतात. या चित्रलिपीतूनच कल्पनाचित्रांचा उगम झाला. उदा., नागमोडी रेषा हे नदीचे, तर सूर्य किंवा गोल हे दिवसाचे चिन्ह म्हणून वापरण्यात आले परंतु प्रत्येक वेळी अनेक चित्रे काढणे जिकिरीचे होऊ लागल्याने चित्रांची जागा पुढे निरनिराळ्या खुणांनी घेतली. ईजिप्तमध्ये केलेल्या उत्खननांमध्ये आमेनहोतेप ह्या लेखकाचा पुतळा सापडला असून त्याच्या डाव्या हातात पपायरसच्या कागदाची गुंडाळी आहे (इ.स.पू. १४००), असा उल्लेख ईजिप्त संस्कृतीमध्ये आढळतो.  

भारतामधील सिंधू संस्कृतिकालीन चित्रलिपी ही सर्वांत प्राचीन समजली जाते. मोहेंजोदडो येथील उत्खननांमध्ये पशु-पक्षी, मानवाकृती तसेच भौमितिक आकृत्या असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या. त्या चित्रांचा अर्थ लावण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला परंतु त्यांचे समाधानकारक वाचन झालेले नाही. डॉ. महादेवन, एस्. आर्. राव इ. संशोधकांनी ही चित्रलिपी वाचण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननांमध्ये कोणताही मोठा लेख त्याचप्रमाणे द्वैभाषिक लेखही सापडला नाही. [→चित्रलिपि ]. 

भारतात लेखनाचा सर्वांत प्राचीन पुरावा मौर्यसम्राट अशोकाच्या लेखांत आढळतो. या लेखांची लिपी è ब्राह्मी आहे. ही लिपी नॉर्थ सेमिटिक लिपीपासून उत्पन्न झाली, असे मत भारतीय लिपी व भारतीयविद्येचे सर्वश्रेष्ठ जर्मन अभ्यासक आणि संशोधक è योहान गेओर्ख ब्यूलर यांनी विशद केले आहे. सिंधू लिपी आणि अशोककालीन ब्राह्मी लिपी यांमध्ये जवळजवळ १५०० वर्षांचा कालखंड असून त्यांत कोणताही लेखनविषयक पुरावा उपलब्ध नाही.  

पाणिनीच्या अष्टाध्यायीत (इ. स. पू. पाचवे वा चौथे शतक) लिपी, लिपिकर हे शब्द आढळतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात (१.५.२) लेखनविषयक पुरावे आहेत. म्हणूनच संस्कृतीचे जतन करण्यासाठी मुलाचे चौलकर्म झाल्यानंतर त्यास लिपी व पाढे शिकवावेत, असे विधान केलेले आढळते. वृत्तचौलकर्मा लिपिसंख्यानम् वोपयुत्र्जीत. 

बौद्ध वाङ्‌मयात बरेच लेखनविषयक पुरावे आहेत. पिटकात बौद्ध साधूचे आचार-नियम सांगितले असून त्यांत लेखनकलेचे पुरावे आढळतात. लेख व लेखक हे दोन्ही शब्द भिक्खुपाचित्य (२.२) भिक्खुणीपाचित्य (४९.२) या ग्रंथांमध्ये आलेले आहेत. भिक्खुपाचित्यामध्ये लेखन ही ज्ञानमार्गाची शाखा असून तिचा सर्वत्र बहुमान होतो, असे नमूद केले आहे. बौद्ध भिक्षूंना अन्य ऐहिक कला शिकण्यास मनाई, तर लेखनविद्या शिकण्याची आज्ञा केली होती. खाजगी, राजकीय आज्ञापत्रे, कर्जाऊ रकमांचा करार, धर्मनियम, कुटुंबातील प्रमुख घटना सुवर्णपत्रांवर कोरवून घेतल्याचा तसेच लेखन व्यवसाय गृहस्थाश्रमी लोकांचे चरितार्थाचे साधन असल्याचा जातक कथांमधून उल्लेख आढळतो. ललितविस्तर या ग्रंथात पाठशाळेमध्ये विश्र्वामित्र नावाच्या गुरूजवळ चंदनाच्या पाठीवर सोन्याच्या लेखणीने गौतम बुद्ध लिहावयास शिकला, असा उल्लेख आहे. 

अशोककालीन ब्राह्मी लिपीमध्ये ऱ्हस्व, दीर्घ, गुण, वृद्धी, व्यंजनांतर्गत स्वर आणि उच्चारणाप्रमाणेच अक्षरांचे स्वरूप दिसून येते. नॉर्थ सेमिटिक लिपीमध्ये ‘अ’ साठी आलेफ, तर ‘ग’ साठी जिमेल अशी अक्षरे आली आहेत. ह्याच लिपीमध्ये ‘अ’ साठी अ ची खूण, ‘ग’ साठी ग ची खूण म्हणजेच प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र खूण आहे. प्राचीन काळी मुखस्थ विद्येवर भर होता. संस्कृत पंडित उच्चारणाराला अधिक महत्त्व देत असत. प्रत्येक वर्गामध्ये मृदू व्यंजने, कठोर व्यंजने तसेच त्यांवर प्रत्येक वर्गाचे अनुनासिक, हे सगळे बारकावे ह्या लिपीत आहेत. हे भारतीय लिपीकारांचेच कौशल्य म्हणावे लागेल. उदा., प्रत्येक अक्षर हे हलन्त आहे. ग् + अ = ग.

लेखनकलेचे महत्त्व आणि तिचा काटेकोरपणा लक्षात घेऊन सम्राट èअशोकाने लेखनासाठी विशेष निष्णात अधिकाऱ्यांची नेमणूक केली. अशोककालीन लिपीचे स्वरूप साचेबंद असले, तरीसुद्धा त्या लिपीमध्ये काही प्रादेशिक फरक आढळून येतात. गिरनार येथील चौदाव्या शिलालेखात अशोकाने असे म्हटले आहे, की धम्म लिपी लिहिताना जर काही चुक आढळली तर तो लिपिकाराचा दोष आहे.

दक्षिण भारतामध्ये सातवाहनकाळात (इ. स. पू. २५०-२२७) राजाने शिलालेख लिहिण्यासाठी लेखकांची नेमणूक केलेली होती. नासिक येथील सातवाहनकालीन लेखांमध्ये लेखकांचे उल्लेख आले आहेत. लेखक शिवामेताचा मुलगा रामणक याने एका गुंफेचे दान दिल्याचा, तर दुसऱ्या लेखामध्ये लेखक विष्णुमित्राचा मुलगा शक दमविक बुधिक याच्या दानाचा उल्लेख आहे. नासिकमधील इतर लेखामंध्ये ‘क्षत’, ‘उत्कीर्ण’, ‘लिखित’ असे लेखनविषयक शब्द आले आहेत. यांवरून नासिक येथे लेखकपरंपरा असल्याचे स्पष्ट होते. नाणेघाटातील सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिचा लेख सर्वांत जुना असला, तरी त्यामध्ये मात्र लेखकाचे नाव आढळत नाही.

अशोकाच्या लेखानंतर उत्तर भारतात महास्थान, सोहगौडा, घोसंडी येथेही लेख सापडले आहेत. त्यांचा काळ इ. स. पू. दुसरे शतक आहे. भारहूत, सांची, पभोसा, अयोध्या येथील लेखांचा काळ इ.स.पू. दुसरे ते इ.स.पू. पहिले शतक आहे. वर निर्देश केलेल्या लेखांतील अक्षरवटिकांचा अभ्यास केल्यास त्यांमध्ये अक्षरांची उंची, जाडी, वेलांट्या-लपेट्या यांतून लेखकाची कला दिसून येते. या वेलांट्या-लपेट्यांवरूनच त्यांचा काळ व देशविशेष संशोधक ठरवितात. उत्तरेकडे कुशाणांच्या स्वाऱ्या  झाल्या गुजरात, माळवा या भूविभागांवर क्षत्रप राजे राज्य करू लागले. या नवीन संस्कृतीचा पगडा भारतीय संस्कृतीवर पडला. तत्कालीन लोकजीवनावर त्याचे अनेक पडसाद उमटले. अर्थातच लेखनकलादेखील यापासून अलिप्त राहू शकली नाही.


कुशाण राजांनी इंडो-ग्रीक राजांच्या लेखनपद्धतीचे अनुकरण केले. त्यांच्या लेखांतून ब्राह्मी लिपीचे स्वरूप तसेच बसके आणि ठसठशीत आढळते. इंडो-ग्रीक राजांच्या नाण्यांवरील ग्रीक अक्षरे ठाशीव, उठावाची आणि बसकी होती. लिपी आणि तिचा कलापूर्ण आविष्कार या गोष्टी लेखांची कालमर्यादा ठरविण्यास उपयोगी पडतात. इतकेच नव्हे, तर त्या संस्कृतीचे प्रतिनिधित्वही करतात.

चौथ्या शतकात गुप्त राजे भारताचे सम्राट झाले. गुप्तसाम्राज्याच्या प्रारंभकाळात कुशाण संस्कृतीच्या खुणा पुरत्या पुसल्या नव्हत्या. द्वितीय चंद्रगुप्ताच्या मथुरा येथील लेखांत काही कुशाणकालीन अक्षरे दिसून येतात. गुप्तसाम्राज्याचा विस्तार पश्र्चिमेकडे गुजारातपर्यंत झाला होता. त्यामुळे पूर्वेकडील गुप्तलिपी आणि पश्र्चिमेकडील गुप्तलिपी असे गुप्तलिपीचे दोन प्रकार दिसून येतात. कीलक शीर्षक लिपीचा उदय याच काळात झाला. भरताच्या मध्यभागात वाकाटक राजे व त्यांचे मांडलिकशरभपूरचे राजे यांनी पेटिका शीर्षक लिपीचा अवलंब केलेला आहे. पेटिका शीर्षक लिपीचे भरीव लेख अजिंठा येथे आहेत. ओरिसा व कर्नाटक राज्यांतही या लिपीतील लेख आढळून येतात.

दक्षिणेकडील ब्राह्मी लिपी वेगळ्या पद्धतीची होती. तिसऱ्या शतकातील इक्ष्वाकू राजांच्या लेखांत अक्षरांच्या शेपट्या लांब होऊन त्या डावीकडे वळलेल्या अर्कुल्या झाल्या. सातव्या-आठव्या शतकानंतर ब्राह्मीचे रूप निरनिराळ्या प्रदेशांनुरूप बदलत गेले. (१) उत्तर भारत, (२) गुजरात, राजस्थान व मध्य भारत, (३) दक्षिण भारत, (४) अतिदक्षिणेकडील लिपी, ब्राह्मी लिपीचे प्रमुख भेद झाले. नवव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत भारतामध्ये नागरी लिपीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. यानंतरच्या कालखंडात गंगेच्या खोऱ्यातील पद्धती पूर्वेकडील राजस्थानी, काठेवाडी, दक्षिणी, म्हैसुरी, माहाराष्ट्री, आंध्री आणि अतिदक्षिणेकडील पद्धती असे नागरीचे विविध प्रकार झाले [→नागरी लिपि].

अक्षरांचे वळण सुंदर करणे, कोरणीची पद्धत, लपेटीने अगर धासून लिहिणे या गोष्टींवरच लिपींमधील फरक आढळून येतात. निरनिराळ्या प्रदेशांमध्ये लेखकवर्गाच्या कलात्मक लेखनामुळेच लेखनपद्धतीत विविधता निर्माण झाली. अकराव्या-बाराव्या शतकांपासून लिपीवर प्रादेशिकतेचा पगडा बसला. त्यामुळे या कालखंडातील शिलालेख प्रादेशिक लिपीत लिहिलेले आढळतात.

दहाव्या शतकाच्या प्रारंभी अखिल भारतामध्ये थोड्याफार फरकाने लेखकवर्गाने नागरी लिपीचा अंगीकार केलेला आढळतो. राधनपूर येथील ताम्रपटांत तसेच परमारवंशी राजा वाक्पतिराज आणि राष्ट्रकूट राजा तृतीय गोविंद यांच्या वणीदिंडोरी ताम्रपटांत ह्या लिपीचा निर्देश आहे. दाक्षिणात्य लिपीत गुर्जरवंशी राजाचे ताम्रपट लिहिलेले असले, तरी त्याची सही मात्र ह्या लिपीतच आढळते. महाराष्ट्रात यादव आणि शिलाहार राजांनी ह्या लिपीला राजाश्रय दिल्यामुळे यादवांच्या व शिलाहारांच्या लेखांतून तसेच ताम्रपटांतून ह्या लिपीचाच उल्लेख केलेला आहे. इतकेच नव्हे, तर लेखकवर्गातही ही लिपी प्रिय झालेली दिसते.

सम्राट अशोक याच्या काळापासून (इ.स.पू ?३०३-?-२३२) बाराव्या शतकापर्यंत लिपींचे भिन्न प्रकार आढळतात देशविशेषांप्रमाणे आणि कालमानाप्रमाणे लेखनाच्या पद्धतींमध्येही फरक दिसून येतात. ताम्रपटांतून व शिलालेखांतून लेखकांची तसेच कोरक्यांची नावे असली, तरी लेखकाने कसे लिहावे, अक्षरे कशी काढावीत यांबद्दलचे उल्लेख आढळत नाहीत. लेखकवर्गांनी आपापल्या प्रदेशांतून भिन्न लेखनपरंपरा निर्माण केल्या आणि त्यांतूनच आपणास लेखनकलेचे विविध पुरावे आढळतात. दासबोधात तर अक्षरासंबंधीचा स्पष्ट उल्लेख दिसतो (१९.१.१-४). 

ब्राह्मणें बाळबोध अक्षर | घडसून करावें सुंदर || 

जें देखतांचि चतुर | समाधान पावती || १ || 

वाटोळें सरळ मोकळें। वोतलें मषीचें काळें || 

कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळें | मुक्तमाळा जैसा || २ || 

अक्षर मात्र तितुकें नीट | नेमस्त पैस काने नीट || 

आडव्या मात्रा त्याहि नीट | अर्कुलीं वेलांट्या || ३ || 

पहिलें अक्षर जें काढिलें | ग्रंथ संपेतों पाहात गेलें || 

एका टांकेंचि लिहिलें | ऐसें वाटें || ४ ||

पहा : चित्रलिपि नागरी लिपि ब्राह्मी लिपि.

संदर्भ : 1. Dani, A. H. Indian Palaeography, Oxford, 1963.

           2. Denman, Frank, The Shaping of our Alphabet, New York, 1955.

           3. Diringer, David, Writing, New York, 1962.

           4. Driver, Godfrey R. Semitic Writing from Pictograph to Alphabet, London, 1976.

           5. Gelb, Ignace, A Study of Writing.Chicago, 1952.

           6. Mason, William, A. A History of The Art of Writing, New York, 1920.

           7. Mercer, Samuel, The Origin of Writing and Our Alphabet, London, 1959. 

           ८. तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे, १९६३.  

कुलकर्णी, वृंदा गोखले, शोभना