शारदा लिपि :  पूर्वी ‘शारदादेश’ किंवा ‘शारदामंडल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू – काश्मीर प्रदेशातील लिपी. मूळ शारदा लिपी इ. स. आठव्या शतकाच्या सुमारास पश्चिमेकडील गुप्त लिपीतून निर्माण झाली आणि काश्मीर, चंबा, कांग्रा व पंजाबमध्ये तिचा प्रसार झाला. या भागांत शारदा लिपीतील शिलालेख, दानपत्रे, नाणी आणि हस्तलिखिते सापडली आहेत. या लिपीमधूनच पुढे गुरुमुखी आणि टाकरी या लिप्या निर्माण झाल्या.

कांग्रा येथील आठव्या शतकातील वैजनाथ प्रशस्तिलेखात शारदा लिपी आढळून येते. याच काळातील वर्मन घराण्याच्या नाण्यांवर शारदा लिपीतील अक्षरे आढळतात. पाकिस्तान – पंजाबमधील युसुफझई जिल्ह्यातील बक्शाली येथे दहाव्या-अकराव्या शतकांतील शारदालिपीमधील हस्तलिखित सापडले आहे. या लिपीतील अक्षरांचे कुशाणांच्या ब्राह्मी लिपीतील अक्षरांशी साम्य वाटते. ‘इ’ अक्षर दोन टिंबे आणि खाली ‘इ’ सारखे अक्षर यांनी दर्शविले आहे. ‘ब’ चे चौकोनी आणि ‘ड’ चे कोनयुक्त स्वरूप जाऊन त्या अक्षरांना गोलाई प्राप्त झाली. ‘घ’ हा देवनागरीतील ‘प’प्रमाणे दिसतो. ‘श’ हा देवनागरी ‘स’ प्रमाणे दिसतो. पश्चिमी गुप्त लिपीतील ‘य’, ‘ण’, ‘इ’ या अक्षरांशी शारदा लिपीतील त्या त्या अक्षरांचे साम्य असल्यामुळे शारदा लिपी सातव्या शतकापूर्वीची नसावी, असे म्हणता येईल. नवव्या-दहाव्या शतकांतील शारदा लिपीत बराच फरक आढळून येतो. उदा., उ, ए, ऐ, ओ, औ, ज, ञ, भ, थ या अक्षरांत एकदम बदल झालेला दिसून येतो. अ. इ. आणि य ह्या अक्षरांच्या डोक्यावर लांब आडव्या रेघा दिसून येतात. लिपीचे सर्वसाधारण स्वरूप ठाशीव आहे.

टाकरी म्हणजे शारदा लिपीचे मोडी स्वरूप. टाकरी हे नाव कसे पडले, याबद्दल निरनिराळी मते आहेत. टांक जातीच्या व्यापाऱ्याची ही लिपी असल्यामुळे तिचे नाव ‘टॉवारी’ पडले असावे किंवा राजपुतांपैकी ठाकूर लोकांची लिपी म्हणून तिचे नाव ठाकरी &gt टाकरी पडले असावे. या लिपीतील इ. ई, उ, ए, ग, घ, च, ञ, ड, ढ, त, थ, द, ध, प, भ, म, य, र, ल आणि ह ही अक्षरे शाखा लिपीतील अक्षरांशी जुळती आहेत. अक्षरे लपेटीने, घाईने, हात न उचलता लिहिली जात असल्यामुळे बाकीच्या अक्षरांत फरक पडतो. जम्मू भागात लोक जी लिपी वापरतात, तिला ‘डोग्री लिपी’ म्हणतात. चंबा भागातील लिपीला ‘चमिआलि लिपी’ म्हणतात. या दोन्ही लिपी टाकरीच्याच भगिनी आहेत. टाकरी लिपीत ऱ्हस्व-दीर्घ स्वरांचा फारसा विधिनिषेध आढळून येत नाही. व्यंजनापुढे स्वराची खूण न करता स्वर लिहीत असत. त्यामुळे टाकरी लिपीत लिहिलेले शिलालेख वाचणे अतिशय कठीण जाते.

पहा : गुरुमुखी लिपी ब्राह्मी लिपी.

संदर्भ : 1. Buhler, Georg, On the Origin of the Indian Brahma Alphabet, Varanasi, 1963.  

            2. Upasak, C. S. The History and Palaeography of Mauryan Brahmi Script, Nalanda, 1960.

            ३. ओझा, गौरीशंकर हिराचंद, भारतीय प्राचीन लिपीमाला, दिल्ली, १९५९.                        

गोखले, शोभना