तक्षशिला येथे सापडलेल्या एका रौप्यपत्रातील खरोष्ठी वर्ण, इ. स. दुसरे शतक.

खरोष्ठी लिपि : खरोष्ठी लिपीचे नाव अन्वर्थक आहे. गाढवाच्या ओठासारखी लपेटी असलेली ही लिपी, नॉर्थ सेमिटिक लिपीतून उत्पन्न झालेल्या ⇨ ॲरेमाइक लिपीपासून उत्पन्न झाली, असे ब्यूलर इ. विद्वानांचे मत आहे. कनिंगहॅम व इतर काही तज्ञांच्या मते खरोष्ठो हे नाव फा-वान-शु-लिन (६६८) या चिनी कोशात आणि इ. स. पू. तिसऱ्या शतकातील ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात उल्लेखिलेले आहे. सेस्तान, कंदाहार, अफगाणिस्तान, स्वात, लडाख, चिनी तुर्कस्तान, तक्षशिला या भागांत खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेला मात्र या लिपीचा प्रसार झालेला दिसून येत नाही. तिच्या या मर्यादित क्षेत्रामुळे संशोधकांनी तिला निरनिराळी नावे दिली आहेत. सी. लासेन (१८००-७६) याने ‘काबुली लिपी’, विल्सन याने ‘ॲरिॲनियन लिपी’ आणि ए. कनिंगहॅम याने ‘गांधार लिपी’ असे तिचे नामकरण केले. खरोष्ठी लिपीतील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे ‘बॅक्ट्रा-पाली’ किंवा ‘ॲरिॲनो-पाली’ ही नावेसुद्धा तिला मिळाली आहेत. बॅक्ट्रियन-ग्रीक राजांच्या नाण्यांवर ही लिपी आढळून आल्यामुळे तिला ‘बॅक्ट्रियन लिपी’, ‘इंडो-बॅक्ट्रियन लिपी’ अशीही नावे मिळाली आहेत. फ्रेंच प्रवासी द्यूत्र्य द रॅन्स (१८४६-९४) तसेच स‌र आउरेल स्टाइन (१८६२-१९४३) आणि स्टेन कॉनॉव्ह (१८६७-१९४८) यांना खरोष्ठी लिपीतील लेख सापडले. स्टेन कॉनॉव्ह याने खरोष्ठीतील लेख कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम (खंड दुसरा, भाग पहिला, १९२९) या ग्रंथात प्रसिद्ध केले. पश्चिम पाकिस्तानमधील हझार जिल्ह्यातील मानसेहरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाझगढी येथे  अशोकाचे खरोष्ठीमधील लेख सापडले असून हे लेख स‌र्वांत जुने (इ. स‌. पू. तिसरे शतक) आहेत. कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाइक अशा दोन लिपींत असलेला अशोकाचा लेख सापडला आहे. कुशाणांच्या राजवटीतील खरोष्ठी-लेख मथुरेला सापडले आहेत. खरोष्ठी लिपी क्षत्रपांच्या नाण्यांवर तसेच शहरात राजांच्या नाण्यांवर आढळून येते. हूणांच्या स्वाऱ्यांनंतर (इ.स. पाचवे शतक) मात्र खरोष्ठीचा भारतात मागमूसही उरला नाही.

ब्राह्मीप्रमाणेच खरोष्ठीचे लेख प्रस्तर, धातूचे पत्रे, नाणी, उंटाचे कातडे, भूर्जपत्र यांवर सापडतात. खोतान येथे दुसऱ्या शतकातील खरोष्ठी लिपीत लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडले आहे. कोरणे आणि लेखणीने उंटाच्या कातड्यावर अगर भूर्जपत्रावर लिहिणे, अशा खरोष्ठी लेखनाच्या दोन पद्धती आहेत. खरोष्ठी लिपीच्या अभ्यासावरून असे दिसते, की तीत एक प्रकारचा साचेबंदपणा आहे. एकच ठरीव साच्याची अक्षरवटिका खरोष्ठीमध्ये असली, तरी कोणत्याही भाषेतील उच्चारवैचित्र्य अक्षरांकित करण्याचे सामर्थ्य या लिपीत आहे. या लिपीतील उच्चारचिन्हांमुळे कोणत्याही शब्दातील ध्वनीची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य तिच्यात असल्याचे दिसून येते. ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाई. धातूमध्ये फरक पडला, तर अक्षरवटिकेत थोडाफार फरक आढळतो परंतु एकदा एखाद्या धातूवर लिहिण्याची पद्धत पडून गेली, तर तीच पद्धत कसोशीने पाळली जाई. त्यामुळे खरोष्ठी लेखांची कालानुरूप परंपरा लावणे कठीण आहे. ब्यूलरच्या मते खरोष्ठी लिपी ब्राह्मी लिपीपेक्षाही अधिक लोकप्रिय होती. ती तत्कालीन ग्रांथिक लिपी होती. १८३३ मध्ये जनरल व्हेंटुरा यांनी माणिक्याल स्तूपाचे उत्खनन केले. त्यात खरोष्ठी आणि ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली. ती ई. नॉरिस, कर्नल मॅसन, कनिंगहॅम व जेम्स प्रिन्सेप यांनी वाचली आणि अशा तऱ्हेने खरोष्ठी लिपी वाचण्याची गुरुकिल्ली इंडो-ग्रीक राजांच्या द्वैभाषिक नाण्यांमुळे उपलब्ध झाली.

संदर्भ : 1. Buhler, George, Indian Palaeography, Calcutta, 1962.

          2. Dani, A. H. Indian Palaeography, Oxford, 1963.

          3. Dasgupta, C. C. Development of the Kharosthi Script, Calcutta, 1958.

          4. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.                         

गोखले, शोभना ल.