हिचिंग्ज, जॉर्ज हर्बर्ट : (१८ एप्रिल १९०५–२७ फेब्रुवारी १९९८). अमेरिकन औषधिक्रियावैज्ञानिक. अनेक महत्त्वाच्या रोगांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असणारी औषधे विकसित केल्याबद्दल हिचिंग्ज यांना गर्ट्रड बी. एलिअन आणि सर जेम्स डब्ल्यू. ब्लॅक यांच्यासमवेत १९८८ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

 

जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्ज
 

हिचिंग्ज यांचा जन्म होक्वीअम( वॉशिंग्टन, अमेरिका) येथे झाला. त्यांनी पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर शिक्षण वॉशिंग्टन विद्यापीठात पूर्ण केले. १९३३ मध्ये त्यांनी जीव-रसायनशास्त्रातील पीएच्.डी. पदवी हार्व्हर्ड विद्यापीठात संपादन केली. त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात १९३९ पर्यंत अध्यापन केले. १९४२ मध्ये त्यांनी बरोझ वेलकम लॅबोरेटरी याठिकाणी संशोधनाला सुरुवात केली आणि से वा नि वृ त्त होईपर्यंत (१९७५) तेथेच राहिले. 

हिचिंग्ज यांनी एलिअन यांच्यासोबत सु. ४० वर्षे काम केले.एलिअन सुरुवातीला बरोझ वेलकम लॅबोरेटरीमध्ये हिचिंग्ज यांचे साहाय्यक होते व नंतर ते सहकारी झाले. त्यांनी विविध नवीन औषधांची निर्मिती केली. ही औषधे विशिष्ट रोगकारकांच्या व कोशिकांच्या जैव प्रक्रियांना परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले. १९५० मध्ये त्यांनी थायोग्वानीन आणि ६-मरकॅप्टोप्यूरीन (६-चझ) ही औषधे विकसित केली. रक्तार्बुदाच्या उपचारासाठी ती महत्त्वपूर्ण ठरली. १९५७ मध्ये त्यांनी मरकॅप्टोप्यूरिना-मध्ये बदल करून ॲझाथायोप्रिन निर्माण केले. हे औषध संधिवाताभ संधिशोथ व आत्मप्रतिरक्षा विकारांसाठी आणि शरीराद्वारे होणारा प्रतिरोपित अवयवांचा अस्वीकार यांसाठी उपयुक्त उपचार ठरले. त्यांचे दुसरे एक औषध ॲलोप्यूरिनॉल ⇨ गाऊट विकारासाठी परिणामकारक ठरले. हिचिंग्ज आणि एलिअन यांनी विकसित केलेल्या इतर औषधांमध्येहिवतापप्रतिबंधक पिरिमिथॅमाइन, मूत्रवाहिनी व श्वसन संस्था यांमधील सूक्ष्मजीव संसर्गासाठी असलेले ट्रायमेथोप्रिम आणि विषाणुजन्य परिसर्पावरील परिणामकारक उपचारासाठीचे ॲसिक्लोव्हिर या औषधांचा समावेश होतो. 

 

हिचिंग्ज यांचे चॅपेल हिल (न्यूयॉर्क सिटी) येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत