हिचकॉक, ॲल्फ्रेड : (१३ ऑगस्ट १८९९–२८ एप्रिल १९८०). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रहस्यप्रधान चित्रपटांचा ब्रिटिश-अमेरिकन दिग्दर्शक व निर्माता. त्याचा जन्म लंडन येथे कुक्कुटपालन करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सेंट इग्नेशियस विद्यालयात त्याचे सुरुवातीचे शिक्षण झाले. नंतर त्याने युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली (१९१९). विद्यार्थिदशेत चित्रकलेचा छंद त्यास जडला. काही नाटके व मूक चित्रपटही त्याने पाहिले. १९१८ च्या सुमारास ‘फेमस प्लेअर्स-लास्की’ ही कंपनी लंडनला आली असताना तिच्याशी हिचकॉकचा संबंधआला. या कंपनीने अकरा मूक चित्रपट तयार केले होते. या चित्रपटांसाठी त्याने चित्रशीर्षके तयार करून दिली. काही वर्षांतच तो चित्रपटकथानकाची रूपरेषा लिहूलागला. त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून द प्लेझर गार्डन (१९२५) हा पहिला चित्रपट केला. काही तज्ज्ञांच्या मते नंबर थर्टीन हा त्याचा त्या वेळचा आणखी एक दिग्दर्शित चित्रपट. यानंतर द लॉजर (१९२६) या चित्रपटापासून त्याने भावना उद्दीप्त करणाऱ्या व थरारून सोडणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. द लॉजर या चित्रपटाचे कथानक एका कुटुंबावर केंद्रित असून लॉजर म्हणजे हॉटेलचा मालक त्याच्याकडील खोलीतील इसम जॅक द रिपर हा गुन्हेगार असावा, या गैरसमजुतीने त्याचा पाठपुरावा करतो आणि त्यातून थरारक चित्रपटाची कहाणी पुढे सरकते. त्याचा ब्लॅक मेल (१९२९) हा पहिला यशस्वी ब्रिटिश बोलपट. वुमन टू वुमन हा चित्रपट दिग्दर्शित करताना त्याचा आल्मा रेव्हिल ह्या तरुणीबरोबर परिचय झाला आणि पुढे त्यांनी विवाह केला (१९२९).

 

ॲल्फ्रेड हिचकॉक
 

पुढे १९३० च्या दशकात हिचकॉकने काही अभिजात रहस्यमय चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांपैकी द मॅन हू न्यू टू मच (१९३४), थर्टी नाइन (१९३५), सॅबटाझ (१९३६) आणि द लेडी व्हॅनिशेस (१९३९) हे त्याचे चित्रपट विशेष गाजले. त्यानंतर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील हॉलिवुड या चित्रपटनिर्मिती संस्थेत प्रवेश केला आणिउर्वरित जीवन अमेरिकेतच व्यतीत केले. तिथे दिग्दर्शित केलेल्या रिबेका (१९४०) या त्याच्या रहस्यमय चित्रपटास उत्कृष्ट दिग्दर्शनाचे ॲकॅडेमी ॲवॉर्ड मिळाले. त्यानंतरच्या काळात हिचकॉक याने वर्षाला एक याप्रमाणे सु. तीस वर्षे एकापाठोपाठ एक असे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांपैकी सस्पिशियन (१९४१), शॅडो ऑफ अ डाउट (१९४३), लाइफबोट (१९४४), स्पेलबाउंड (१९४५) आणि रोप (१९४८) ह्या काही महत्त्वाच्या चित्रपट-कलाकृती होत. त्यानंतर त्याने १९५० च्या दशकात मोठ्या अंदाजपत्रकाच्या (बिग बजेट) रहस्यमय चित्रपटांचा ध्यास घेतला आणि हॉलिवुडमधील ख्यातनाम अभिनेते व अभिनेत्रींना पाचारण केले.या चित्रपटांपैकी स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन (१९५१), डायल एम्. फॉरमर्डर (१९५४), रेअर विंडो (१९५४), टू कॅच अ थीफ (१९५४), द मॅन व्हू न्यू टू मच (१९५५-पुनर्निर्मिती), व्हर्टिगो (१९५८) आणि नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट (१९५९) हे काही चित्रपट होत. नंतर तो रहस्यमय चित्रपट मानसशास्त्रीय दृष्ट्या कसे परिणामकारक होतील, या दृष्टिकोनातून चित्रपट-व्यवसायाकडे पाहू लागला आणि त्याने सायको (१९६०), मार्नी (१९६४), द बर्ड्स (१९६६), आदी चित्रपट केले. त्याचे टॉर्न कर्टेन (१९६६) आणि टोपाझ (१९६९) हे चित्रपट सांकेतिक हेरगिरीच्या कथेवर आधारित होते. फ्रेंझी (१९७२) आणि फॅमिली प्लॉट (१९७६) हे त्याच्या अखेरच्या काळातील चित्रपट त्याच्या मूळ शैलीनुसारचप्रदर्शित झाले. 

 

हिचकॉक याने आपल्या चित्रपटांतून रॉबर्ट डोनाट, ग्रेगरी पेक, कॅरीग्रँट, रे मिलँड, जोसेफ कॉटन, जेम्स स्ट्यूअर्ड यांसारखे अभिनेते तसेचग्रेस केली, टिप्पी हेड्रेन, जेनेट ली, इन्ग्रीड बर्गमन, जॉन फाँटेन, टेरेसाराइट या नामांकित, अभिनयकुशल अभिनेत्रींना प्रसिद्धीच्या झोतात आणले. ग्रेगरी पेक हा देखणा नट व आकर्षक बांध्यांची रूपसुंदरी इन्ग्रीडबर्गमन यांच्यामुळे स्पेलबाउंड हा चित्रपट अतिशय गाजला. या चित्रपटाला मनोविश्‍लेषणाची पार्श्वभूमी आहे. इन्ग्रीड बर्गमन ही हिचकॉक याची आदर्श अभिनेत्री होती. तिचे व त्याचे काही आंतरिक प्रेमसंबंध असावेत, अशी त्या वेळी वदंता होती. 

 

हिचकॉक ह्याच्या चित्रपटांचा केंद्रबिंदू खून किंवा हेरगिरी असा होता. त्यांत लबाडी, कपट, फसवणूक यांबरोबरच गैरसमजुतीतून उद्भवणारे प्रसंग आणि गुंतागुंतीच्या कटकारस्थानांनी गोवलेले कथानक असे. रहस्य तीव्रतर करून अखेरपर्यंत प्रेक्षकाला त्यात गुंंतवून ठेवण्याचे अप्रतिम तंत्र त्याला साधले होते. यासाठी तो छायाचित्रणात नवीन उपक्रम वतंत्रांचा वापर आणि परिणामकारक ध्वनिमुद्रण (विशेषतः आवाजाचा पट्टा कमी-अधिक) करीत असे. कधीकधी त्याला ओढूनताणून आणलेल्या विनोदाची झालर आणि प्रासंगिक भेसूर गुंतागुंतीच्या दृश्यांची जोड असे. हिचकॉक ह्याच्या चित्रपटांतील कथानकात प्रामुख्याने तीन विषय-प्रकार आढळतात. एक, साधारणपणे सर्व चित्रपटांत आढळणारा विषय म्हणजे एखाद्या निष्पाप व्यक्तीला गैरसमजुतीच्या घोटाळ्यात अडकवून त्याची ससेहोलपट करून अखेर तो सच्चा माणूस म्हणून सादर करणे दोन, अपराधी स्त्री मुख्य नायकाला जाळ्यात अडकवून एकतर त्याचा नाशकरते (त्याला संपविते) किंवा तिला तो गुन्हेगारी जगतातून बाहेर काढून वाचवितो आणि तीन, मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींवर आधारित बेतलेले कथानक. 

 

हिचकॉक याने पन्नासहून अधिक रहस्यमय चित्रपटांचे दिग्दर्शन केलेव सु. २०० दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती केली. ऑक्टोबर १९५५ मध्ये ‘ॲल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंट्स’ ही त्याची मालिका अमेरिकेत दूरदर्शनवर अतिशय गाजली. त्याने त्याच वर्षी वीस दूरदर्शन मालिका तयार केल्या. त्यांतून स्वतः भूमिका केल्या. त्याच्या या कार्यकर्तृत्वाचा सन्मान १९६८ मध्ये त्याला ‘आयर्व्हिंग थॅलबर्गप्लॉट’ ॲवॉर्ड देऊन करण्यात आला. फ्रेंच शासनाने त्याला कला-साहित्य क्षेत्रातील शिलेदार ही उपाधी दिली (१९६९). याशिवाय त्याला अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचे ‘लाइफ ॲचिव्हमेंट प्लॉट’ ॲवॉर्ड (१९७९) मिळाले आणि दुसऱ्या एलिझाबेथने त्याला सरदारकी देऊन ‘सरप्लॉट’ हा किताब दिला. 

 

कॅलिफोर्नियातील बेल एअर येथे त्याचे निधन झाले. 

 

संदर्भ : 1. Taylor, John Russel, Hitch : The life and Times of Alfred Hitchcock, New York, 1978.

           २. नाडकर्णी, ज्ञानेश्वर, हिचकॉक, मुंबई, १९९१

देशपांडे, सु. र.