बालचित्रपट : केवळ बालकांसाठी निर्माण केलेला चित्रपट. बालप्रेक्षकांत सामान्यपणे चार ते सोळा वर्षे वयाच्या मुलामुलींचा अंतर्भाव होतो. या वयोगटातील मुलांच्या जाणिवा लक्षात घेऊनच बालचित्रपट निर्माण केला जातो. अद्‌भुतता हास्यकारकता, कल्पनाजाल यांसाख्या गुणांनी बालचित्रपटातील कथानक संपन्न असते. चित्रपटासारख्या दृक् श्राव्य माध्यमाचा कल्पकेतेने उपयोग करून मुलांच्या तीव्र जिज्ञासावृत्तीचे सामाधान करता येते व मनोरंजनाबरोबरच उद्‌बोधन करण्याचे उद्दिष्टही साध्य होते. खास मुलांकरिता चित्रपटाचा पहिला जाहीर कार्यक्रम लंडन येथे ७ फ्रेबुवारी १९०० मध्ये झाला. पुढे १९२७ पासून मुलांकरिता शनिवारचे कार्यक्रम इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आले.

 खास मुलांकरिता केलेला पहिला चित्रपट रशियात १९१८ साली तयार झाला. त्याचे नाव सिग्नल (इं. शी.). हा चित्रपट रशियन लेखन एन् गार्शीन यांच्या कथेवर आधारित होता. बालचित्रपटाच्या क्षेत्रात पहिल्यांदाच उल्लेखनीय कार्य केलेली व्यक्ती म्हणजे लेनिन यांची पत्नी क्रुपस्कय ही होय. शाळांमध्ये मुलांना चित्रपट दाखविणे तसेच उत्तम चित्रपटांचा मुलांच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव करणे इ. बाबतींत तिने पुढाकार घेतला होता. १९४६ साली बेरूत येथे भरलेल्या यूनेस्कोच्या अधिवेशनात दृक् आणि श्राव्य अशा साहित्याची देवाणघेवाण करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्मस फॉर चिल्ड्रेन (आय्. सी. एफ्. सी.) या संस्थेची १९५५ मध्ये स्थापना झाली. करमणूकप्रधान बालचित्रपटांची निर्मिती, वितरण आणि प्रदर्शन करणे ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे होती.

 यूनस्कोच्या सूचनेननुसार या संस्थेत काम करणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी चित्रपट-प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. दूरचित्रवाणीचा अंतर्भावही त्यात करण्यात आला. तेव्हापासून या संस्थेचे नाव ‘इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रेन ॲड यंग पीपल’ (आय्. सी. एफ्. सी. वाय्. पी.) असे बदलण्यात आले. या संस्थेचे मुख्य कार्यालय पॅरिस येथे असून भारतासहित २५ देश तिचे सभासद आहेत.

लहान मुलांकरिता खास चित्रपट करण्याच्या कल्पनेने १९६० नंतर विशेष जोम धरला. प्रेक्षकवर्गात मुलांचा वर्ग मोठा असला, तरी मुलांच्या अभिरुचीस योग्य असे बालचित्रपट उपलब्ध नव्हते. ज्याप्रमाणे मुलांकरिता खास पुस्तके लिहिली जातात. त्याप्रमाणे त्यांच्याकरिता खास चित्रपट तयार जावेत, हे तत्त्व जरी सर्वमान्य असले, तरी निर्मितीखर्चाच्या दृष्टीने बालचित्रपट तयार करणे जिकीरीचे असते म्हणूनच बालचित्रपटांना सरकारी भांडवलाची मदत आवश्यक ठरते.

 रशिया, भारत, जपान आणि ब्रिटन यांसारख्या देशांत प्रतिवर्षी काही बालचित्रपट तयार केले जातात रशिया आणि जपान हे या बाबतींत अग्रेसर होते. अनुक्रमे १९१६ व १९२४ पासून तेथे बालचित्रपट काढण्यात येऊ लागले.

 बालचित्रपटाची निर्मिती व प्रदर्शन या बाबतीत रशियाचा क्रमांक पहिला आहे. तेथील चित्रपटप्रेक्षकांमध्ये एकतृतीयांश प्रेक्षक बालवयाचे असतात. तेथे प्रतिवर्षी सु. ३० पूर्ण लांबीचे बालचित्रपट तयार केले जातात. याशिवाय अनुबोध, लघुपट, व्यंगपट इ. निर्माण करण्यात येतात. हे चित्रपट दाखविण्याकरिता रशियामध्ये ३०० खास चित्रपटगृहे आहेत. १९२६ साली ‘सोयुझ द्येत फिल्म’ हा बालचित्रपट स्टुडिओ सुरू करण्यात आला. याखेरीज ‘मॉस्फिल्म’ आणि ‘ल्येन फिल्म’ हे स्टुडिओ मुलांकरिता ठराविक चित्रपट तयार करतात.

 ब्रिटनमध्ये १९५१ साली ना नफा ना तोटा या तत्त्वावर ‘बालचित्रपट संस्था’ (चिल्ड्रन्स फिल्म फाउंडेश) ब्रिटिश चित्रपटव्यवसायाने सुरू केली. तत्पूर्वी रॅक ऑर्गनायझेशन या संस्थेने एक बाल करमणूक विभाग १९४४ मध्ये सुरू केला होता. मेअरी फील्ड यांच्या देखरेखीखाली हा विभाग कार्य करीत असे. पुढे चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी स्थापन झाल्यावर प्रथम आर्थर जे. रांक हे संस्थेचे अध्यक्ष होते आणि मेअरी फील्ड या कार्यकरी अधिकारी होत्या.

 

चेकोस्लोव्हाकियामध्ये १९४५ मध्ये चित्रपटव्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्यावर बालचित्रपट-निर्मितीची निश्चित स्वरूपाची योजना आखण्यात आली. त्यानुसार व्यंगपट, पेपट फिल्म इ. तयार करण्यात येऊ लागल्या.

 भारतामध्ये बालचित्रपटाची सुरुवात बीजरुपाने १९३६ नंतर झाली होती. कोल्हापूरच्या प्रभा पिक्चर्सने धृष हा बालांसाठी खास चित्रपट निर्माण केला होता (१९३८). त्याची मूळ कल्पना राजा पंडित याची होती. त्यानंतर बालचित्रसमिती ही संस्था बालचित्रपटनिर्मिती करू लागली. [⟶बालचित्रसमिती, भारतातील].

  बालचित्रपटांचे वितरण आणि प्रदर्शन : बालचित्रपटांचे नफाविरहित वितरण इंग्लंड आणि फ्रान्समध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. ब्रिटनमध्ये संस्था आठवड्याला सु. १,२०० चित्रपट देशातल्या चित्रपटगृहांना पाठविते. पूर्व जर्मनीत वितरण संस्था सरकारी असल्याने बालचित्रपट वर्षभर प्रदर्शित केले जातात. तसेच दूरचित्रवाणीवरसुद्धा ते दाखविण्यात येतात.

रशियात मुलांकरिता खास केलेले चित्रपट मुलांच्या ३५० चित्रपटगृहांतून तसेच नेहमीच्या चित्रपटगृहांतून दुपारी दाखविण्यात येतात. बेल्जियममध्ये ५० चित्रपटमंडळांना (क्लब) ६ खेळांमध्ये (शो) सु. ७,२०० बालप्रक्षेकांना चित्रपट दाखविणे आवश्यक असते. स्वीडनमध्ये बालचित्रपट प्रामुख्याने दूरचित्रवाणीवर दाखविले जातत. बालचित्रपटांचे वितरण कारणारी सु. २० दृक् श्राव्य केंद्र असून त्यांच्यामार्फत शाळादी संस्थांना विनामूल्य बालचित्रपट दाखविण्यात येतात. नॉर्वेमध्ये नगरपालिका मुलांकरिता सवलतीच्या दरात चित्रपट दाखवितात. मुलांकरिता खास सकाळचे खेळ रविवारी ठरविले जातात.

 भारतामध्ये बालचित्रसमिती करीत असलेली व्यवस्था भारतातील खेड्यातल्या ८०% बालप्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास अपुरी आहे. १६ मिमी.यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हे चित्रपट खेड्यांपर्यंत पोहोचविण्याचे बालचित्रसमितीचे उद्दिष्ट आहे, तथापि वितरणव्यवस्थेच्या अपुरेपणामुळे बालचित्रपटांचा प्रसार खेड्यापाड्यांतून पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही.

 शहाणे, नर्मदा