फडके, सुधीर : (२५ जुलै १९१९ – ). नामवंत मराठी भावगीतगायक आणि चित्रपटक्षेत्रातील निर्माते, संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. जन्म कोल्हापूर येथे. शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे. आई सरस्वती त्यांच्या लहानपणीच निवर्तली (१९२८). वडील विनायकराव वकील होते. बालपणीच संगीतातील पहिले पाठ त्यांना ग्वाल्हेर घराण्याच्या पंडित वामनराव पाध्ये यांनी दिले. प्रतिकूल परिस्थितीमुळे कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांना शिकवण्या व संगीत शिक्षकाचे काम वयाच्या चौदाव्या वर्षांपासूनच करावे लागले (१९३३–३६). त्यांचे मूळचे नाव राम परंतु एका मेळ्याच्या प्रसंगी (१९३४) त्यांच्या नावाची घोषणा सुधीर फडके अशी करण्यात आली व तेच नाव पुढे रूढ झाले.

त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम मिरज येथे १९३१ मध्ये झाला. मुंबईच्या एका शास्त्रीय गायनस्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे सुवर्णपदक त्यांना मिळाले (१९३१-३२). त्यांचा मुंबई आकाशवाणीवरचा पहिला कार्यक्रम १९३७ मध्ये झाला. १९३९ ते ४१ या काळात त्यांनी खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बंगाल व बिहार अशी भारतभर भ्रमंती केली. पुढे कलकत्त्याला त्यांना एका ग्रामोफोन कंपनीत सहाय्यक संगीतदिग्दर्शकाचे काम मिळाले परंतु बंधूच्या व स्वतःच्या आजारपणामुळे तेथे स्थानिक होण्याचा विचार सोडून त्यांना कोल्हापूरास परत यावे लागले.

हिज मास्टर्स व्हॉइस (मुंबई) या प्रसिद्ध ध्वनिमुद्रिका संस्थेशी त्यांचा १९४१ ते १९४५ या दरम्यान संगीतदिग्दर्शक व गायक म्हणून संबंध आला. त्याच्या आधी ते काही दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. दाद्रा व नगरहवेलीच्या मुक्तिसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता (१९५४). कोल्हापूरच्या करवीर प्रांतिक साहित्य संमेलनात (१९४१) त्यांनी गायलेली ‘दर्यावरी नाच करी’ व ‘झिमझिम पाऊस पडतो’ ही गाणी विशेष गाजली. १९४९ साली सुप्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळगावकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आहे.

सुधीर फडके यांनी स्नेहल भाटकर यांच्या जोडीने संगीतदिग्दर्शन केलेला पहिला हिंदी–मराठी चित्रपट रुक्मिणी स्वयंवर (१९४५) हा, तर त्यांनी एकट्याने संगीतदिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट प्रभात फिल्म कंपनीचा गोकुल (हिंदी) हा होय. त्यानंतर त्यांनी संगीत दिलेल्या मराठी–हिंदी चित्रपटांची संख्या सु. १०० असेल. त्यांपैकी आगे बढो (१९४६), गोकुल (१९४६), अपराधी  (हिंदी-मराठी १९४८), सीतास्वयंवर (१९४८), मायाबाजार (हिंदी-मराठी १९४९), मुरलीवाला (१९५२), पहली तारीख (हिंदी १९५५), सजनी (१९५६), गजगौरी (१९५८), गोकुल का चोर (१९५९), प्यार की जीत (१९६१), भाभी की चूडियाँ (१९६२) हे हिंदी चित्रपट आणि जीवाचा सखा (१९४८), वंदेमातरम् (१९४८), पुढचं पाऊल (१९५०), जशास तसे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), वहिनीच्या बांगड्या (१९५३), सौभाग्य (१९५३), पोस्टातील मुलगी (१९५४), ऊनपाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), गंगेत घोड न्हालं (१९५५), माझे घर माझी माणसं (१९५६), रत्नघर (१९५६), जगाच्या पाठीवर (१९६०), उमज पडेल तर (१९६०), प्रपंच (१९६१), सुवासिनी (१९६१), ते माझे घर (१९६२), हा माझा मार्ग एकला (१९६३), एकटी (१९६८), आम्ही जातो आमच्या गावा (१९६९), मुंबईचा जावई (१९७०) हे मराठी चित्रपट विशेष उल्लेखनीय होत.

त्यांना तीन वेळा चित्रपटसंगीताबद्दल फाळके पारितोषिक मिळाले (जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला). सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शक (प्रपंच, १९६२-६३) व सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक [संथ वाहते कृष्णामाई (१९६७-६८), हा माझा मार्ग एकला (१९६३-६४), धाकटी बहिण (१९७०-७१) व कार्तिकी (१९७४-७५)] म्हणून त्यांना राज्य पारितोषिकेही प्राप्त झाली. भाभी की चूडियाँ या हिंदी चित्रपटातील ‘ज्योति कलश छलके’ या गाण्याचे संगीतदिग्दर्शक म्हणून मुंबईच्या सूर सिंगार संसदेचे स्वामी हरिदास पारितोषिक त्यांना मिळाले. त्याचप्रमाणे मुंबईचा जावई या चित्रपटाबद्दलही त्यांना हेच पारितोषिक मिळाले. हा माझा मार्ग एकला या फडके यांनी निर्मिलेल्या मराठी चित्रपटास सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट म्हणून राष्ट्रपतिपदक मिळाले (१९६३). त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही त्या चित्रपटास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला. मराठी चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत (१९८० पासून).

ग. दि. माडगूळकरांच्या गीतरामायणातील सर्व छपन्न गीतांना सुधीर फडके यांनी उत्स्फूर्त चाली दिल्या आणि स्वतःही ती गीते गायिली. १९५५ पासून सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात व परदेशांतही झाले आहेत. गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव १९८० साली मोठ्या प्रमाणावर पुणे येथे साजरा करण्यात आला. शब्द व स्वर यांचा रससिद्ध आणि विलक्षण परिणामकारक असा संगम सुधीर फडक्यांचे गीतरामायण ऐकताना जाणवतो. फडक्यांनी भावपूर्ण गायनाच्या बाबतीत ⇨ कुंदनलाल सैगल, पं. वामनराव पाध्ये, ⇨बालगंधर्व  व हिराबाई बडोदेकर यांना आदर्श मानले आहे.

कमी वेळात अधिक बंदिस्त व विविधतापूर्ण संगीत हवेसे वाटणे, ही प्रक्रिया बोलपटापासून सुरू झाली. ध्वनिमुद्रणाच्या माध्यमाने हीच प्रक्रिया पुढे नेली व त्यामुळे भावगीत (भावपदांऐवजी) रूढ होऊ लागले होते. याला अधिक समृद्ध करण्याच्या कामगिरीत फडके यांचा हातभार मोठा आहे. शास्त्रोक्त व लोकसंगीताचा माफक वापर आणि फार हळवे न करता हळुवार गायन करणे, ही फडक्यांच्या संगीतरचनांची व त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होत.

ग. दि. माडगूळकरांसारख्या जातिवंत मराठी कविश्रेष्ठांच्या अस्सल मराठमोळ्या गीतांना तेवढाच अस्सल मराठी स्वर सुधीर फडक्यांनी दिला. मराठमोळ्या शब्दांचा व स्वरांचा हा मेळ (मेलडी) महाराष्ट्राचा चिरंतन ठेवा होय.

जोशी, चंद्रहास