चित्रपटसमीक्षा : चित्रशिल्पादी ललितकला व साहित्य यांच्याप्रमाणेच चित्रपट हीदेखील एक कला मानली गेल्याने चित्रपटसमीक्षेचे स्वरूप स्थूलमानाने इतर कलासमीक्षेप्रमाणेच असते तथापि चित्रपटकला ही संमिश्र कला आहे. नाना तंत्रे, कारागिरी व कला यांच्या आधारे ती निर्माण होते. दिग्दर्शक, संकलक, छायाचित्रकार, संगीतज्ञ, कलादिग्दर्शक, रंगभूषाकार, नटनट्या यांसारख्या अनेकांच्या संघटित प्रयत्नाने चित्रपट तयार होत असतो. त्यामुळे चित्रपटसमीक्षेचे स्वरूपही गुंतागुंतीचे असते. धंद्याची प्रमुख दृष्टी आणि त्यामुळे साचेबंद करमणूक हीच चित्रपटामागील मुख्य प्रेरणा असली, तरी इतर कलांप्रमाणेच चित्रपटदेखील मनोरंजन, उद्‌बोधन, स्वप्नरंजन, प्रचार, आत्माविष्कार वा जीवनभाष्य यांसारख्या अनेकविध हेतूंनी निर्माण केला जातो. चित्रपटनिर्मितीमागील असा हेतू लक्षात घेऊन त्या दृष्टीने चित्रपटाच्या अंगोपांगाचे आकलन करणे, चित्रपटाचा आस्वाद सुजाण व संपन्न करणे आणि त्याचे मूल्यमापन करणे, हे चित्रपटसमीक्षेचे कार्य मानता येईल.

दृश्यता आणि श्राव्यता ही चित्रपटीय कलामाध्यमाची दोन प्रमुख अंगे होत. तथापि चित्रपटातील दृश्ये आणि आवाज कोणत्या तरी कथानकाच्या आधारेच योजिलेले असतात. हे कथानकच पटकथेच्या रूपाने पडद्यावर रंगविलेले असते. केवळ वाचनार्थ वा श्रवणार्थ निर्माण झालेल्या कथेपेक्षा पटकथा वेगळी असते तिच्यात काहीतरी चित्रपटीय (फिल्मिक) गुणवत्ता असावी लागते म्हणजे फिल्मवरच टिपले जाऊन पडद्यावर उमटणारे खास दृक्‌श्राव्य गुणविशेष पटकथेत असावे लागतात. चित्रपट माध्यमाच्या या दृक्‌श्राव्य प्रकृतीला ती अनुकूल असावी लागते. तिच्यातील विविध पात्रांचे अभिनयादी गुणदोष, संवादविशेष आणि प्रसंगांची रचना व वैशिष्ट्ये यांचा विचार चित्रपटसमीक्षेत महत्त्वाचा असतो. मूळ कथानकाची गुणवत्ता, त्यामागील जीवनदृष्टी आणि या दोहोंना तंत्रकौशल्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटात लाभलेली अभिव्यक्ती यांचा चिकित्सक विचार चित्रपटसमीक्षेत केला जातो, पण केवळ पटकथेचा विचार म्हणजे चित्रपटसमीक्षा नव्हे तर कथा, संवाद, गीते आदी आशयाच्या अंगांनी केली जाणारी अशी कथासमीक्षा तांत्रिक अंगानेही परिपूर्ण करावी लागते. चित्रपटाची दृश्यमानता व श्राव्यता या गोष्टी सूचक दिग्दर्शन, मार्मिक छायाचित्रण, वेधक संकलन तसेच परिणामकारक संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा इत्यादींच्या द्वारा प्रकट होतात. चित्रीकरणासाठी वापरलेल्या फिल्मपासून तर चित्रपटाच्या बहिर्चित्रीकरणाच्या अस्सलपणापर्यंत अनेक तांत्रिक घटक चित्रपटसमीक्षेच्या दृष्टीने विचारात घ्यावे लागतात. तांत्रिक समीक्षा चित्रपटनिर्मीतीच्या तांत्रिक घटकांचे पुरेसे ज्ञान असल्याशिवाय शक्य नाही. एखाद्या चित्रपटातील तंत्रकौशल्याचे वर्णन किंवा स्पष्टीकरण त्या चित्रपटाचे संपूर्ण वैशिष्ट्य किंवा रहस्य उकलू शकत नाही हे खरेच पण चित्रपटातील एखादे दृश्य वा प्रसंग चांगला किंवा वाईट का ठरतो, हे स्पष्ट करताना छायाचित्रण, दिग्दर्शन, संकलन आदी तांत्रिक अंगांचे ज्ञान समीक्षकाला आवश्यक असते. चित्रपटसमीक्षकाला तंत्रज्ञान कितपत आवश्यक आहे आणि चित्रपटसमीक्षेत तंत्रज्ञानाचे कितपत उपयोग करावा, यांविषयी मतभेद आहेत तथापि चित्रपटाच्या आशयाची चिकित्सा करताना तंत्रज्ञानाची पुष्कळ प्रमाणात मदत होऊ शकते, हे उघड आहे. अखेरपक्षी चित्रपट हा अनेक तंत्रकौशल्यांचा एक एकात्म आविष्कार असतो. ही एकात्मता किंवा चित्रपटाचे हे संश्लिष्ट स्वरूप वेगवेगळ्या तांत्रिक अंगांपुरत्या केलेल्या विश्लेषणाने पुष्कळदा दुर्लक्षित होण्याचा संभव असतो म्हणूनच चांगल्या चित्रपटसमीक्षेत चित्रपटाच्या निर्मितीमागील संभाव्य हेतू लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगाने चित्रपटाचा आशय आणि तंत्रविशेष यांची चिकित्सा केली जाते.

इतर कलासमीक्षेप्रमाणेच चित्रपटसमीक्षेतही चित्रपटाच्या ऐतिहासिक अभ्यासाची गरज असते. पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, कल्पनारम्य, युद्धविषयक व विनोदप्रधान यांसारख्या विविध प्रकारच्या चित्रपटांच्या परंपरा लक्षात घेतल्याखेरीज त्या त्या प्रकारातील नवीन चित्रपटाचे नेमके आकलन, आस्वादन वा मूल्यमापन शक्य होत नाही. यासाठी चित्रपटसृष्टीच्या ऐतिहासिक अभ्यासाची गरज असते. प्रसिद्ध कादंबरी, नाटक, कथा इत्यादींवर आधारलेल्या चित्रपटाची समीक्षा करताना मूळ साहित्यकृतीचा परिणाम त्यातून साधला जातो किंवा नाही, हे पहावे लागते आणि म्हणून समीक्षकाला त्या त्या साहित्यकृतीची चिकित्सक अभ्यास करावा लागतो.

कलासमीक्षेप्रमाणेच चित्रपटसमीक्षेतही समीक्षकांच्या व्यक्तिगत अभिरुचीचा ठसा उमटतो. मुख्यतः चित्रपटनिर्मितीमागील प्रयोजन कोणते याबद्दल मतभेद असू शकतो त्यामुळे चित्रपटसमीक्षेतही एकवाक्यता आढळतेच असे नाही परंतु ते प्रयोजन गृहीत धरले जाते, त्यानुरूप चित्रपटाच्या विविध घटकांची चिकित्सा करून त्याचे गुणदोष स्पष्ट करणे हे चित्रपटसमीक्षेचे कार्य मतभिन्नता स्वीकारूनही आवश्यक ठरते.

कॅमेऱ्याने टिपलेली अनेकविध लहानमोठी दृश्ये एका अर्थपूर्ण संगतीत जुळविणे हे दिग्दर्शन-संकलनाचे महत्वाचे अंग असते. कॅमेरा हा केवळ वस्तुस्थितीचे यथातथ्य दर्शन घडविण्यासाठी नोंद करणारे यंत्र नव्हे तर ते एक सर्जनशील असे साधन आहे, म्हणून सूचक, प्रतीकात्मक असे जीवनदर्शन घडविण्यासाठी कॅमेऱ्याचा कितपत उपयोग केला जातो, यावर चित्रपटाची गुणवत्ता अवलंबून असते. या बाबतीत कलात्मक दृष्टीकोन स्वीकारून जीवनाची विविध चित्रे एका नव्या संगतीत व नव्या अर्थाने उभी करण्याची छायाचित्रकाराला संधी असते. खरे तर, कॅमेऱ्याची भाषा हीच चित्रपटाची खरीखुरी भाषा होय. त्यामुळे या भाषेचा जास्तीत जास्त कलात्मक उपयोग कशा प्रकारे केलेला आहे, हा विचार चित्रपटसमीक्षेत महत्वाचा ठरतो. छायाचित्रणाच्या खालोखाल संकलनाचे महत्व असते. छायाचित्रणाचे यश आणि प्रभावीपणा सर्जनशील संकलनावर अवलंबून असतो.

प्रत्यक्ष चित्रपटसमीक्षा ही इतर कलासमीक्षेप्रमाणे फारशी विकसित झालेली नाही. वृत्तपत्रांतून किंवा चित्रपटविषयक नियतकालिकांतून प्रसिद्ध होणारी चित्रपटसमीक्षा ही त्रुटित, त्रोटक व स्थूल अभिप्रायवजा असते. चित्रपटाकडे एक कला म्हणून पाहून त्याचा अभ्यासपूर्वक विचार अशा समीक्षेत केलेला नसतो. विशिष्ट तांत्रिक किंवा आशयविषयक घटकांना वाजवीपेक्षा कमीअधिक महत्व देऊन अशी समीक्षा केली जाते. चित्रपटाचे संश्लिष्ट वा एकात्म असे स्वरूप शोधण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न या समीक्षेत क्वचितच केला जातो. स्तुती किंवा निंदा अशा दोन ऐकांतिक टोकांमध्येच ही समीक्षा घोटाळत राहते. एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून चित्रपटसमीक्षेचा विकास झालेला नाही. याची कारणे अनेक आहेत. त्यांपैकी एक म्हणजे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासून अर्थात बोलपटांचा उदय झाल्यापासून चित्रपट हा एक धंदा म्हणूनच प्रामुख्याने विकसित झाला. त्यात अफाट भांडवल गुंतवण्यात आले व व्यापारी धोरणाने मुख्यतः चित्रपटनिर्मिती होत राहिली. दुसरे म्हणजे बहुजनमाध्यम म्हणून आधुनिक समाजात चित्रपट हे लोकरंजनाचे प्रमुख साधन ठरले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पटणारे व पचणारे असेच जीवदर्शन त्यातून होत राहिले. सर्वसामान्य लोकांना रिझविणारे स्वप्नरंजनवादी चित्रपट लोकप्रिय ठरतात. अशा चित्रपटांना व्यावहारिक यशही लाभते. काही थोडे अपवाद सोडून बहुसंख्य चित्रपटनिर्माते चित्रपटाला कला न मानता धंदाच मानतात. त्यामुळे या चित्रपटातील कलात्मक प्रयोगशीलता ही बेताचीच राहिली. तांत्रिक साधनांनी चित्रपटांना तांत्रिक सफाई प्राप्त झाली पण जीवनाचा वेध घेण्याचे आणि जीवनाच्या चिरंतन मूल्यांचे कलात्मक दर्शन घडविण्याचे चित्रपटाचे सामर्थ्य उपेक्षितच राहिले. कलात्मक प्रेरणांनी किंवा हेतूंनी फार कमी प्रमाणात चित्रपटनिर्मिती झाली. त्यामुळेच चित्रपट हे रसिकांच्या व समीक्षकांच्या गंभीर चिंतनमननाचा विषय बनू शकले नाहीत. म्हणूनच चित्रपटांचा कलात्मक दर्जा वाढल्याखेरीज प्रगल्भ चित्रपटसमीक्षा निर्माण होणे कठीण आहे.

चित्रपटसमीक्षेत पोषक ठरणारे लेखनही फार कमी प्रमाणात केले जाते. त्या त्या भाषांतील चित्रपटसृष्टीचे इतिहासलेखन चित्रपट-उद्योगाच्या आर्थिक, सामाजिक व तांत्रिक बाजूंचे विवेचन करणारे लेखन चित्रपट-कलावंतांची चरित्रे व आत्मचरित्रे चित्रपटनिर्मितीची नोंद करणारी वार्षिक इ. प्रकारच्या साहित्याची निर्मिती पुरेशी होत नसल्याने चित्रपटसमीक्षेला सर्वांगीण डोळसपणा लाभत नाही व चित्रपटांचा फार मोठा परिणाम समाजावर घडत असतो. त्याच्या अनेक प्रती काढता येतात आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी त्या प्रदर्शित केल्या जातात. ही प्रतिनिर्मितिक्षमता आणि वहनसुलभता चित्रपटाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसाराला पूरक ठरते. आधुनिक समाजात चित्रपट हे मनोरंजनाचे एक प्रमुख साधन ठरले आहे. त्यामुळे चित्रपटाचे महत्त्व सामाजिक दृष्टीनेही वाढत आहे. म्हणूनच चांगले चित्रपट निर्माण होणे आणि त्यांच्या चांगुलपणाची चर्चा होत राहणे चित्रपटकलेच्या दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीनेही आवश्यक आहे.

जाधव, रा. ग.