बर्नहार्ट, सारा : (२२ ऑक्टोबर १८४४-२६ मार्च १९२३). जगप्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री. मूळ नाव रोझीन बॅर्नार. जन्म पॅरिस येथे. अंशतः ज्यू वंशाचा वारसा असलेल्या साराची आई डच व वडील फ्रेंच होते. १८६० ते १८६२ यादरम्यान तिने कॉसॅर्व्हात्वार या पॅरिसच्या संगीतशाळेच्या नाट्यविभागात अभिनयाचे शिक्षण घेतले व करूण आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकांबद्दल बक्षिसे मिळविली.
|
सारा बर्नहार्ट रंगभूमीवर प्रथम प्रवेश केला. तो ११ ऑगस्ट १८६२ मध्ये कॉमेदी फ्राँसॅझच्या रासीनकृत इफिज्येनी नाटकातील इफिज्येनीच्या भूमिकेत. पण ती एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली, ती ओदिआँ थिएटरच्या व्हिक्टर ह्यूगोकृच ऱ्यु ब्लासमधील राणी मारिया (१८६७) आणि फ्रांखा कोपेच्या ल पासाँमधील झानेतो (१८६९) या दोन भूमिकांमुळेच. १८७२ ते १८८० पर्यंत कॉमेदी फ्राँसॅझमध्ये तिने भूमिका केल्या.
सारा बर्नहार्टने १८८० नंतर लंडन, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण अमेरिका आणि इतरत्र दौरे काढून जागतिक कीर्ती मिळविली. व्हीक्तॉर्यँ सार्दू या नाटककाराने सारासाठीच प्रमुख भूमिका असलेली फेओदॉरा (१८८२), थिओदॉरा (१८८४), क्लिओपात्रा इ नाटके लिहिली. १८९३ ते १८९९ पर्यंत ‘तेआत्र सारा बर्नहार्ट’ या नाट्यसंस्था स्थापन करून त्या तिने चालविल्या. तिने केलेल्या उल्लेखनीय प्रमुख भूमिका म्हणजे एर्नानीतील ‘दोन्या सॉल’, रासीनची ‘फॅद्र’, ‘आद्रियॅन लकुव्हर’, ‘फ्रुफ्रु’, ‘मार्गरीत गोतिए’ इत्यादी. यांशिवाय काही पुरूष भूमिकाही तिने वठविल्या उदा., शेक्सपिअरचा हॅम्लेट, म्यूसेच्या लॉरेझाचिओ नाटकातील ‘लॉरेझाचिओ’ व रॉस्तांच्या लॅग्लाँ नाटकातील ‘द्युक द रिश्तात’ इत्यादी.
क्लॅरा मॉरिसच्या आग्रहाने साराने १९०० मध्ये चित्रपटसृष्टीतही ल द्युॲल दामलॅत या लघुपटाच्या निमित्ताने पदार्पण केले. त्यापाठोपाठ व्हीक्तॉर्यँ सार्दूने दिग्दर्शित केलेला ला तॉस्का (१९०६), लुई मर्कॉतॉने दिग्दर्शित केलेले ला रॅन एलिझाबेथ (१९१२), अड्रिॲन लकुव्ह्र (१९१३), ज्यान दॉरे (१९१६) (यावेळी साराचे वय ७१ होते व तिचा एक पाय शस्त्रक्रिया करून कापलेला होता) मॅर फ्राँसॅझ (१९१७) हे चित्रपट पडद्यावर आले. लेआँ आब्रामसने दिग्दर्शित केलेला ला व्हायाँत (१९२३) हा तिचा शेवटचा चित्रपट. सारा बर्नहार्ट ॲट होम (१९१५) हा चित्रपट तिच्या ब्रिटनीमधील गृहजीवनाचे दर्शन घडवितो.
उत्कृष्ट अभिनयगुण, उत्कट भावपूर्ण आवाज व लयबद्ध मोहक हालचाली यांमुळे समकालीन रसिकांकडून ‘डिव्हाइन सारा’ म्हणून तिची प्रशंसा करण्यात आली. १८८२ मध्ये तिने झांक दामाला (रंगभूमी वरचे नाव दारिया) या ग्रीक नटाशी लग्न केले पण पुढच्याच वर्षी ते विभक्त झाले. १८९३ साली सारा बर्नहार्टच्या गौरवार्थ रसिकांनी फार मोठा समारंभ आयोजित केला. जानेवारी १९१४ मध्ये फ्रेंच राष्ट्राने ‘लेजियाँ दॉनर’ हा बहुमान देऊन तिला गौलविले.
साराला चित्रकला, शिल्पकला व लेखनामध्येही स्वारस्य होते. मा दुब्ल व्ही (१९०७) लार द्यु तेआत्र (१९२०, इं. भा. द आर्ट ऑफ द थिएटर, १९२१) ही तिची काही उल्लेखनीय पुस्तके होत.
टोणगावकर, विजया
“