नौटंकी : उत्तर प्रदेश, पंजाब व राजस्थान येथील ⇨ लोकनाट्याचा एक प्रकार. स्वांग किंवा भगत ही नौटंकीचीच पर्यायी नावे मानण्यात येत असली, तरी स्वांग हे प्राचीनकालीन व धार्मिक स्वरूपाचे, भगत हे मध्यकालीन (१३२५–१६५०) आणि नौटंकी हे रीतिकालीन (१६५०–१८५०) समजले जाते. काही विद्वानांच्या मते ‘नौटंकी’ हा ‘नाटकी’ संज्ञेचा अपभ्रंश आहे, तर काहींच्या मते ‘नौटंकी’ ही मूलतः एखादी प्रेमकथा असून तीच पुढे संगीत रूपकात म्हणजे नाटकात सादर करण्यात आली असावी आणि तिचा प्रसार होऊन पुढे प्रत्येक संगीत रूपकालाच नौटंकी हे नाव पडले असावे. स्वांग व नौटंकी हे दोन्ही प्रकार आधुनिक काळात प्रचलित आहेत.

नौटंकी म्हणजे एक प्रकारचे गीतिनाट्य असून महाराष्ट्रातील ⇨ दशावतारी नाटके व दाक्षिणात्य ⇨ यक्षगान यांच्याशी त्याचे बरेचसे साम्य दिसून येते. पूर्वी नौटंकीचा रंगमंच कामचलाऊ स्वरूपाचा असे. त्यात लहान मुले स्त्रीभूमिका करीत. तथाकथित रंगमंचावर सूत्रधार नाट्यातील दृश्यांचे व स्थळांचे वर्णन करी. कथानकाचे स्वरूप पौराणिक नसे उलट लौकिकातील वीरपुरुष, प्रणयी युगुल वा भक्त यांच्याशी ते निगडित असे. उत्तरोतर नौटंकीच्या स्वरूपात बराच बदल होत गेला. अलीकडे नौटंकीच्या खेळासाठी उघड्या मैदानावर मांडव उभारण्यात येतो. प्रत्यक्ष रंगमंच फळ्यांचा बनवितात व त्याच्या मागे नटांच्या रंगवेशभूषेकरिता रंगपटाची सोय केलेली असते. रंगमंचावर पुढचा पडदा फक्त असतो. कधीकधी मात्र पात्रांचा प्रवेश प्रेक्षकांतूनही होतो. तसेच खेळातील पात्रे प्रेक्षकांजवळ जाऊन त्यांच्याशी प्रश्नोत्तरेही करतात. आधुनिक नौटंकी खेळात बरीच मोठी दृश्यमालिका असते. त्या प्रत्येक दृश्याची सूचना सूत्रधारांकडून प्रेक्षकांना देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यातील स्त्रीभूमिकांची कामे स्त्रियाच करतात. या कामी कधीकधी गणिकांचाही उपयोग करण्यात येतो. दृश्यांतराच्या वेळी गणिका रंगमंचावर येऊन आपल्या ढंगदार अभिनयाने, नृत्याने वा गायनाने प्रेक्षकांना रिझवीत असतात तोपर्यंत नट रंगपटात जाऊन आपली रंगवेशभूषा पूर्ण करू शकतात. गंभीर प्रसंगाचा ताण कमी व्हावा म्हणून अधूनमधून विनोदी वा हास्यकारक प्रसंगांची योजना करण्यात येते. त्यात पुरुषच स्त्रीवेश धारण करून आपल्या गमतीदार हावभावांनी व हास्यास्पद बोलण्याने प्रेक्षकांना हसवून सोडतात. रंगमंचाच्या एका बाजूला प्रेक्षकसन्मुख गायक आणि वाद्यवृंद असतो. कथानकातील आशयाला धरून पात्राचा ते अभिनय, संवाद वा नृत्य इत्यादींना साथ देऊन उठाव आणतात. वाद्यांमध्ये बाजाची पेटी, सारंगी, तबला आणि नगारा ही वाद्ये असतात. त्यांत नगाऱ्याचे महत्त्व अधिक असते. नगारा जोरजोरात बडवून त्या आवाजाने सारा आसमंत दणाणून सोडण्यात येतो. नौटंकीतील कथानक प्रणयप्रधान, वीररसप्रधान वा साहसी घटनाप्रंसगी भरलेले असते. त्यात बहुधा एखाद्या लौकिक प्रणयी वीराचे वा धीरोदत्त भक्ताचे जीवनप्रसंग उभे केलेले असतात. भक्तीपर नौटंकीमध्ये भक्ताच्या जीवनातील प्रतिकूल प्रसंग उभे करून शेवटी त्याचा विजय दाखविण्यात येतो. कथानकातून उपदेश सूचित होत असला, तरी खेळाच्या शेवटी सूत्रधार पुन्हा एकदा रंगमंचावर उपस्थित होऊन त्या उपदेशाची री ओढतो व वाईट वर्तन सोडा, सत्याची कास धरा आणि न्यायनीतीने वागा असे उपदेशामृत प्रेक्षकांना पाजतो. नौटंकीतील संवाद पद्यमय असून ते चौबोला छंदात असतात. काही चौबोले आखूड तानेचे, तर काही दीर्घ तानेचे असतात. त्यांची धाटणी ‘बहर–ई–तवील’ (म्हणजे लांब छंद) या उर्दू छंदानुसार असते. माळवा–निमाडकडील चौबोल्यांवर कलगी तुऱ्याचा (किलगी-तुर्रा) व लावणीतील शृंगाराचा प्रभाव असावा असे म्हटले जाते. वीरसप्रधान नौटंकीत आल्हा छंदाचाही वापर केला जातो. अत्याधुनिक नौटंकीत मात्र गद्यसंवाद असतात. नौटंकीचा खेळ रात्री आठाच्या सुमारास सुरू होऊन तो पहाटे संपतो. कधीकधी दोन आखाड्यांतील चुरशीच्या वेळी वेळेची मर्यादा सैल करण्यात येते.

यात्रांच्या मोसमात म्हणजे बहुधा कार्तिक-मार्गशीर्ष वा चैत्र-वैशाख महिन्यांत नौटंकीचे खेळ मोठ्या प्रमाणावर चालतात. उ. प्रदेशातील फरूखाबाद, शाहजहानपूर, कानपूर, एटा, इटावा, मैनपुरी, मीरत, सहारनपूर इ. जिल्ह्यांतून नौटंकीचे विशेष प्रस्थ आहे. तेथे नौटंकींचे निरनिराळे आखाडे असून ते नेहमी फिरतीवर असतात. त्या भागात त्रिभुवन व ग्वाल्हेर येथील नौटंकी मंडळ्या विशेष लोकप्रिय आहेत.

ऐतिहासिक आढावा : या खेळाची सुरुवात प्राचीन काळात झाली, असे मानले जाते. तारीख-ए-अदब-ए उर्दू या आपल्या ग्रंथात डॉ. रामबाबू सक्सेना नौटंकीचा उगम उर्दू कविता व लोकगीतांतून झाल्याचे दाखवितात तर कालिकाप्रसाद दीक्षित (कुसुमाकर) यांच्या मते सर्वप्रथम नौटंकी ही प्रसिद्ध पंजाबी लोकगीत ‘हीररांझा’ मधूनच निर्माण झाली असून तिचा उगमकाळ अकरा-बारावे शतक आहे. या लोकनाट्याचे मूळ प्रवर्तक मल्ल जाट, रावत राजपूत व रंगा कोष्टी हे मानले जातात तर १९१०च्या इंडियन अँटिक्केरीमध्ये सहारनपूर येथील अंबाराम या गुजराती ब्राह्मणाने नवीन धर्तीच्या नौटंकीची निर्मिती केल्याचा उल्लेख सापडतो. पुढे तेराव्या शतकात अमीर खुसरौने नौटंकीतील प्रभावी बाजू लक्षात घेऊन तिला नव्या धर्तीची पद्यरचना व आकर्षक संगीत देऊन तिचा दर्जा उंचावला त्यामुळे नौटंकी हे सामान्य लोकांप्रमाणेच सद्‌भिरुचिसंपन्न रसिकांचेही मनोरंजक साधन बनले.

त्यानंतर अठराव्या शतकापर्यंत नौटंकीचा प्रसार संपूर्ण भारतभर झाला होता. इतर अनेक सवंग मनोरंजनात्मक प्रकारांचा नौटंकीवर परिणाम होऊन तीत बाष्कळपणा व अश्लीलता शिरली आणि नौटंकी म्हणजे केवळ धांगडधिंगा असा प्रकार ठरू लागला परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दीपचंद नावाच्या एका कलाकाराने नौटंकीमधील अतिशृंगारिकतेला फाटा देऊन वीरसपूर्ण नौटंकीची निर्मिती केली. त्यापुढील काळात नौटंकीची हाथरस आणि कानपूर अशी दोन घराणी निर्माण झाली. हाथरसचा इंद्रमन आखाडा हा प्रसिद्ध असून त्याचा प्रवर्तक उस्ताद इंद्रमन होता. त्याची शिष्यपरंपरा चिरंजीवलाल आणि पं. नाथाराम महाराज अशी सांगितली जाते. पं. नाथाराम महाराज हे नत्थामहाराज नावानेही ओळखले जात. यांची नौटंकी लोकप्रिय आहे. ते स्वतः उत्तम नट व कवी होते. त्यांनी नौटंकीला नाट्यात्मकता व कलात्मकता देण्याच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग केले. पौराणिक, धार्मिक व सामाजिक कथाप्रसंगांबरोबर सूफी काव्यातील विशेषांचा उपयोग करून त्यांनी स्वप्नदर्शन, चित्रदर्शन वा अन्य रूपगुणश्रवणाने प्रीतीची अनुभूती घडविणाऱ्या कथानकांचा आधार घेऊन नौटंकीचे सामर्थ्य वाढविले. कथानकातील नायक-नायिका विविध संघर्षांतून पार पडल्यावर शेवटी मीलन घडवून आणणे व त्यांतून खऱ्या प्रेमाचे दर्शन प्रेक्षकांना घडविणे, हेच मुख्य सूत्र त्यांच्या नौटंकीत आढळते. त्या सूत्रानुसार कथानक रंगविताना ते अनेक प्रकारच्या कृत्रिम क्लृप्त्या योजीत. त्यांनी आपल्या खेळांतून पात्रांची संख्या वाढविली व रंगमंचाची सजावटही अधिक आकर्षक केली. हा बदल पारशी नाटकांच्या व उर्दू शायरींच्या प्रभावातून त्यांनी घडवून आणला. सु. पन्नास संगीत नौटंकीची त्यांनी निर्मिती केली असून त्यांपैकी श्रवणचरित्र ऊर्फ धर्मपताका (१९०९), नकली मालीन ऊर्फ करामती पीर (१९२३), शीरी फरहाद ऊर्फ गुलशान की मुलाकात (१९२४) व खून के आँसू ऊर्फ पाकदामन लडकी (१९३६) हे खेळ विशेष प्रसिद्ध आहेत.

लखनौमधील नबाबी वैभवास उतरती कळा लागल्यावर तेथील नौटंकीवाले कानपूरकडील औद्योगिक क्षेत्राच्या आश्रयाला गेले. त्यांपैकी श्रीकृष्ण खत्री (पहेलवान) यांनी तेथे आपली ‘श्रीकृष्ण संगीत कंपनी’ उघडून अनेक नौटंकी कलाकारांना एकत्र आणले व तेथील कामगारवर्गाच्या अभिरुचीला पात्र ठरतील अशा नौटंकी खेळांची रचना केली (१९१३). त्यांच्या नौटंकीत प्रामुख्याने शृंगार, वीर, हास्य व करुण भावनांचा स्थूल आविष्कार दिसत असला, तरी त्यांतून सामाजिक सुधारणा व राजकीय ध्येयवादाची जाणीवही प्रकट होते. त्यांचे हीकतराय (१९१३), १९१९ मधील जालियनवाला हत्याकांडावर आधारित खूने वाहक, वेश्यावृत्तीचे दुष्परिणाम दाखविणारे आँख का जादू इ. नौटंकी-खेळ अत्यंत लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या नौटंकीची भाषा प्रामुख्याने उर्दूप्रचुर व छंदही उर्दूच असत. तसेच त्यांवर पारशी नाट्यसृष्टीचा प्रभावही पडलेला असे. अमरसिंह राठौर ऊर्फ आगरे की लडाई ही वीररसप्रधान नौटंकी पुस्तकरूपानेही प्रसिद्ध झाली आहे.

पुढे कालमानानुसार नौटंकी हा मनोरंजनाचा कलाप्रकार बदलू शकला व त्याची नवीन स्वरूप धारणा करण्याची लवचिकता सिद्ध झाली. आधुनिक नौटंकीच्या निर्मात्यांमध्ये पं. दीपचंद हा विद्वान शास्त्री अग्रेसर होता. त्याबरोबर पं. लखमीचंद, तिरमोहन, राधेश्याम कथावाचक, लम्बरदार, पं. नाथाराम इत्यादींचे कार्य उल्लेखनीय आहे. 

संदर्भ : 1. Gargi, B. Theatre in India, New York, 1962.

  २. उपाध्याय, रणधीर, हिंदी और गुजराती नाट्यसाहित्य का तुलनात्मक अध्ययन, दिल्ली, १९६६.  

  ३. परमार, श्याम, लोकधर्मी नाट्यपरंपरा, वाराणसी, १९५९.  

  ४. बेदी, सोहंदरसिंह, पंजाब : लोकसंस्कृति और साहित्य, दिल्ली, १९७५.

जोशी, चंद्रहास