छायानाट्य : अर्धपारदर्शक कापडी अगर कागदी पडद्याच्या मागील बाजूस प्रखर प्रकाशझोत टाकून त्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या छायांद्वारा सादर करण्यात येणारा एक खेळ. कळसूत्री बाहुल्यांप्रमाणेच [⟶ कळसूत्री बाहुल्यांचा खेळ] हा प्रकार प्राचीन आहे. त्यात प्रेक्षकांच्या समोर एक स्वच्छ पांढरा पडदा ताणून लावतात आणि त्याच्या मागून हलत्या चित्रांच्या सावल्यांतून एखादा कथाभाग गुंफला जातो. या छायानाट्यातील चित्रे एकसंध नसून अनेक तुकड्यांनी बनविलेली असतात. त्यामुळे प्रकाशापासून कमीअधिक अंतरावर मागेपुढे होणाऱ्या या आकृतींच्या सावल्या दृश्य परिणामात भर टाकतात. त्याशिवाय छायानाट्यात आवाजाची साथ असल्यामुळे तलवार-युद्ध प्रसंग, हत्तीची शिकार, कुस्ती यांसारखे प्रसंग चांगले रंगतात. काही पाश्चिमात्य देशांतून पुठ्ठ्यांच्या छायाबाहुल्या बनवीत परंतु टिकाऊपणाच्या दृष्टीने पत्रा किंवा चामडे यांचा उपयोग केला जातो. तसेच पडद्यासाठी कापडाऐवजी अर्धपारदर्शक कागद, तैलदीपांऐवजी विद्युत् दीप किंवा चित्रदीप (मॅजिक लँटर्न) आणि बांबूऐवजी लोखंडी सळ्या यांचा उपयोग करतात. 

 छायानाट्याची खरी सुरुवात प्रथम भारतातच झाली, असे म्हटले जाते. भारतामध्ये ख्रि. पू. दुसऱ्या शतकात छायानाट्याचे प्रयोग होत असल्याचा उल्लेख सापडतो. महाभारत, थेरीगाथा, अशोकाचे चौथे शिलाशासन इत्यादींतून त्याचे निर्देश आढळतात. महाभारतामध्ये छायानाट्याला ‘रूपोपजीवन’ असे संबोधले आहे. दूतांगद  हे सर्वांत जुने छायानाट्य होय. त्याचा कर्ता सुभट असून अंगदशिष्टाई हा त्या छायानाट्याचा विषय आहे. मध्ययुगीन संतांच्या वाङ्‌मयातही ईश्वर व सृष्टी यांवर छायानाट्याचे रूपक केलेले आढळते. आजही आंध्र, मलबार, तमिळनाडू, ओरिसा वगैरे प्रदेशांतून छायानाट्याच्या खेळाची परंपरा टिकून आहे. छायानाट्याला प्रदेशपरत्वे निरनिराळी नावे आहेत. उदा., ओरिसामध्ये ‘रावणछाया’, कर्नाटक व तमिळनाडूमध्ये ‘पवाकुत्तू’ किंवा ‘चक्ल गोंबाई अट्ट’ व आंध्रमध्ये ‘थोलू बोमलट्ट’ इत्यादी. छायानाट्याचे विषय मात्र सर्वत्र रामायणमहाभारत  अथवा शिवजन्मोत्सव हेच असतात.

 छायानाट्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बाहुल्या बहुधा गाय, म्हैस, शेळी, हरिण इ. जनावरांच्या कातड्यांपासून करण्याची पूर्वापार प्रथा आहे. हरणाच्या कातड्याच्या बाहुल्या पवित्र मानतात. बाहुल्यांची उंची सर्वसाधारणतः सु. ०·७६ मी. असते. आंध्र प्रदेशातील बाहुल्या मात्र कथानकातील पात्रांनुसार लहानात लहान ३५·५६ सेंमी. पासून मोठ्यात मोठ्या सु. १·५२ मी.पर्यंतही असतात. विशेषतः देव किंवा नायकनायिकांच्या बाहुल्या मोठ्या व इतर पात्रांच्या छोट्या असतात. आंध्र प्रदेशातील या बाहुल्या जगातील सर्वांत मोठ्या आकाराच्या छायाबाहुल्या आहेत. कधी कधी या बाहुल्यांत पेंढा भरतात तर कधी त्याऐवजी कातड्याचे तीन पदर वापरून त्यांना अनुरूप आकार देतात. नंतर त्यांना भोके पाडतात व अनुरूप रंगांनी त्यांची रंगभूषा व वेशभूषा करतात. जुन्या काळी स्त्रीपात्रे पिवळा, नारिंगी, तपकिरी इ. रंगांच्या एकजीव मिश्रणाने रंगवीत असत. पुरुषपात्रे, विशेषतः राम-कृष्ण, गडद निळ्या रंगाने रंगवीत. सीतेच्या बाहुलीसाठी कोठे कोठे सोनेरी रंगछटेचा उपयोग करतात. आंध्र प्रदेशातील बाहुल्या पारदर्शक व विविध रंगांचा सुमेळ साधलेल्या असतात. या छायाबाहुल्या खांदे, कोपर, गुडघा व कंबर या ठिकाणी गाठी मारलेल्या दोऱ्या जोडून सांधलेल्या असतात. त्यामुळे त्यांची हालचाल सुलभपणे करता येते. बाहुलीच्या मध्यभागी डोक्यापासून खालपर्यंत लांब व जिचा थोडासा भाग बाहेर आलेला आहे, अशी पातळ पट्टी जोडतात. ती बांबूची किंवा ताडपत्राच्या कण्याची असते. नर्तकी म्हणून असलेल्या बाहुल्यांची सांधेजोड थोडी वेगळ्या प्रकारची असून त्यांना पायघोळ झगे घातलेले असतात. त्यांची हालचालही दोन सूत्रधारांकडून करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या नृत्यातून अभिजात नृत्यांच्या हालचाली दाखविणे शक्य होते.

 छायानाट्यासाठी उभा करण्यात येणारा परंपरागत रंगमंच एखाद्या पेटीप्रमाणे लांबट व तीन बाजूंनी बंदिस्त असून तो कोठेही खुल्या मैदानात सहज उभा करता येतो. साधारणपणे त्याची लांबी सु. ३ मी., उंची सु. ६·४० मी. व खोली १·८३ मी. असते. समोर सु. ०·४५ मीटरचा एक पुढे झुकलेला पडदा असून त्यावर नाट्यप्रसंगाचे नाव लिहिलेले असते. ज्या पडद्यावर छाया चित्रित करावयाच्या असतात, तो मुख्य पडदा दोन शुभ्र पांढऱ्या साड्या एकावर एक जोडून तयार केलेला असतो. तो ताडाच्या काट्यांनी ताणून आडवा लावतात. तसेच तो जमिनीपासून सु. ०·४५ मीटर इतक्या उंचीवर असतो. पडद्याच्या अवतीभवतीचा खुला भाग गोणपाटाने झाकून टाकतात. काही ठिकाणी या पडद्याच्या मध्यभागी वरून खाली असा एक लाकडी दांडा लावून, पडद्याचे दोन भाग करतात. त्यांपैकी उजवी बाजू खेळातील राम-सीता, हनुमान वगैरे दैवी पात्रांसाठी व डावी बाजू रावण, राक्षस यांसारख्या दुर्जन पात्रांसाठी उपयोगात आणतात. या सर्व बाहुल्या पडद्यावर काट्यांच्या साह्याने अडकवितात. हालचालींच्या वेळी त्या त्यापासून अलग करतात. त्यांची हालचाल बांबू व वेतांच्या छड्यांच्या साह्याने करतात. त्यासाठी पडद्यामागे हालचाल करणारी वेगळी माणसे असतात. सूत्रधार पडद्यासमोर उभा राहून कथाकथन करतो आणि हातातील ढोल (ढापी) बडवितो.

 पडद्याच्या मागे एका चिरलेल्या बांबूला खालच्या बाजूस ४१ दिवे लावलेले असतात. त्यांत कापसाच्या जाड वाती वापरतात. सुरुवातीला एकेक दिवा पेटत असताना बाहुल्यांच्या छाया बेढब दिसतात, परंतु नंतर सर्वच वाती तेवू लागल्यावर त्यांचे योग्य आणि वेधक आकार दिसू लागतात.

 आंध्र प्रदेशामधील छायानाट्य हा एक ⇨यक्षगान  या लोकनाट्याचाच भाग समजतात. छायानाट्याचे हे खेळ वसंत ऋतूमध्ये केले जातात. या खेळाच्या प्रारंभी काही धार्मिक विधी पार पाडण्यात येतात. ओरिसामधील रावणछाया  खेळात वातावरणनिर्मितीसाठी बाहुल्यांच्या जोडीला वृक्ष, झोपड्या, आसने इ. दाखवितात. त्यांच्या काळ्यापांढऱ्या सावल्यांच्या हालचाली व त्यांनुसार पुढे पुढे सरकणारे कथानक यांमुळे खेळ खूपच परिणामकारी वाटतो.

 महाराष्ट्रात कुंपणावरून  हे पहिले छायानाट्य श्री. बा.रानडे ह्यांनी लिहिले. त्याचा प्रयोग मुंबईला २८ एप्रिल १९४७ रोजी झाला होता. उदय शंकर, डॉ. चारुशीला गुप्ते ह्यांनीही छायानाट्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याचप्रमाणे दर्पण अकादेमी व नाट्यसंघ, अहमदाबाद या संस्थांनीही छायानाट्याच्या कलेचे पुनरुज्जीवन केले आहे. तसेच त्यांनी छायानाट्याच्या प्रयोगपद्धतीत काही सुधारणाही घडवून आणल्या आहेत. उदा., प्रदीर्घ कथानकाऐवजी छोटी सुटसुटीत कथानके, खेळाला दिलेली ध्वनींची व संगीताची साथ, प्रकाशयोजनेतील सूचक बदल यांसारखी नवीन तंत्रे त्यांनी वापरली त्यामुळे त्यांच्या छायानाट्याचे खेळ अधिक सूचक व जिवंत वाटू लागतात.


छायानाट्यातील हनुमानाची प्रतिमा, इंडोनेशिया.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात विजयानगर-साम्राज्यकाळी रामायण रंगनाथन  हे छायानाट्य लिहिण्यात आल्याचा उल्लेख मिळतो. याच छायानाट्याचा प्रसार पुढे अतिपूर्वेकडील इंडोनेशिया, जावा, मलाया, ब्रह्मदेश आणि चीन या देशांत झाला आणि छायानाट्य तेथील लोकांच्या लोकनाट्याचाच एक भाग बनून गेले. इंडोनेशियात त्याला ‘वायांग कुलित’ म्हणतात.त्याचे कथानक भारतीय कथांवरच आधारित असते. छायाबाहुल्यांची पद्धतही आंध्र प्रदेशीय छायाबाहुल्यांप्रमाणे असून त्यांचे गुंतागुंतीचे तक्षण केलेले असते. त्यांचा आकार लहान असून त्या पारदर्शक असतात तथापि त्या मोहक व सौंदर्यपूर्ण वाटतात. जावामध्येही छायाबाहुल्या न रंगविता डाग देऊनच त्या अलंकृत करतात. जावा व ब्रह्मदेशात ‘यम प्वे’ म्हणजे रामायणाच्या खेळात पडद्याचे विभाजन प्रखर आणि मंद प्रकाशझोताच्या साह्याने दाखवितात. तसेच पात्रांसाठी मुखवट्यांचा उपयोग करतात. विभाजनाच्या उजव्या भागी देवादी पात्रे, तर डावीकडे राक्षसादी पात्रे असतात. चीनमध्ये हान राजवटीपासून छायानाट्याची परंपरा चालू आहे. चिनी बाहुल्या सामान्यपणे कमी उंचीच्या असतात.

ईजिप्त, अरबस्तान, इराण व तुर्कस्तान याही देशांत प्राचीन काळी छायानाट्य प्रचलित होते. तुर्कस्तानातून पुढे ते ग्रीसमध्ये गेले. तेथे त्यांचे मूळ स्वरूप पालटून ते विनोदी व उथळ बनले. सतराव्या शतकात इटलीमध्ये हा खेळ रूढ झाल्यावर तो यूरोपीय देशांत पसरला. अठराव्या शतकामध्ये अमेरिकेत छायानाट्य लोकप्रिय होते. पुढे एकोणिसाव्या शतकातील गाजलेले ब्रोकन ब्रिज  हे छायानाट्य छायानाट्याच्या जागतिक इतिहासात अजरामर असून त्याचा कर्ता डॉम्नीक सेराफँ आणि छायानाट्याचे चित्रपट घेणारा लॉट्टे रायनिगर हा जर्मन कलाकार हे या क्षेत्रातील प्रमुख कलाकार आहेत.

संदर्भ : 1. Binyon, Helen, Puppetry Today, London, 1966.

            2. Mathur, J. C. Drama in Rural India, Bombay, 1964.

            3. Stock Well, Alen, Pupperty, London, 1966.

           ४. जोशी, वि. कृ. लोकनाट्याची परंपरा, पुणे, १९६१.

           ५. परमार, श्याम, लोकधर्मी नाट्यपरंपरा, वाराणसी, १९५९.

जोशी, चंद्रहास