भरतवाक्य : नाट्यप्रयोगाच्या शेवटी येणारे मंगल वचन. भरताच्या नाट्यशास्त्रात किंवा पुढील शास्त्रग्रंथांत ही संज्ञा नाही. अभिजात-काल-पूर्व भासाच्या नाटकांपासून पुढील सर्व संस्कृत नाटकांमध्ये मात्र नाट्यप्रयोगाचा शेवट भरतवाक्याच्या (गेय) श्लोकाने होत असल्याचे दिसून येते. तेव्हा नाट्यप्रयोग सादर करण्याच्या पद्धतीने ही संज्ञा उत्पन्न होऊन रुढ झाली असली पाहिजे.

भरत म्हणजे नट. प्रयोगात भूमिका करणाऱ्या नटाला भूमिकेची वाक्येच बोलायची असतात, स्वतःचे काही बोलायचे नसते. म्हणून प्रयोगाच्या अखेरीस सर्व नट रंगमंचावर येऊन प्रेक्षकांना धन्यवाद देण्यासाठी एक शुभशंसी प्रार्थना म्हणत. ही प्रार्थना म्हणजे भरतवाक्य ( भरतस्य भरताना वा वाक्यम् । ). शाकुन्तल नाटकाच्या टीकेत राघवभट्टाने ही कल्पना सुचविली आहे. भरत म्हणजे नाट्याचे आणि प्रयोगशास्त्राचे प्रणेते भरतमुनी, हा दुसरा अर्थ. या अर्थाने नटवर्गाने भरतमुनींना वाहिलेली आदरांजली म्हणजे भरतवाक्य ( भरतमुद्दीश्य वाक्यम् । ). संशोधनान्ती मला असे आढळले आहे की, भरताच्या मूळ पूर्वरंगातील ⇨ नांदीचे स्वरुप संमिश्र होते. म्हणजे मंगलारंभ, देवतास्तुती आणि आशीर्वचन यांच्या जोडीने, राजा, राष्ट्र, कवी, प्रेक्षापती आणि प्रेक्षक यांच्या कल्याणाची आणि अभिवृद्धीची प्रार्थना पण नांदी- श्लोकात असे. (भरतनाट्यशास्त्र, ५.१०५-१०८). पूर्व रंगाची उत्क्रांती होऊन परंपरागत नांदी मागे पडली. नाटककारांनी स्वतःच प्रस्तावना वगैरे भाग रचायला सुरुवात केली, त्यावेळी नांदीचे स्वरुपही बदलले. नांदीत ईशस्तुती, आशीर्वचन एवढाच भाग राहिला आणि राष्ट्राकल्याणाची सामूहिक प्रार्थना प्रयोगाच्या अखेरीस आली. या प्रार्थनेला ‘भरतवाक्य’ म्हणण्याचे कारण उघड होते. या कल्पना मूळ भरताच्याच, त्याचीच ही वाक्ये नाटककारांनी आणि नटांनी प्रयोगाच्या सोयीसाठी ती आरंभी न म्हणता, शेवटी म्हणायला सुरूवात केली, एवढेच.

संस्कृत नाटकाच्या भरतवाक्यात राज्याचे प्रजाहितार्य पालन, एखाद्या राजाची स्तुती, योग्य पर्जन्य आणि धनधान्याची समृद्धी, शांती, सुख आणि कल्याण, लक्ष्मी आणि सरस्वती यांचे साहचर्य, अशा आशयाची प्रार्थना असते. बहुधा नाटकाचा नायक भरतवाक्य म्हणण्यात पुढाकार घेत असावा.

यूरोपीय आणि इंग्रजी नाटकांतील ‘एपिलॉग’ (उपसंहार) आणि भरतवाक्य यांत, दोन्ही नाट्यप्रयोगाच्या अखेरीस येतात, एवढेच साम्य आहे. ‘एपिलॉग’ या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ जाहीर वक्तृत्वाचा उत्कट बिंदू असा आहे. युरिपिडीझने एपिलॉगचा उपयोग आपल्या नाटकात प्रथम केला आणि एलिझाबेथ राणीच्या काळात ⇨ बेन जॉन्सन वगैरे नाटककारांनी नाटकाचा शेवट करण्याची ही प्रथा रुढ केली. या एपिलॉगमध्ये काही वेळा तात्कालीन राजकारण व समाजव्यवस्था यांवर कडक प्रहार असत आणि तत्कालीन गाजलेले नट हे भाषण म्हणत परंतु बेन जॉन्सनने नाटकाच्या गुणवत्तेची चर्चा आणि टीकाकारांना उत्तर असे एपिलॉगचे स्वरुप ठेवले. नाट्यव्यवसायाशी संबद्ध असे नामवंत लेखक एपिलॉग लिहून देत, प्रकाशक त्यांच्याकडून लिहवून घेत. रेस्टोरेशन काळापर्यंत (१६६० ते १७००) चाललेली ही पद्धती त्यानंतर मागे पडली. [ ⟶ उपसंहार].

भट, गो. के.