भोसले, केशवराव: (९ ऑगस्ट १८९०-४ ऑक्टोबर १९२१). मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध संगीत

केशवराव भोसले

 गायक नट. जन्म कोल्हापूर येथे. वडिलांचे नाव विठ्ठलराव व मातेचे जनाबाई. केशवरावांना दोन पत्न्या असून पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली झाल्या.

वडिलांचे अकाली निधन आणि घरची गरिबी या कारणांमुळे त्यांना शालेय शिक्षण मिळाले नाही. मात्र त्यांना बालपणी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत राहण्याचा योग आला. त्यायोगे पुढील जीवनाची दिशा ठरली व त्यांच्या मनात स्वभावतःच नाट्यकलेचे बीज पेरले गेले. त्यातच नाटक मंडळीचे चालक जनुभाऊ निमकर यांसारख्या कुशल नाट्यदिग्दर्शकाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्याच काळात दत्तोपंत जांभेकरबुवा यांजकडून केशवरावांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. सुरुवातीस त्यांना नाटकांतून अधूनमधून लहानसहान भूमिका मिळत, पण पुढे लवकरच शारदा नाटकात शारदेची भूमिका करण्याची त्यांना संधी मिळाली (१९०२). ही त्यांची भूमिका इतकी उत्कृष्ठ वठली की शब्दशः एका रात्रीत या मुलाचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर १९०७ साली त्यांनी ही नाटकमंडळी सोडली आणि १ जानेवारी १९०८ रोजी हुबळी येथे ‘ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ ही स्वतःच्या मालकीची नाट्यसंख्या स्थापन केली. त्याकाळी मराठी नाट्यसंस्था आपल्या जाहिरातींमध्ये त्यांना आश्रय देणाऱ्या संस्थानिकांचा उल्लेख करीत परंतु केशवरावांनी मात्र ललितकलादर्श या आपल्या संस्थेचा उल्लेख ‘लोकाश्रयाखालील’ संस्था असा केला. तसेच नाटकाची निवड करताना लोकशिक्षणाचाच हेतू कटाक्षाने डोळ्यापुढे ठेवला. सुरुवातीस ही नाटक मंडळी शारदा, सौभद्र वगैरे जुनी नाटके करीत असे परंतु पुढे केशवरावांनी ⇨वीर वामनराव जोशी यांजकडून राक्षसी महत्त्वाकांक्षा हे नाटक लिहून घेऊन १९१३ साली ते रंगभूमीवर आणले. हे नाटक त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील केशवरावांनी केलेली मृणालिनीची भूमिका अप्रतिम होत असे. याच काळात त्यांनी गायनाचार्य ⇨रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गाण्याची दीक्षा घेतली व गायनकलेतही त्यांनी प्रावीण्य मिळविले. टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. कालांतराने त्यांनी स्त्रीभूमिका सोडून पुरुषभूमिका करण्यास सुरुवात केली. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी इ. नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. जुन्या नाटकांपैकी मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार होत असे. त्यातील त्यांची पदे त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाली. १९२१ साली टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी ‘गंधर्व’ व ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळ्यांतर्फे मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग झाला. त्यात साहजिकच केशवरावांकडे धैर्यधराची भूमिका आली. त्यांच्या जोडीला ⇨बालगंधर्व-भामिनी आणि ⇨गणपतराव बोडस-लक्ष्मीधर असा मातबर संच जमल्यामुळे हा प्रयोग दृष्ट लागण्यासारखा झाला. केशवरावांनी आपल्या सुरेल व उंच आवाजात ‘माता दिसली’ या पदाला सुरुवात करताच सर्वत्र शांतता पसरली व प्रेक्षकांचे कान गायनाकडे आणि डोळे भूमिकेकडे लागून राहिले. याच काळात महाराष्ट्र केशवरावांच्या गायकीवर बेहद्द खूष होता. त्यानंतर तीन महिन्यांतच ते विषमज्वराने आजारी पडले व पुणे येथे हा अद्वितीय नट वयाच्या बत्तीसाव्या वर्षी रंगभूमीबरोबरच जगाच्या पडद्याआड झाला.

संदर्भ : १. चापेकर, शंकर निळकंठ (नानासाहेब), स्मृतिधन, मुंबई, १९६६.  

            २. पब्लिकेशन्स डिव्हिजन, माहिती व नमोवाणी मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली, आठवणीतील आठ नट, पुणे, १९५८.

जोशी, अ. म.