बोडस, गणपतराव : (२ जुलै १८८० – २३ डिसेंबर १९६५). मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट. संपूर्ण नाव गणेश गोविंद बोडस पण गणपतराव याच नावाने ते ओळखले जात. जन्म शेवगाव (जि. अहमदनगर) येथे. वडील गोविंद विनायक बोडस, हेही गावातील पौराणिक नाटकांत कामे करीत. आईचे नाव सगुणाबाई व पत्नीचे अन्नपूर्णाबाई होते. गणपतरावांचे शिक्षण पुणे येथे मराठी सहा व इंग्रजी दोन इयत्तापर्यंत झाले. शाळेत शिकत असताना ते हौशी नाट्यमंडळातून कामे करु लागले. १८९५ साली त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. तेथे त्यांना पहिली काही वर्षे दुय्यम भूमिका विशेषतः स्त्रीभूमिका मिळाल्या पण हळूहळू त्यांना सौभद्र नाटकात कृष्ण, शारदा नाटकात कांचनभट, मूकनायकात  विक्रांत व मानापमानात  लक्ष्मीधर अशा महत्त्वाच्या भूमिका मिळत गेल्या.

त्यांनी १९१३ साली किर्लोस्कर मंडळी सोडून ⇨ बालगंधर्व   व ⇨ गोविंद सदाशिव टेंबे  यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ ची स्थापना केली. या कंपनीने सौभद्र, मृच्छकटिक, मानापमान, विद्याहरण  इ. नाटकांव्यतिरिक्त संशयकल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, द्रौपदी   इ. दर्जेदार नाटकेही रंगभूमीवर आणली. सुधाकर (एकच प्याला ), लक्ष्मीधर (मानापमान ), शकार (मृच्छकटिक ), शिष्यवर (विद्याहरण ) आणि फाल्गुनराव (संशयकल्लोळ ) या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या. १९३० सालानंतर मराठी रंगभूमीस उतरती कळा लागली व त्यानंतर अल्पावधीतच गणपतराव नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. पुढे त्यांनी एकदोन चित्रपटात भूमिका केल्या, परंतु चित्रपटसृष्टीत त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी प्रामुख्याने होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचेच काम केले.

गणपतराव बोडस

गणपतरावांना १९४० साली नासिक येथे भरलेल्या एकतिसाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. पुढे १९५६ साली नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्याच वर्षी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार देण्यात आला. गणपतरावांनी सु. चाळीस वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाट्यसृष्टीतील अनेक बहुमान प्राप्त करून घेतले. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रथमतः प्रकाशित झाले व त्याची सुधारलेली आवृत्ती १९६४ मध्ये काढण्यात आली. मराठी रंगभूमीच्या इतिहासाच्या दृष्टीने या आत्मचरित्रातील माहिती अत्यंत उपयुक्त आहे. पुणे येथे त्यांचे निधन झाले.  

जोशी, अ. म.