कारखानीस, त्र्यंबक सीताराम : (१५ एप्रिल १८७४—८ जानेवारी १९५६). महाराष्ट्र नाटक मंडळीचे संस्थापक व यशस्वी नाट्य दिग्दर्शक. जन्म महाड व शालेय शिक्षण महाड, ठाणे व पुणे येथे. कौटुंबिक अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवटच राहिले. १० सप्टेंबर १९०४ रोजी महाराष्ट्र नाटक मंडळी स्थापून तिच्यातर्फे कांचनगडची मोहना  या खाडिलकरांच्या नाटकाचा प्रयोग त्यांनी सादर केला. त्यानंतर गडकरी, देवल, खाडिलकर, औंधकर, खरे इ. नामवंत नाटककारांची पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध स्वरूपांची सोळा नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली. त्यापैकी कांचनगडची मोहना आणि शिवसंभव या नाटकांचे प्रयोग खूपच यशस्वी ठरले. कारखानीसांनी सहकार–तत्त्वावर महाराष्ट्र नाटक मंडळी चालविली व तिला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली.

त्र्यं. सी. कारखानीस

कारखानीस उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. नटवर्य केशवराव दाते हे त्यांच्याच तालमीत तयार झाले. सुशिक्षित नट व अशिक्षित नट यांच्या नाट्यशिक्षणपद्धतीत फरक असावा, त्याचप्रमाणे नट हा लौकीक जीवनात सत्प्रवृत्त व शिक्षित असावा, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी नाटक मंडळीत एक ग्रंथालय काढून त्यात नाटके व नाट्यविषयक ग्रंथ यांचा संग्रह केला. नाटक मंडळीतर्फे विद्वानांची एक व्याख्यानमालाही एकदा त्यांनी आयोजित केली.

नाट्यमंडळीच्या व्यवस्थापकाची जबाबदारी स्वीकारल्याने कारखानीसांना नट व नाटककार म्हणून आपल्या विकासाची पुरेशी संधी लाभली नाही. तथापि प्रसंग पडला, तर कोणतीही भूमिका ते पार पाडत. आपल्या १५ वर्षाच्या (१९०४—१९१९) कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीच्या व्यवस्थापनाची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली.

निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या ‘नाट्यमन्वंतर’ या नव्या ध्येयाने प्रेरित झालेल्या नाट्यसंस्थेचे ते सल्लागार होते. १९३९ मध्ये नागपूरला भरलेल्या भरत नाट्य समाजाच्या तिसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.

कारखानीसांनी नाट्यलेखनही केले आहे. राजाचे बंड (१९२४), स्वैरिणी (१९४५ ?), ठाकुरदादा (१९५०) ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. याशिवाय लघुकथा, निबंध, नाट्यविषयक लेख, कविता व स्मृतिचित्रे इ. विविध साहित्यप्रकारही त्यांनी वेळोवेळी हाताळले आहेत. राजकारण, तत्त्वज्ञान, अर्थकारण, साहित्य, ज्योतिष, मार्क्सवाद इ. विषयांचा त्यांचा व्यासंग मोठा होता. नाटक हे लोकशिक्षणाचे साधन मानणारा मराठी रंगभूमीचा हा श्रेष्ठ उपासक पुणे येथे निधन पावला.

जोशी, चंद्रहास