साठे, मकरंद : (२९ ऑगस्ट १९५७– ). आधुनिक प्रयोगशील मराठी नाटककार व कादंबरीकार. मध्यमवर्गीय उच्चशिक्षित कुटुंबात अनंत व शांता या दांपत्यापोटी जन्म. त्यांचे वडील स्त्रीरोगतज्ज्ञ असून आई उच्चविद्याविभूषित आहे. मकरंद साठे हे बी. ई. (आर्च ) असून त्यांनी स्वतःचा वास्तुव्यवसाय सुरू केला (१९८१). वास्तुतज्ज्ञ व अंतर्गत रचनाकार म्हणून व्यवसाय केल्यानंतर (सु. वीस वर्षे ) त्यांनी आता पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र विभागात त्यांनी अभ्यागत अधिव्याख्याता या नात्याने व्याख्याने दिली (१९९६ ते २०००). प्रख्यात लेखिका प्रतिभा रानडे यांच्या कन्या धनमंजिरी यांच्याशी ते विवाहबद्घ झाले. त्या पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या विभागप्रमुख आहेत. १९८७ मध्ये पुणे येथे ‘थिएटर अकॅडमी’ या संस्थेने ‘फोर्ड फाउंडेशन’ च्या सहकार्याने नवनाटककारांसाठी कार्यशाळा आयोजित केली, त्यात मकरंद साठे यांनी चारशे कोटी विसरभोळे (प्रथम प्रयोग : ९ डिसेंबर १९८७) हे नाटक वाचले. त्याने वेगळा आशय व नावीन्यपूर्ण शैली यांमुळे जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. असंगत वा व्यस्त (ॲब्सर्ड ) नाट्यप्रकारातले मराठीमधले हे एक महत्त्वपूर्ण नाटक आहे. १९८५–३९८५ या कालावकाशात घडणारा मुक्त कल्पनांचा क्रीडाविलास या नाटकात तिरकस, औपरोधिक शैलीत रंगवला आहे. ३९८५ मध्ये माणसे काळ हेच चलन म्हणून वापरतील, ही विचक्षण कल्पना उद्योगजगतातील निर्घृण व्यवहारावर भेदक भाष्य करणारी आहे. सप्त चिरंजिवींपैकी हनुमान व अश्वत्थामा ही पौराणिक पात्रे जर आजच्या जगात वावरु लागली, तर उडणारा गोंधळ व घोळ यांचेही तिरकस विनोदी शैलीतले चित्रण या नाटकात आहे. साठे यांची इतर उल्लेखनीय नाटके अशी : रोसाम्राज्याची पडझड (प्र. प्र. १९८६), सापत्नेकराचं मूल (प्र.१९८९, १९९३), ऐसपैस सोईने बैस (१९९५), ठोंब्या (प्र. प्र. १९९६, प्रका. १९९८), सूर्य पाहिलेला माणूस (प्र. प्र. २४ जानेवारी १९९९), www.गोळायुग.com (२०००), चौक (२००४), ते पुढे गेले (२००७), दलपतसिंग येती गावा (२०१०) इत्यादी. घर (१९८६) आणि वाढदिवस (१९८७) या दोन एकांकिका त्यांनी लिहिल्या. नाट्यलेखनाबरोबरच नेपथ्यरचना व नाट्यदिग्दर्शन या क्षेत्रांतही त्यांनी भरीव कार्य केले. सापत्नेकराचं मूल या नाटकात निपुत्रिक जोडपे व त्यांच्यात कृत्रिम गर्भधारणेच्या संभाव्य पर्यायाने होणारे बेबनाव, ताणतणाव, मानसिक घुसमट व असुरक्षिततेची भावना यांचे प्रभावी चित्रण आहे. या नाटकावर सौमित्र रानडे यांनी वेगळ्या शैलीचा चित्रपट काढला (१९९८). त्याची पटकथा व संवाद मकरंद साठे यांनी लिहिले. सॉक्रेटिसच्या जीवनावर व तत्त्वज्ञानावर आधारित सूर्य पाहिलेला माणूस हे त्यांचे नाटक विशेष गाजले. अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेली सॉक्रेटिसची भूमिका संस्मरणीय होती. आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण यांच्या रेट्यामुळे आधुनिक नागर जीवनात सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मूल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घुसळण होते आहे. या स्थितीमुळे गोंधळलेल्या, भांबावलेल्या सामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेचे प्रतीकात्मक चित्रण चौक या नाटकात वाहतुकीच्या कोंडीचे प्रतीक वापरून साठे यांनी केले आहे. त्यांच्या अनेक नाटकांचे अनुवाद इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, उर्दू, कन्नड इ. भाषांतून झाले आहेत. त्यांनी अच्युत आठवले आणि आठवण (२००३) आणि ऑपरेशन यमू (२००४) या कादंबऱ्या लिहिल्या. मराठी कादंबरीला वेगळे वळण व नवी दिशा देणाऱ्या या आधुनिक कादंबऱ्या आहेत. आधुनिकोत्तर समाजजीवनावर विज्ञान व तंत्रज्ञान यांचे होणारे परिणाम, आधुनिक नागर जीवनातील असंगतता व निरर्थकता अशी अनेकविध अनुभवसूत्रे त्यांच्या नाटक-कादंबऱ्यांतून प्रतीत होतात. बंगलोरच्या ‘इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्स’ या प्रतिष्ठानातर्फे त्यांना अभ्यासवृत्ती मिळाली (२००८– १०) त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मराठी रंगभूमीच्या तीस रात्री : एक सामाजिक-राजकीय इतिहास (तीन खंड २०११) हा ग्रंथ लिहिला. नाटककार व विदूषक यांच्या प्रदीर्घ संवादातून अतिशय रंजक पद्घतीने हा इतिहास कथन केला आहे. याखेरीज त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून अनुबोधपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांना अनेक मानसन्मान व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. सूर्य पाहिलेला माणूससाठी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९९) व विशेष कलागौरव पुरस्कार (१९९९), अच्युत आठवले आणि आठवण या कादंबरीसाठी श्री. ज. जोशी पुरस्कार (२००३) व ह. ना. आपटे पुरस्कार (२००३-०४), चौक या नाटकाला मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे जयवंत दळवी पुरस्कार (२००६), ते पुढे गेले या नाटकासाठी गोवा हिंदू असोसिएशनचा (२००८) व महाराष्ट्र फाउंडेशनचा (२००८) असे पुरस्कार, ठोंब्या या नाटकाच्या लेखनासाठी ‘नाट्यदर्पण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार, सामाजिकतेचे भान ठेवून रंगभूमीवर केलेल्या एकूण कामगिरीचा गौरव म्हणून दिला जाणारा ‘बलराज सहानी पुरस्कार’ (२०११) आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशील लेखन करून मराठी साहित्याला नवी दिशा दाखविणाऱ्या लेखकाला दिला जाणारा ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ (२०११) अशा पुरस्कारांनी त्यांच्या लेखनकार्याचा गुणगौरव करण्यात आला आहे.

इनामदार, श्री. दे.