रंगभूषा, रंगभूमीवरील : (मेकअप, थिएट्रिकल). रंगभूमीच्या संदर्भात रंगकला म्हणजे आंगिक कलाविष्कार. नाट्यप्रयोगातील पात्र आंगिक कलाविष्कार करताना आपली चेहरेपट्टी किंवा इतर शारीरिक भाग यांचे जे विशिष्ट प्रसाधन करतात, त्यास रंगभूषा असे सामान्यपणे म्हणता येईल. सोंग आणणे हे रंगकलेचे उद्दिष्ट असल्यामुळे रंगभूषा हे त्या कलेचे एक महत्त्वाचे अंग ठरते. अगदी प्रारंभी रंगभूषेचे स्वरूप काहीसे भडकच असे. त्यावेळी मुखलेपनासाठी जी चूर्णे होती, त्यात हळदीचे प्रमाण जास्त होते पण त्यामुळे चेहरे पिवळे दिसत. म्हणून हिंगुळाचा वापर करण्यात येऊ लागला व त्याबरोबर पिवळी माती, सफेती, काजळ, काव यांसारखी इतर प्रसाधनद्रव्येही वापरण्यात येऊ लागली. थेस्पिस या ग्रीक कवीने आपल्या नाटकात अशा प्रकारच्या रंगभूषेचा उपयोग केला होता (इ. स. पू. ५३५). हीच परिस्थिती साधारणपणे इ. स. १६०० पर्यंत टिकून होती आणि नंतर मात्र शेक्सपिअर या जगन्मान्य नाटककाराने आपल्या नाट्यप्रयोगांत केसांच्या टोपांचा व कृत्रिम दाढीमिशांचा वापर केला. नाटकातील पात्रे रंगभूषा करूनही वास्तव दिसतील, याची काळजी घेण्याचा तो एक प्रयत्‍न होता.

भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रात रंगभूषा, वेशभूषा, देखावे या सर्वांना ‘नेपथ्य’ अशी संज्ञा दिलेली आहे. रंगभूषेच्या दृष्टीने त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत. तत्कालीन नाट्यविषयांनुसार त्या सूचना होत्या. पुराणोक्त नवरसांना अनुकूल अशी ती रंगभूषा होती. नाट्यशास्त्रात ‘विशेषकच्छेद’, दशवसनारंगराग, नेपथ्ययोग, वर्णपत्रभंग, केशमार्जनकौशल्य, भूषणयोजना, श्मश्रुयोजना असे रंगभूषेचे व आभूषणांचे प्रकार सांगितलेले आहेत.

ग्रीक नाटके उघड्या मैदानात हजारो प्रेक्षकांच्या समोर होत. सर्वांना रंगमंचावरील पात्रे नीट दिसावीत, म्हणून मुखवट्यांचा वापर उपयुक्त ठरला. मुखवट्यांना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ‘प्रतिशीर्षक’ अशी संज्ञा आहे. मुखवट्यांमुळे मुद्राभिनय मात्र दिसू शकत नसे. भरतमुनींनी मुखवटे हे प्राणी, पक्षी यांच्या सोंगापुरते वापरावेत. असे म्हटले आहे. ते झाडाच्या पातळ साली, मेण, बांबू, लोकर वगैरेंचा उपयोग करून तयार करावेत. मात्र मुख्य नटाशिवाय इतरांनीच हे मुखवटे वापरावेत, अशी भरतमुनींची सूचना आहे.

मुद्राभिनयाच्या अनिवार्य व महत्त्वाच्या भागाकडे मुखवट्यांमुळे दुर्लक्ष होऊ लागल्यावर रंगभूषेने योग्य तो परिणाम कसा साधता येईल, याचा विचार सुरू झाला आणि रंगभूषाशास्त्र प्रगत होऊ लागले.

मराठी रंगभूमीच्या संदर्भात अगदी १९०४ पर्यंत वर सांगितलेली द्रव्ये म्हणजे पिवळी माती, सफेती, काव इ. वापरूनच रंगभूषा करण्यात येई. त्यानंतर रंगभूमीवर अप्पासाहेब टिपणीस, कारखानीस इ. सुविद्य नट आले. त्यांनी इंग्रजी पुस्तके वाचून रंगभूषाशास्त्राचा विकास घडवून आणला. ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’चे एक नट वामनराव ऊर्फ मामा भट यांनी नटाचा पेशा सोडून दिला आणि रंगभूषेसाठी लागणाऱ्‍या रंगांचा कारखाना काढला. रंगभूषाकाराचा पेशा असणारे सुविद्य रंगभूषाकार नाना जोगळेकर यांचीही उत्पादने प्रसिद्ध होती.

विद्यमान काळात रंगभूषेच्या साधनांची कमतरता नाही. जगविख्यात ‘मॅक्स फॅक्टर’ या कंपनीच्या उत्तम दर्जाच्या रंगसाहित्याच्या तोडीचे रंग व इतर साहित्य भारतात तयार होऊ लागले आहे. तथापि पाश्चात्त्यांची या क्षेत्रातील प्रगती फार मोठी आहे. रंगभूषेतील त्यांची कामगिरी आणि कारागिरी दोन्ही लक्षवेधी आहेत.

रंगभूमीसाठी करावी लागणारी रंगभूषा ही सर्वप्रथम प्रकाशासाठी करावी लागते. रंगभूमीवर पडणाऱ्‍या प्रखर प्रकाशामुळे नाक, डोळे, ओठ, गाल इ. चेहेऱ्‍याचे भाग अस्पष्ट होतात. ते नीट दिसण्यासाठी मूळच्या रंगापेक्षा वेगळे रंग लावून ते ठसठशीत करावे लागतात. हा रंगभूषेचा मूळ उद्देश आहे. नंतर भूमिकानुरूप रंगभूषा वगैरे भाग असतो. रंगभूषेच्या दृष्टीने दोन प्रकारांत नाटके विभागली जातात : (१) नाट्यधर्मी व (२) लोकधर्मी. नाट्यधर्मी नाटके जास्त कृत्रिमतेकडे झुकणारी असतात. लोकधर्मी नाटके सामाजिक व वास्तवदर्शी असतात. नाट्यधर्मी नाटके प्रामुख्याने ऐतिहासिक, पौराणिक व काल्पनिक असतात. रंगीबेरंगी भडक नेपथ्य, भरजरी पोशाख व चमचमणारे दागिने या सर्व झगमगाटातून चेहराही तेवढाच उठावदार दिसण्यासाठी त्यातील पात्रांची रंगभूषा भडक स्वरूपाची करावी लागते. उलट लोकधर्मी नाटकांतील सर्व पात्रे वास्तव समाजातील असल्याने त्यांची रंगभूषा सफाईदार कौशल्याने वास्तवदर्शी करावी लागते. लावलेला रंग प्रेक्षकांना तर कळणार नाही परंतु चेहरा परिणामकारक दिसेल अशी किमया साधावी लागते.

हे सर्व साधण्यासाठी जी साधनसामग्री लागते, तीत प्रामुख्याने तळाचा रंग (फाऊंडेशन्स), विविध छटांचे रंग (लायनिंग कलर्स), भुवई (आय ब्रो) पेन्सिल, ओठाच्या रंगकांड्या (लिपस्टिक), क्रेप-हेअर, केसांचे टोप, गोट्यांसाठी टोप्या, विविध प्रकारचे टकलांचे टोप इत्यादींचा समावेश असतो. या सामग्रीत जरूरीप्रमाणे रबर (लॅटेक्स), कापूर, टिश्यू पेपर, कृत्रिम दात (जे मूळच्या दातावर बसू शकतात) यांची भर पडते. रंगभूषेच्या सामानाची पेटी ही जणू जादूची पेटीच असते.

रंगभूषेचे तंत्र दृष्टिभ्रमावर बसवलेले आहे. जे नाही ते आहे असा भास निर्माण करण्याचे कार्य रंगभूषा करते. परंतु आता रबराच्या साहाय्याने या गोष्टी अधिक परिणामकारक दाखविण्याचे तंत्र निर्माण झाले आहे. यासाठी चेहेऱ्‍याच्या विविध भागांसाठी वेगवेगळे रबराचे तुकडे भूमिका करणाऱ्‍या नटाच्या चेहऱ्‍याचे माप घेऊन हुबेहूब बनविले जातात आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या किमया साधता येतात. चेहेऱ्‍याची संपूर्ण ठेवण बदलता येते आणि सर्व प्रकारच्या चेहऱ्‍यांबरोबर हलते मुखवटे तयार करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करता येते.

रंगभूषा करण्याची प्राथमिक पद्धत पुढीलप्रमाणे आहे. प्रथम संपूर्ण चेहेऱ्‍याला तळाचा रंग लावतात. त्यांना छटेप्रमाणे २५ ते ३१ असे नंबर दिलेले असतात. तळाचे रंग हे नलिका, डबी व कांडी अशा तीन प्रकारांत उपलब्ध आहेत. नलिका आणि कांडीमधील रंग तैलयुक्त असतात ते बोटांनी लावावे लागतात. तर वडीच्या स्वरूपातील डबीतील रंग स्पंजच्या साहाय्याने पाण्याने लावतात. तळाचा रंग लावून झाल्यावर त्यावर लाली लावतात. डोळे, भुवया इ. कोरतात व ओठ रंगवतात. ही सर्वसाधारण रंगभूषा झाली. मग भूमिकेनुरूप केसांचे टोप, दाढ्या, मिशा इ. लावून रंगभूषा पूर्ण करतात. चेहऱ्‍यावर सुरकुत्या वगैरे दाखविण्यासाठी भुवई-पेन्सिल किंवा वर सांगितलेले छटा-रंग वापरतात. सुरकुत्या दाखविण्यासाठी व त्यांची जाडी प्रकर्षाने दिसावी म्हणून द्रवरूप रबर (लॅटेक्स), कापूस किंवा टिश्यू पेपर यांचा वापर करतात.

मानवी चेहेऱ्‍यावर इतर पशुपक्ष्यांचे चेहरे नुसत्या रंगाच्या साहाय्याने दाखविणे, संपूर्ण शरीर रंगानी रंगवून त्यात नक्षीकाम करणे इ. गोष्टी रंगभूषेद्वारा साधता येतात. निव्वळ शोभेचे रंगभूषाशास्त्रही आता प्रगत झाले आहे. देह-रंगभूषेसाठी (बॉडी मेकअप) खास तयार केलले जलरंग वापरतात. जपान, अमेरिका, प. जर्मनी इ. देशांत नृत्यामध्ये अशा प्रकारची रंगभूषा केली जाते. या नृत्यात नुसत्या रंगांनी देहाची नग्नता झाकलेली असते. अनेकरंगी कृत्रिम केसांचे टोपही नृत्याचे वेळी वापरण्याची पद्धत आहे. प्रकाशयोजनेच्या करामतीमुळे हे नृत्य लोकप्रिय होऊ लागलेले आहे.

भारतात अत्याधुनिक रंगसाहित्य असूनही कथकळी, यक्षगान इ. परंपरागत नाट्यप्रकारांमध्ये मात्र हातांनी घोटलेले वनस्पतिजन्य नैसर्गिक रंग वापरण्याची पद्धत टिकून आहे.

व्यावसायिक रंगभूमीवर बरेच नट स्वतःची रंगभूषा स्वतःच करतात. जरूर तेथे रंगभूषाकाराची मदत घेतात. ही पद्धत सर्वत्र आहे. सरावामुळे अनेक नामवंत नट स्वतःपुरते चांगले रंगभूषाकार बनले आहेत.

रंगभूषेच्या रंगासाठी लायशनर, मॅक्स फॅक्टर या परदेशी कंपन्या प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे माय-फाय, स्टार ह्या कंपन्याही उत्कृष्ट दर्जाच्या रंगसाहित्यनिर्मितीत पुढे येत आहेत. आपल्याकडे पाश्चात्त्यांप्रमाणे रंगभूषेचे प्रशिक्षण देणारी संस्था मात्र नाही.

पहा : वेषभूषा, रंगभूमीवरील.

संदर्भ : 1. Baird, John F. Makeup : A Manual for the Use of Actors : Amateur and Professional. London, 1930

2. Liszt, Rudolph G. The Last Word in Make-Up (Make-Up Encyclopedia), London, 1939.

3. Melvill, Harold, Magic of Make-Up by the Most Modern Methods for Stage and Screen, London, 1957.

भावे, प्रभाकर