विनायक रामचंद्र हंबर्डे

हंबर्डे, विनायक रामचंद्र: (२३ एप्रिल १९०८-१९ नोव्हेंबर १९६३). वैदर्भीय मराठी नाटककार, कादंबरीकार व संपादक. अमरावतीजवळील बडनेरा या उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म रामचंद्र व पार्वतीबाई या दांपत्यापोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर (१९२७) पत्रकार म्हणून त्यांनी नोकरीस सुरुवात केली (१९२९). तत्पूर्वीच त्यांनी नाट्यलेखनाला प्रारंभ केला होता. त्यांचे शीलप्रभा (१९२७) हे पहिले नाटक. ना. रा. बामणगावकर संपादित उदय या साप्ताहिकाचे उप-संपादकपदही त्यांनी सांभाळले. पुढे अनंत हरि गद्रे संपादित मौज निर्भीड या साप्ताहिकांचे ते लेखक व सहसंपादक होते (१९३४). वयाच्या स त्ता वि सा व्या वर्षी ते देशबंधू चे संपादक झाले. १९३७ मध्ये त्यांनी उल्हास हे वाङ्मयीन मासिक, ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ नावाची स्वतःची नाट्यसंस्था, १९४३ मध्ये ‘उल्हास प्रकाशन’ ही प्रकाशनसंस्था, तसेच नागपूर येथे ‘रामचंद्र प्रिंटिंग प्रेस’ या नावाने मुद्रणालय स्थापन केले. १९४७ मध्ये देशबंधू या दैनिकाचे तेमुख्य संपादक होते. १९४४-१९५७ दरम्यान नागपूर-अमरावती येथून चित्रपटसृष्टीला वाहिलेले किरण साप्ताहिक त्यांनी चालविले.

हंबर्डे यांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यांनी एकूण ३१ नाटके, ८ कादंबऱ्या व एक कथासंग्रह, तसेच काही लेख, नभोवाणी केंद्रासाठी श्रुतिका इ. लेखन केले.

१९२७-६३ हा हंबर्डे यांच्या नाट्यलेखनाचा, तर १९३०-४७हा त्यांच्या कादंबरीलेखनाचा कालखंड आहे. त्यांच्या नाट्यलेखनावर ⇨ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ⇨ कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, ⇨ राम गणेश गडकरी या महान नाटककारांचा प्रभाव आहे. हंबर्डे यांनी नाट्य-लेखनास आरंभ केला, त्या वेळी या नाटककारांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजत होती. याशिवाय विदर्भातील ना. रा. बामणगावकर, वीर वामनराव जोशी यांच्या नाटकांचा प्रभावही त्यांच्या नाटकांवर आहे.

हंबर्डे यांच्या ३१ नाटकांपैकी फक्त २२ नाटके उपलब्ध आहेत. त्यांमध्ये आठ ऐतिहासिक, सात सामाजिक, सात पौराणिक नाटकांचा समावेश आहे. त्यांची २७ नाटके वेगवेगळ्या नाट्यसंस्थांतर्फे रंग-भूमीवर आली. जयराम व जयमाला शिलेदारांची ‘मराठी रंगभूमी नाटक मंडळी’, बेंजामिन फ्रँकलिन यांची ‘कला मंदिर संस्था’, शिरगोपीकरांची ‘आनंद संगीत मंडळी’ यांसारख्या नावाजलेल्या नाटक कंपन्यांनी त्यांच्या नाटकांचे अनेक प्रयोग विदर्भात केले. त्यांमध्ये त्यांच्या सन १८५७ अर्थात झांशीची राणी (१९३९), बाजीराव मस्तानी (१९५७) ही ऐतिहासिक नाटके अठरा अक्षौहिणी हे पौराणिक नाटक कमळाच्या पाकळ्या, बिगारीचा बैल ही सामाजिक नाटके दख्खनची राणी (१९४७) इ. नाटकांचा समावेश होतो. कृष्णसुदामा हे त्यांचे अखेरचे नाटक होय.

हंबर्डे यांच्या कादंबऱ्यांपैकी ‘मुकुंद गाडीवान’ या टोपणनावाने लिहिलेल्या होळीचे निखारे (१९४३) व अप्सरा (१९४३) या कादंबऱ्या त्यांनी आपल्या उल्हास प्रकाशनाद्वारे प्रकाशित केल्या. २००९ मध्ये त्यांच्या अप्सरा या कादंबरीची दुसरी आवृत्ती निघाली. याशिवाय वाळवंट, बहुरूपी, नागीण, राजसूय यज्ञ (१९६०) या कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले. राजमाता जिजाबाई ही त्यांची कादंबरी त्यांचे पुत्र विजय हंबर्डे यांनी २००७ मध्ये प्रकाशित केली. यांशिवाय हंबर्डे यांनी कथा मंजिरी नावाचा एकमेव कथासंग्रह लिहिला असून, काही नाटकांचे दिग्दर्शनहीकेले आहे.

वृत्तपत्रकार, मुद्रक, प्रकाशक, कथाकार, कादंबरीलेखक, नाट्य-लेखक, नाट्यदिग्दर्शक अशा विविध भूमिका हंबर्डे यांनी सक्षमतेने साकारल्या. महाराष्ट्र शासनाने त्यांना रु. २,५००/- चे वार्षिक अनुदान देऊन त्यांच्या वाङ्मयीन सेवेचा गौरव केला. त्यांच्या पत्नीचे नाव वत्सलाबाई असून त्यांना ४ मुले व ३ मुली आहेत.

कर्करोगाने नागपूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १. बोडेवार, राम, नाटककार वि. रा. हंबर्डे, चंद्रपूर, २००५.

            २. वेलणकर, अ. द. जयस्वाल, राजन बोडेवार, राम व इतर, वैदर्भीय रंगभूमी : स्वरूप आणि समीक्षा (स्मृती ग्रंथ ), नागपूर, २००८.

पोळ, मनीषा