लळित : एक पारंपरिक मराठी नाट्यप्रकार, नारदीय कीर्तनपरंपरेत या प्रकाराचा समावेश करतात. विशेषतः कोकणातल्या, गोव्यातल्या नारदीय कीर्तनपरंपरेत लळिताचे स्थान अनन्यसाधारण आहे. नवरात्र, कार्तिकी एकादशी, माघ शुद्ध चतुर्थी, देवीचे नवरात्र, विविध देवस्थानांचे उत्सव यांसारख्या धार्मिक  ‘लळिता’तील सूत्रधार, सरस्वती आणि गणपती.’उत्सवप्रसंगी संबंधित देवतेच्या प्रीत्यर्थ नऊ, सात किंवा पाच दिवस कीर्तन, प्रवचन, भजनादी कार्यक्रम करण्यात येतात. शेवटच्या दिवशी पहाटे उत्सवदेवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या दरबारात अठरापगड जातींची सोंगे हजेरी लावतात व कीर्तनकारासमवेत मागणे मागतात. याला ‘लळित’ म्हणतात. ही सोंगे त्या त्या प्रांतांतील संप्रदायांनुरूप असतात. ती त्या त्या देवतेजवळ मागणे मागून झाल्यावर प्रसाद मागतात. मग तो श्रोत्यांना वाटतात. काही ठिकाणी उत्सवाच्या वेळी भक्तांची वा जमातींची निरनिराळी सोंगे घेऊन नाट्यप्रवेशाप्रमाणे ती सादर करतात. त्यालाही लळित म्हणतात.

डॉ. आनंद कुमारस्वामींना ‘लळित’ हा शब्द ‘लीला’वरून आला असावा असे वाटते. त्यांच्या मते यात कृष्णलीलेची सोगे करून कृष्णकथा सादर करतात. तथापि लळितात कृष्णकथेबरोवरच रामकथा व भक्तकथाही येतात.

लळिताचे मुख्य प्रयोजन वेदान्त-तत्त्वज्ञान सोंगांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनावर बिंबवणे, हे आहे. त्यात काही सोंगे करमणुकी साठी येतात. त्यांमध्ये भालदार, चोपदार, छडीदार, वासुदेव, ढंढारी, गोंधळी, वाघ्या-मुरळी, बहिरा, मुका, आंधळा, वैदू व वेसकर, कुडमुड्या जोशी यांसारखे लोकसंस्कृतीचे अनेक उपासक येतात. त्यांच्याबरोबर दशावतारांचे खेळही येतात. यातल्या पात्रांची रंगभूषा गडद असते. काही पात्रांचे मुखवटेही गडद रंगांचे असतात. यांची वेशभूषा भडक असते. पूर्वी हे खेळ रात्री मशालीच्या प्रकाशात केले जात. आता विजेचे दिवे वापरतात. लळिताचा शेवट सर्वसाधारणतः रावणवधाच्या प्रसंगाने व नंतर रामाची मंगलारती करून होतो. आधुनिक मराठी रंगभूमीचे आद्य जनक विष्णुदास भावे यांच्या नाटकांना लळितांची पार्श्वभूमी होती.

 

लळिताचा रंगमंच साधारणतः दीड ते दोन फुट उंच असून तो लाकडी फळ्यांचा असतो. त्याचे आकारमान सु. २०‘ × १८‘ (६ × ५.५ मी.) असते. पूर्वी या रंगमंचाच्या पाठीमागे पडदा नसे, आता तो असतो. एका बाजूला गायक, पेटीवादक, तबलजी बसतात. दुसऱ्या बाजूने पात्रे ये-जा करतात. काही साथीदार सूर धरतात. यानंतर प्रथम मंगलाचरण होते. यात सूत्रधार व पारिपार्श्वक असतो. ते गणपतीचे संस्कृत-मराठीतून स्तवन करतात. मध्येच विदूषक येऊन काही विनोद करतो. सूत्रधार एक पद गातो. हे पद त्या त्या वेळच्या देवतोत्सवाशी संबधित असते. हे पद संपल्यावर त्याची पत्नी प्रवेश करते. ती तिला म्हणतो, ‘आज आपल्याला अमुक देवतेसमोर लळित करायचंय. मला तुझी मदत हवीय.’ ती पद गाऊन त्यातून त्याला मदतीचे आश्वासन देते. त्यानंतर त्यांचे देवतास्तुतिपर द्वंद्वगीत होते. नंतर फक्त सूत्रधार गणेशस्तवन करून लळिताचे मंगलाचरण संपवितो.

सूत्रधार नारदीय कीर्तनपठडीतील असतो. पगडी, बाराबंडी, उपरणे, भिकबाळी, धोतर असा त्याचा पेहराव असतो. नटी नऊवारी जरतारी साडी नेसते. काळा पायघोळ अंगरखा, सुरवार, पायात चाळ, हातात आरसा, उंच लाल रंगाची टोपी, कपाळी गंधाचा मोठा टिळा असा विदूषकाचा थाट असतो.

 

लळितातील मुख्य पात्रांपैकी चोपदार व पाटील ही पात्रे प्रथम येतात. चोपदाराची सुरवार, अंगरखा व पटका हे सर्व लाल रंगाचे, तर पाटलाची सुरवार, अंगरखा, पिळाची पगडी व उपरणे पांढऱ्या रंगाचे असते. चोपदाराच्या हातात छडी व कमरेला पट्टा असतो. हे दोघे हिंदीत बोलतात. अभंग, भारुडे मराठीतून गातात. अधूनमधून पदरचे हिंदी शब्द अभंगात घालतात. 


लळितावर इस्लाम राजवटीचा प्रभाव असावा असे वाटते. कारण लळितातील काही आख्याने हिंदी भाषेतील आहेत. मराठवाडा व हैदराबादच्या सरहद्दीवर अशी काही मोजकी लळिते सापडतात. यांतले संवाद आध्यात्मिक आशयाचे सूचक असतात. संवादांची भाषा वरवर व्यवहाराची असते, परंतु तीमधून वेदान्तनिरूपण येते. संवादांत उत्सवमूर्तीची स्तुती, त्यांचे गुणवर्णन हेही असते. एकनाथांच्या भारुडातील ‘हिंदु-तुर्क’ संवादाप्रमाणे अशा संवादांचे स्वरूप असते. नमुन्यादाखल पुढील संवाद पहा-

‘पाटील – इस देह का नाम ?

चोपदार – देह अनाम है 

पाटील – देहके सदस्य कौन और कितने है?

चोपदार – सोलह. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रिये, मन-बुद्धी-अहंकार-सत्त्व-रज-तम असे

                एकूण सोळा…….

 

यानंतर दोन गाणी होऊन हा प्रवेश संपतो.

 

राजभाट, पाटील, गावभाट येतात. धोतर, अंगरखा, घोंगडी, मुंडासे, कानात बाळ्या, गंध, हातात सोटा अशा थाटात मावळा येतो. मग त्यांचा संवाद होतो. यात गावभाट आपल्या पराक्रमाची फुशारकी सांगतो. गावभाट व राजभाट यांच्यात शाब्दिक खटके उडतात. त्यांत राजभाट हरतो. गावभाट जिंकतो. जंगम येतो. तो कानडीमिश्रित मराठी बोलतो. त्यातून विनोदनिर्मिती होते. ब्राह्मण, काशीकापडी, वाध्या मुरळी ही सोंगे क्रमाने येतात. यांचे संवाद रंजक व उद्‌बोकधक असतात.

 

मध्यरात्री सुरू झालेले लळित सकाळपर्यंत चालते. त्यात एकनाथांची भारुडेही साभिनय सादर करतात. यानंतर सूत्रधार बुवांना पाचारण करतो. बुवांच्या भोवती सर्व सोंगे हात जोडून उभी राहतात. बुवा पेटी-तबल्याच्या साथीसह पहाटे पाचला लळिताचा दरबार भरवतात. ‘‘रत्नजडित सिंहासन। वरी शोभे रघुनंदन।  वामांगी ते सीतामाई। जगज्जननी माझे आई।।’’ हे समर्थ रामदासांचे परंपरागत पद म्हणतात. यानंतर ‘‘राम सर्वांगी सावळा। हेम अलंकार पिवळा। नाना रत्नांचिया कळा। अलंकार शोभती।।’’ हा समर्थ रामदासांचा अभंग गातात. मग या सर्वांच्या वतीने उत्सवमूर्तीचा तीनदा जयजयकार करतात. बुवा हातात श्रीफल घेतात. जनताजनार्दनाच्या वतीने कल्याणपर मागणे मागतात. सर्वांचे शुभ चिंतितात. ‘ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो। सगळा गाव आनंदाने पुढत्या लळितापर्यंत नांदो। आपापसांतले कलह लळितात मिटोत। कोणाच्याही मनात किल्मिष न उरो। निकोप मनाने व्यवहार चालोत। सदाचरणाने समाज वागो।’ अशी इच्छा बुवा देवापुढे बोलून दाखवितात. या प्रत्येक इच्छेला आज्ञा म्हणतात. या प्रत्येक आज्ञेनंतर प्रत्येक सोंग ‘हो जी’, ‘हो जी’ करते. म्हणजे यांच्या मुखाने देवाने होकार दिला. मग बुवांनी साष्टांग नमस्कार घातला की लळित संपते. शेवटी सर्वांना प्रसाद वाटतात.

लळित हे खास कोकणातले. लळित करणाऱ्यांत प्रख्यात कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धनबुवा, गौतमबुवा पाठक, लक्ष्मणबुवा निजामपूरकर, यशवंतबुवा बर्वे, चिंतामणिबुवा वाड, गजाननबुवा राईलकर, रामचंद्रबुवा शिरवळकर, प्रल्हादबुवा आयाचित, मुकुंदबुवा रावेरकर, नरहरबुवा कऱ्हाडकर आदींचा समावेश होतो. यांच्या प्रत्येकाच्या लळित आख्यानाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. लळिताचा प्रयोग वरीलप्रमाणे होतो. पण लळितात कथन केले जाणारे रामचरित्र वा कृष्णचरित्र प्रत्येकाचे वेगवेगळे असते. त्यांच्या कथनशैली भिन्न असतात. अद्यापही कोकणात लळित रूढ आहे महाराष्ट्रात इतरत्र मात्र ते अस्तंगत होत चालले आहे. कोकणातल्या सर्व देवतांच्या उत्सवात आजही लळिताशिवाय उत्सवाची सांगता होत नाही.

पाठक, यशवंत