वाजिद अली शहा : (१८२३–१ सप्टेंबर १८८७). अवधचा शेवटचा नवाब, कलांचा उपासक व आश्रयदाता आणि उर्दू रंगभूमीचा जनक. वाजिद अली शहा १३ फेब्रुवारी १८४७ रोजी आपल्या पित्याच्या– अमजद अली शहाच्या–मृत्यूनंतर लखनौच्या गादीवर आला. त्याने आपल्या दरबारात संगीत, नृत्य, नाट्य, काव्य आदी कलांना उदार आश्रय दिला. तो स्वतः कवी होता, संगीताची दैवी देणगी लाभलेला रचनाकार होता व उत्कृष्ट कथ्थक नर्तक होता. बासितखाँ, प्यारखाँ,जाफरखाँ अशा उस्तादांकडे त्याने गायकीचे धडे घेतले व ठाकूर प्रसादजी व बिंदादीन महाराज यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. त्याने ‘अख्तरपिया’ या टोपण नावाने अनेक चीजा बांधल्या. त्याच्या काव्यरचनांमध्ये ठुमऱ्या, गझला, मस्नवी (खंडकाव्य) इ. प्रकारांचा अंतर्भाव होतो. दीवान इ अख्तर, हुस्नअख्तर या काव्यसंग्रहांत त्याच्या गझलरचना आहेत. त्याने लखनौ सोडल्यावर प्रजाजनांना जे तीव्र दुःख झाले, त्या दुःखाचा व त्याच्या स्वतःच्याही वियोगभावाचा उत्कट दर्दभरा आविष्कार घडविणारी ‘बाबुल मोरा नैहर छुठो जाय’ ही त्याने रचलेली लखनौ ढंगाची ठुमरी अत्यंत लोकप्रिय ठरली. वाजीद अलीचे उर्दू, अरबी, हिंदी व ब्रज या भाषांवर उत्तम प्रभुत्व होते व या भाषांच्या मिश्रणातून त्याने स्वतःची खास शैली घडविली. त्याने अनेक नवीन रागांची रचना केली व त्यांना ‘जोगी’, जुही, ‘शाहपसंद’ अशी नावे दिली , असे मानले जाते. वाजिद अली शहा गादीवर आला, तेव्हा त्याचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांवर होते, त्यांपैकी बराचसा पैसा त्याने संगीत, नृत्य, नाटक आदी कलांवर खर्च केला. त्याने ‘परीखाना’ (पऱ्यांचे निवासस्थान) उभारून तेथे शेकडो सुंदर मुलींना राजाश्रयाखाली तज्ञ गुरूंकडून नृत्यसंगीताचे शिक्षण दिले. ह्या मुलींना  निरनिराळ्या पऱ्यांची नावे दिली जात. उदा., सुलतान परी, माहरूख परी  इत्यादी. वाजिद अली आपल्या प्रत्येक वाढदिवशी जोग्याची भगवी वस्त्रे परिधान करून, जोगीणवेषातील दोन पऱ्यांसह दरबारी प्रवेश करीत असे. हळूहळू ह्याचे रूपांतर भव्य व भपकेबाज अशा शोभायात्रेत झाले. त्याला ‘जोगीया जश्न’ असे म्हणत. लखनौतील असंख्य प्रजाजनही भगवी वस्त्रे परिधान करून ह्या मिरवणुकीत सामील होत असत. रणबीरसिंगच्या मते ह्या जोगीया जश्नमधूनच हिंदुस्थानी रंगभूमीची सुरुवात झाली. वाजिद अली शहाने ‘कैसरबाग’ ह्या भव्य महालाच्या उभारणीनंतर (१८४८–५०) आपल्या ‘रहस’चे (रासलीलाचे इराणी नाव) प्रयोग त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात सादर करण्यास सुरुवात केली. ह्या प्रयोगांत नाट्य, काव्य, नृत्य व संगीत ह्यांचे अत्यंत रंजक मिश्रण असे. वाजिद अली शहाने आपल्या बानीनामक पुस्तकात रहसचे ३६ प्रकार वर्णिले आहेत. हे सर्व कथ्थक नृत्यशैलीत बसविलेले असून, त्यांची नावेही काव्यपूर्ण आहेत. उदा., ‘मोर-छत्री’, ‘घुंघट’, ‘सलामी’, ‘मोरपंखी’, ‘मुजरा’, इत्यादी. त्यांसाठी वापरलेल्या वेषभूषा, दागदागिने, नेपथ्य आदींची तपशीलवार  वर्णने आहेत. लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेले हे भव्य व भपकेबाज रहस त्या काळात अत्यंत लोकप्रिय ठरले. ‘कैसरबाग रहस मंजिल’ येथे हे प्रयोग होत असत. हे पहिले हिंदुस्थानी नाट्यगृह म्हणता येईल. वाजिद अली शहाच्या आदेशावरून आगा हसन अमानत ह्याने इंदरसभा (१८५६) हे नाटक हिंदी-उर्दू भाषेत लिहिले. त्यात स्वतः वाजिद अलीने प्रमुख भूमिका केली होती व त्याच्या प्रयोग कैसरबागमध्ये झाला(१८५५-५६). परंपरेने हे उर्दू रंगभूमीवरचे पहिले नाटक मानले जाते. तथापि मसुद हसन रिझवी (१९००–७३) यांनी अलीकडे केलेल्या संशोधनावरून असे दाखवून दिले आहे, की वाजिद अली शहाने लिहिलेले व सादर केलेले राधा कन्हैय्या का किस्सा हे नाटक त्यापूर्वी  एक वर्ष आधी उर्दू रंगभूमीवर आले. ह्या अनुमानानुसार राधा कन्हैय्या का किस्सा हे उर्दू रंगभूमीवरचे पहिले नाटक व वाजिद अली शहा हा आद्य नाटककार-दिग्दर्शक ठरतो. रहस प्रकारातील नाटकांमध्ये राधा-कृष्णांच्या शृंगारक्रीडा संवाद व पद्यपंक्ती यांतून वर्णिल्या होत्या आणि त्यांना  संगीत-नृत्याची जोड दिली होती. वाजिद अली शहाच्या अफसानइष्क या नाटकात नेपथ्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ह्या नाटकातील एक दृश्य बागेत, तर दुसरे जंगलात घडते. त्यासाठी पडदे रंगविले जात. हे नाटक त्याच्या एका मस्नवीचे नाट्यरूपांतर होते. तसेच दरया–ए–तअश्शुक  हेही त्याच्या एका मस्नावीचे नाट्यरूपांतर होते. त्याच्या बहारे उल्फत या नाटकासाठी त्याने ४०–५० नृत्यगाननिपुण युवतींची निवड केली होती. संगीतातील रागांचे मोगलकालीन चित्रकारांनी रागमाला चित्रांमध्ये जे सांकेतिक चित्रण केले होते, त्यांचे नाट्यरूपांतर वाजिद अली शहाने रंगमंचावर सादर केले. ही त्याची कामगिरीही मोलाची आहे. वाजिद अली शहा धर्मिक वृत्तीचा, शिया पंथीय होता. त्याने १८६४ मध्ये सिबतेनबाद इमामबारा व शाही मशीद बांधली.  

वाजिद अली शहाची राजकीय कारकीर्द मात्र दुर्दैवी  व अपयशी ठरली. नाचगाण्यांच्या अतिरेकी  षौकापायी त्याने राज्य गमावले, असे म्हटले जाते. तो विलासी, भोगलोलुप व दुबळा होता आणि स्वतःच्या दरबारातील कट-कारस्थाने व ब्रिटिशांची सत्ताकांक्षा, वर्चस्व व दशहत ह्यांचा बळी ठरला. त्याच्या कारकीर्दीत भ्रष्ट मंत्री व दरबारी खुषमस्करे ह्यांचे स्तोम माजल्याने प्रशासनव्यवस्था पूर्ण कोलमडली होती. परिणामी ब्रिटिश सरकारने ७ फेब्रवारी १८५६ रोजी अवध ताब्यात घेतले. वाजिद अलीला लखनौ सोडून परांगदा व्हावे लागले व अखेर त्याने कलकत्ता येथे आश्रय घेतला. कलकत्त्याजवळ ‘मातीया बूर्ज’ (मातीचा बुरूज) येथील महालात त्याचे अनेक वर्षे वास्तव्य होते. तेथेही त्याने पूर्वीप्रमाणेच दरबार भरवून कलांना उदार आश्रय दिला व नृत्य-संगीत-नाटकांचे भपकेबाज सोहळे चालूच ठेवले. त्याला ह्या काळात ब्रिटिश शासनाकडून वार्षिक तनखा मिळत होता. कलकत्ता येथे त्याचे निधन झाले व मातीया बूर्जमधील सिबतेनबाद इमामबारा येथे त्याचे दफन करण्यात आले. 

इनामदार, श्री. दे.