हॉफमन, झुल्झ ए. : (२ ऑगस्ट, १९४१). फ्रेंच जीवशास्त्रज्ञ. २०११ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक हॉफमन, ब्रुस ए. ब्यूटलर आणि ⇨ मार्व्हिन राल्फ स्टाइनमन यांना विभागून मिळाले. उपजत प्रतिकारक्षमतेच्या सक्रियणासंबंधी शोध लावल्याबद्दल हॉफमन व ब्यूटलर यांना नोबेल पारितोषिकाची एकचतुर्थांश रक्कम मिळाली.
हॉफमन यांचा जन्म लक्सेंबर्ग( फ्रान्स) येथे झाला. त्यांनी स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठातून जीवविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये पदवी-पर्यंतचे शिक्षण घेतले. तेथूनच त्यांनी जीवविज्ञान विषयातील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९६९). त्यानंतर त्यांनी मारबर्ग येथील फिलिप्स विद्यापीठाच्या इ न्स्टि ट्यू ट फॉर फिजिऑलॉजिकल केमिस्ट्री येथे उच्च वैद्यकीय प्रशिक्षण घेतले (१९७३-७४).
हॉफमन हे द नॅशनल सेंटर ऑफ सायंटिफिक रिसर्च (Centre National de la Recherche Scientifique CNRS) या केंद्राच्या प्रशासक मंडळाचे सदस्य आणि संशोधन संचालक होते. ते CNRS केंद्रा-मधील ‘कीटकांमधील प्रतिरक्षित प्रतिसाद आणि विकास’ या प्रकल्पाचे संचालक (१९७८–२००५) आणि ‘रेणवीय आणि कोशिकीय जीव-विज्ञान संस्थे ङ्खचे संचालक (१९९४–२००५) होते. त्यांनी ब्रूनो लमेअत्र यांच्यासमवेत फळमाशीमधील उपजत टोळ रोगप्रतिकारक्षम जनुकांच्या कार्याचा शोध लावला. टोळसदृश ग्राही बुरशी आणि सूक्ष्मजंतू यांसारख्या इतर जीवांचे घटक ओळखून प्रतिरक्षित प्रतिसाद निर्माण करतात, असे हॉफमन यांनी दाखवून दिले तर स्तनी वर्गातील टोळसदृश ग्राहींचा शोध ब्यूटलर यांनी लावला. पामेला रोनाल्ड यांनी १९९५ मध्ये आणि टॉमस बोलर यांनी २००० मध्ये वनस्पतींतील टोळसदृश ग्राही शोधून काढल्या.
हॉफमन हे जर्मन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस लिओपोल्डिना, ॲकॅडेमिया यूरोपिया, यूरोपियन मॉलिक्यूलर बायॉलॉजी ऑर्गनायझेशन, युनायटेड स्टेट्स नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, द अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस आणि द रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे सदस्य होते. २००७ मध्ये त्यांची फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.
हॉफमन यांना कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचा विल्यम बी. कोली पुरस्कार (२००३), रॉबर्ट कॉख पारितोषिक (२००४), CNRS केंद्राचे सुवर्ण पदक, कीओ मेडिकल सायन्स पारितोषिक (२०१०) यांसारखे अनेक मानसन्मान मिळाले.
एरंडे, कांचन
“