हार्डिंग, लॉर्ड हेन्री : (३० मार्च १७८५–२४ सप्टेंबर १८५६). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक सेनापती, मुत्सद्दी आणि गव्हर्नर जनरल. त्याचा जन्म केन्ट परगण्यातील वर्देम येथे सुखवस्तू कुटुंबात झाला. जुजबी शालेय शिक्षण घेऊन तो १७९९ मध्ये ब्रिटिश आरमारात नेपोलियनबरोबरच्या युद्धांत सामील झाला. तिथे स्टाफ ऑफिसर म्हणून द्विकल्पीय युद्धात (१८०८–१४) उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुढे त्यास ब्रिगेडिअरची पदोन्नती देऊन ‘हंड्रेड डेज’ (१८१५) या प्रसिद्ध रणधुमाळीत प्रशियन सैन्याबरोबर लिग्नीच्या युद्धात पाठविण्यात आले. त्यात तो जखमी झाला आणि वॉटर्लूच्या लढाईपूर्वी दोनच दिवस अगोदर त्याचा डावा हात कापण्यात आला. लष्करातील सेवेनंतर तो हाउस ऑफ कॉमन्सवर निवडून आला. १८२०–४४ दरम्यान तो ब्रिटिश संसदेचा सदस्य होता. या दरम्यान त्याची दोनदा युद्धसचिव व आयर्लंडचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

 

पुढे लॉर्ड हेन्रीची हिंदुस्थानात गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने १८४४–४८ या चार वर्षांत सामाजिक हिताची काही महत्त्वाची कामे केली. सुशिक्षित स्थानिक तरुणांना त्याने शासकीय सेवेत सामावून घेतले आणि शिक्षणाला उत्तेजन दिले. तसेच सती व बालहत्या यांवर निर्बंध घातले आणि लोकांना या कृत्यांपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले. गंगेचा कालवा खोदण्याच्या कामास त्याच्याकाळात प्रारंभ झाला होता आणि रेल्वेच्या मार्गांचा आराखडाही (प्रारूप) करण्याचे काम प्राथमिक अवस्थेत होते. इंग्रज-शीख युद्धात त्याने नेतृत्व केले आणि लाहोरचा तह (मार्च १८४६) करून शिखांबरोबर मैत्रीचेसंबंध प्रस्थापित केले. त्याच्या शिखांबरोबरच्या युद्धातील यशस्वी कामगिरीचा गौरव त्याला सरदारकी देऊन करण्यात आला (मे १८४६).

 

इंग्लंडला परतल्यानंतर लॉर्ड हेन्रीची ब्रिटिश भूसेनेचा कमांडर इन चीफ (सरसेनापती) म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८५२). याकाळात क्रिमियाचे युद्ध (१८५३–५६) त्याच्या नेतृत्वाखाली झाले. त्यात ब्रिटिशांची नामुष्की झाली, तरीसुद्धा त्याला १८५५ मध्ये पदोन्नती देऊन फिल्ड मार्शल करण्यात आले मात्र त्यानंतर काही महिन्यांतच टनब्रिज वेल्सजवळ साउथ पार्क येथे अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले.

 

 देशपांडे, सु. र.