कॉरनेय झांफ्रांस्वा हायमान्सहायमान्स, कॉरनेय झांफ्रांस्वा : (२८ मार्च १८९२–१८ जुलै १९६८). बेल्जियन शरीरक्रियावैज्ञानिक. मानेतील ग्रीवा रोहिणी व हृदयाकडून येणारा महारोहिणी चाप यांच्याशी निगडित अशा संवेदी अवयवांच्या श्वसनावर होणारा नियंत्रक परिणाम शोधून काढल्या-बद्दल त्यांना १९३८ सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

 

हायमान्स यांचा जन्म गेंट (बेल्जियम) येथे झाला. त्यांनी १९२० मध्ये गेंट विद्यापीठाची एम्.डी. पदवी संपादन केली. नंतर त्यांनी पॅरिस, लोझॅन, व्हिएन्ना, लंडन आणि अमेरिका या ठिकाणी शरीरक्रि या विज्ञानाचे अध्ययन केले. १९३० मध्ये ते आपले वडील झांफ्रांस्वा हायमान्स यांच्या नंतर औषधिक्रियाविज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून गेंट विद्यापीठात रुजू झाले. तेथे त्यांनी वडिलांबरोबर रक्ताचे संघटन व रक्तदाब यांच्यात होणारे बदल कोणत्या प्रकारे हृदयात व श्वसन कार्यात फेरबदल घडवून आणतात, याबाबत संशोधन सुरू केले.

 

हायमान्स यांनी भूल दिलेल्या कुत्र्यांवर प्रयोग केले. संवेदी अवयवांचा दाबग्राही नावाचा एक गट अस्तित्वात असल्याचे त्यांनी या प्रयोगांद्वारे दाखविले. ग्रीवा कोटराच्या म्हणजे ग्रीवा रोहिणीच्या अल्प वाढीच्याभित्तीत म्हणजे जेथे ग्रीवा रोहिणी बाह्य व आंतर ग्रीवेत विभागली जाते त्या बिंदूपाशी हा गट असतो. हे दाबग्राही रक्तदाब नियंत्रित करताततसेच ते हृदयाच्या ठोक्यांची गती आणि श्वसनक्रिया यांच्यावरील नियंत्रणास मदत करतात. महारोहिणीच्या तळाशी व दाबग्राहींजवळ त्यांना रसायनग्राहींचा संच (ग्लोमेरा) आढळला. या रसायनग्राहींद्वारे रक्तातील ऑक्सिजनाचे प्रमाण नियंत्रित होते. तसेच मेंदूच्या तळाशी असलेल्या मज्जा (मेड्यूला) या श्वसन केंद्रामार्फत श्वसनाच्या नियंत्रणास रसायनग्राहींची मदत होते. शिवाय ऑक्सिजनाचे प्रमाण कमी झाले अथवा कार्बन डाय–ऑक्साइडाचे प्रमाण वाढले, तर रक्तदाब व श्वसनक्रिया यांवर परिणाम होतो, असे त्यांनी सिद्ध केले.

 

हायमान्स यांचे निधन नॉक्के (बेल्जियम) येथे झाले.

 

वाघ, नितिन भरत