मार्टिन हायडेगरहायडेगर, मार्टिन : (२६ सप्टेंबर १८८९–२६ मे १९७६). जर्मन तत्त्वज्ञ. मेसकिर्ख, श्‍वार्ट्सव्हाल्ट, जर्मनी येथे एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्मला. त्याचे वडील चर्चच्या इमारतीची देखभाल करणे चर्चमध्ये मृतांना पुरण्यासाठी राखून ठेवलेल्या जागेत कबरींसाठी खड्डे खणणे, योग्य वेळी चर्चमधील घंटा वाजविणे, अशी कामे करीत. हायडेगरला धर्मोपदेशक व्हायचेहो ते. ईश्वरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी फ्रायबर्ग विद्यापीठात त्याने अभ्यासही सुरू केला होता (१९०९) तथापि १९११ मध्ये तो तत्त्वज्ञान आणि गणित ह्या विषयांकडे वळला. तत्त्वज्ञानात त्याला १९०७ पासूनच स्वारस्य निर्माण झाले होते. फ्रँझ ब्रेन्टानो (१८३८–१९१७) ह्या जर्मन तत्त्वज्ञाचा ‘ऑन द मेनी फोल्ड मीनिंग ऑफ बीइंग ॲकॉर्डिंग टू ॲरिस्टॉटल’ (१८६२, इं. शी.) हा ग्रंथ तो वाचीत होता. प्लेटो, ⇨ ॲरिस्टॉटल अशा ग्रीक तत्त्वज्ञांबरोबरच एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक तत्त्वज्ञांचा त्याच्यावर प्रभाव होता. यांशिवाय एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या आरंभकाळातल्या अनेक तत्त्वज्ञांचा त्याने अभ्यास केला होता. आरंभीचे अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सरेन किर्केगॉर, ⇨ फ्रीड्रिख नीत्शे, ⇨ व्हिल्हेल्म डिल्टाय आणि रूप-विवेचनवादाचा संस्थापक एडमंड हुसर्ल ह्यांचा त्यांत समावेश होतो.

 

हायडेगरने फ्रायबर्ग विद्यापीठात १९१५ पासून अध्यापन सुरू केले. त्याचा पूर्वीचा गुरू आणि आता सहकारी एडमंड हुसर्ल ह्याच्या रूपविवेचनवादी तत्त्वज्ञानाची चळवळ हायडेगर पुढे नेईल, अशी अपेक्षा होती तथापि त्याने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र मार्ग अवलंबिला. १९२७ मध्ये मार्बर्ग विद्यापीठात अध्यापन करीत असताना त्याचा बीइंग अँड टाइम हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि जर्मनीमधील तत्त्वज्ञानाच्या जगाला त्याने चकित करून टाकले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून तो मान्यता पावला.

 

 अस्तित्ववाद्यांच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून हायडेगर ओळखला जातो. हायडेगरच्या तत्त्वज्ञानाचा उगम सरेन किर्केगॉरच्या विचारांमध्ये, तसेच ब्रेन्टानो आणि हुसर्ल ह्यांच्या रूपविवेचनवादातही सापडतो. जाणिवेचा कोणताही प्रकार सविषय असतो, मग तिच्या विषयाला जगात अस्तित्व असो वा नसो, हे रूपविवेचनवादाचे मध्यवर्ती सूत्र आहे. उदा., मलाज्या कशाची भीती वाटत असेल, ते खरोखरी पाहता अस्तित्वातही नसेल पण माझी भीती ही त्याची भीती असते माझ्या भीतीचा तो विषयअसतो. आता, जाणीव जर ह्याप्रमाणे आंतरिकतः सविषय असेल, तर तिच्या बाहेर अस्तित्वात असलेल्या जगाचे ज्ञान कसे होते ? हा प्रश्न उपस्थित होतो. ह्याचे कारण जाणीव आणि तिला बाह्य असे जग ह्यांच्यात द्वैत आहे, असे हुसर्लने गृहीत धरलेले आहे. हायडेगरने हे गृहीतकृत्यच नाकारलेले आहे कारण माझ्या जाणिवेला बाह्य जगाचे ज्ञान कसे होते ? हा प्रश्न विचारणाऱ्याला बाह्य जगाचे ज्ञान असणारच. त्याशिवाय तो हाप्रश्न विचारूच शकणार नाही. तेव्हा आपल्या जाणिवेच्या अस्तित्वाचे प्राथमिक स्वरूप म्हणजे जगातले अस्तित्व, तेथे असलेले अस्तित्व, स्थित अस्तित्व (डाझाइन ). जगातल्या वस्तूंपर्यंत पोहोचण्याची, त्यांचे ग्रहण करण्याची धडपड हे या अस्तित्वाचे सार असते. ह्यातून आपण आपल्या संकल्पना निर्माण करतो. स्थित अस्तित्वानंतर आपल्याला उपयुक्त अशा वस्तू , ज्यांचा वापर आपण अवजारे वा हत्यारे म्हणून करू शकतो, अशा वस्तूंच्या अस्तित्वाची कल्पना आपण करतो आणि अखेरीस आपल्याला प्रतिकार, अडथळा करणाऱ्या अस्तित्वाची आपण कल्पना करतो. अशा रीतीने वेगवेगळ्या पदार्थप्रकारांच्या कल्पना करून समग्र विश्वातील पदार्थप्रकारांची व्यवस्था आपण लावतो.

 

 आता, आपल्या अस्तित्वाला व्यापणारा, त्याला त्याचे स्वरूप देणारा एक विशेष म्हणजे ते मृत्यूने संपुष्टात येते. आपले अस्तित्व क्षणा-क्षणात विखुरलेले असते, हा त्या अस्तित्वाचा आणखी एक विशेष पण आपल्यापुढे भविष्यकाळ असतो. तो अनावृत असतो. आपल्या अस्तित्वाला रूप देऊ शकतो. आपण असे रूप दिले नाही, तर आपले अस्तित्व केवळ शून्य आहे ही जाणीव म्हणजेच विभीषणा. ह्या विभीषणेपासून पळ काढणे म्हणजे आपले खरेखुरे ‘मी ङ्खपण सोडून देणे,’ मी ङ्खला व्यक्तिमत्त्वशून्य करणे. ‘मी ङ्खच्या ऐवजी ‘आपण’ म्हणून जगणे. विभीषणेला खरेखुरे तोंड द्यायचे असेल, तर आपल्या समग्र अस्तित्वाची जाणीव धरायला पाहिजे म्हणजेच ते मृत्यूने सीमित झालेले आहे, हीजाणीव बाळगून जगायचे. ह्या जाणिवेत सदसद्बुद्धी म्हणजे मी काय व्हावे ह्याची जाणीव आणि अपराधित्वाची भावना म्हणजे मी अन्य काय होऊ शकलो असतो ह्याची जाणीव ह्यांना स्थान असतेच. आपण म्हणून व्याज रीतीने क्षणोक्षणी जगत राहायचे, की खराखुरा ‘मी’ म्हणून अव्याज, प्रामाणिक ‘मी’ म्हणून जगावे, ह्यांतून मला निवड करावी लागते. ह्या प्रामाणिक, अव्याज जीवनाचा आशय काय ? ह्या प्रश्नाला मात्र हायडेगरने उत्तर दिलेले नाही.

 

 हायडेगरच्या आयुष्यातील एक विशेष गोष्ट म्हणजे तो नाझीवादा चा पुरस्कर्ता होता. १९३३ च्या जानेवारीत ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा चान्सलर झाल्यानंतर जर्मन विद्यापीठांवर ज्यू विद्वानांची हकालपट्टी करण्यासाठी व त्यांनी मांडलेल्या सिद्धान्ताकडेही – उदा., आइनस्टाइनचा सापेक्षता सिद्धान्त – ‘ज्यू सिद्धान्त’ म्हणून अव्हेरभावनेने पाहण्यासाठी वाढता दबाव येऊ लागला. अशा धोरणांचा निषेध म्हणून फ्रायबर्ग विद्यापीठाच्या प्रमुखाने (रेक्टर) राजीनामा दिल्यानंतर हायडेगरला त्याच्या जागी निवडण्यात आले (एप्रिल १९३३) आणि हायडेगरनेही ते पद स्वीकारले. हायडेगर नाझी पक्षाचा सदस्यही झाला. फ्रायबर्ग विद्यापीठात नाझींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना त्याने सतत वाव दिला.

 

नाझी पक्षाला आणि हिटलरला त्याने आपली निष्ठा बहाल केली होती आणि त्या पक्षाच्या कार्याला त्याने जोमदारपणे वाहून घेतले होते. हायडेगरने आपली विद्वत्ता आणि तिच्यामुळे प्राप्त झालेली प्रतिष्ठा नाझींना पाठबळ देण्यासाठी उपयोगात आणली म्हणून त्याला विद्यापीठांतून नाझीवाद नाहीसा करणाऱ्या आयोगाने दोषी ठरविले (१९४५). पुढे काही वर्षांनी त्याच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी त्याला त्याचा नाझी भूतकाळ जाहीरपणे नाकारण्याचा आग्रह केला असता, त्याने तसे करण्याला नकार दिला. १९८० च्या दशकात हायडेगरच्या तत्त्वज्ञानातच फॅसिस्ट वृत्तीला अनुकूल असे काही होते की काय, ह्या विषयावर त्याच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांत वादही झाला होता.

 

 पश्चिम जर्मनीतील मेसकिर्ख येथे तो निधन पावला.

 

 संदर्भ : 1. Greue, M. Heidegger, New York, 1952.

            2. Kaufmann, W. From Shakespeare to Existentialism, Boston, 1959.

           3. Langan, T. The Meaning of Heidegger, New York, 1959.

           4. Vycinas, V. Earth and Gods, The Hague, 1961.

            5. Wyschogrod, M. Kierkegaard and Heidegger, New York, 1954. 

रेगे, मे. पुं. कुलकर्णी, अ. र.