आजीवक :  भारतातील एक प्राचीन धर्मपंथ. ‘आजीविक’ असेही त्याचे नाव आढळते. हा पंथ आज अस्तित्वात नाही. तो नामशेष होण्यापूर्वी त्याला सु. २,००० वर्षांचा इतिहास आहे. मंखलीपुत्र गोशालापूर्वी ११७ वर्षे आधी या पंथाची स्थापना झालेली होती आणि गोशाल व महावीर वर्धमान हे एकत्र राहत होते, असा जैन साहित्यात उल्लेख आहे. गोशालापूर्वी नंदबच्छ व त्यानंतर किससंकिच्छ हे या पंथाचे आचार्य होते, असे मानले जाते. काहींच्या मते गोशालच ह्या पंथाचा प्रवर्तक होता. पंथाचे अधिकृत साहित्य उपलब्ध नाही. आजीवकांबाबतची विखुरलेल्या स्वरूपातील काही वचने बौद्ध व जैन साहित्यांत आलेली आहेत. आजीवक पंथाची मते बौद्ध व जैन मतांशी विरोधी होती. भगवतीसूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैनांच्या पाचव्या अंगग्रंथात गोशालाची चरित्रपर माहिती व तत्त्वज्ञान आलेले आहे.

‘आजीवक’ शब्दाचा नेमका अर्थ काय, हे पंथाचे अधिकृत साहित्य उपलब्ध नसल्याने सांगता येत नाही. निर्बंधांची उपेक्षा करून, तसेच नियतीवर भरवसा ठेवून स्वाभाविक प्रवृत्तीने जगावे, असे तत्त्व स्वीकारणारा संप्रदाय, असा ‘आजीव’ म्हणजे मुक्त जीवन याचा अर्थ असावा.

मंखलीपुत्र गोशाल हा आजीवक पंथाचा प्रवर्तक आहे की नाही, हा मुद्दा विवाद्य आहे तथापि पंथात त्याचे स्थान आणि कर्तृत्व फार मोठे आहे एवढे निश्चित. मंखली हे त्याच्या पित्याचे नाव (मंखली हा दरिद्री भिक्षेकरी होता) गोशालाचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला म्हणून ‘गोशाल’ अशा तऱ्हेने ‘मंखलीपुत्र गोशाल’ म्हणून तो ओळखला जाऊ लागला. महावीराचा तो सहा वर्षे अनुयायी होता. परंतु दोघांच्या स्वभावांत महदंतर असल्याने लवकरच त्यांच्यात वितुष्ट आले. नंतर वेगळे होऊन गोशालाने महावीराचा प्रतिस्पर्धी म्हणून आजीवक पंथाचे नेतृत्व केले. यानंतर मध्यंतरीच्या काळात त्याचे श्रावस्ती नगरीतील कुंभारणीशी अनैतिक संबंध आले. तसेच तो व्यसनाधीनही झाला. पुढे त्याला उपरती झाली. इ.स.पू. ५०० च्या सुमारास तो मरण पावला.

सम्राट अशोक आणि त्याचा नातू दशरथ यांचा आजीवकांना आश्रय लाभला होता, हे त्यांनी आजीवकांसाठी बांधून दिलेल्या विहारांवरून स्पष्ट होते. पतंजलीनेही (सु. १५० इ.स.पू.) आजीवकांचा उल्लेख केलेला आहे. तसेच मिलिंदपञ्हमध्येही (सु. १ ले शतक) त्यांचा उल्‍लेख आढळतो. सहाव्या शतकात वरामिहिराने आणि सातव्या शतकात बाणाने हर्षचरितात त्याचा उल्लेख केलेला आढळतो. म्हैसूरच्या पूर्वेकडील भागात व त्याला लागून असलेल्या तमिळनाडूच्या काही भागांत हा पंथ चौदाव्या शतकापर्यंत कसाबसा टिकून होता चौदाव्या शतकात मात्र तो नामशेष झाला. प्रश्नव्याकरण ह्या जैनांच्य़ा दहाव्या अंगग्रंथात ‘सत्यवादीमत’ ह्या शीर्षकाखाली चौदा विविध मतांची यादी दिलेली आहे. त्यात आजीवकांचा उल्लेख ‘नियतिवादी’ म्हणून केलेला आहे. स्थानांगात आजीवकांच्या उग्र तपश्चरणाचा उल्लेख आहे. गोशाल हा आठ महानिमित्त विद्यांमध्ये प्रवीण होता, असे भगवतीसूत्रात म्हटले आहे. आवश्यकचूर्णीत म्हटले आहे, की आजीवक हे अवंद्य होत. बृहद्जातकावरील भाष्यात उत्पलाचार्याने आजीवकांचा समावेश ‘नारायणाश्रित’ म्हणजे नारायणाचे भक्त यांत केलेला आहे. नंतरच्या काळात आजीवकांनी स्वतःस वासुदेव पंथात (वैष्णव पंथात) सामावून घेतले असावे. डॉ. बी. एम्. बरुआ यांच्या मते सध्याचा नाथसंप्रदाय म्हणजेच पूर्वीचा आजीवक पंथ होय. परंतु हे म्हणणे डॉ. शशिभूषण दासगुप्ता यांनी खोडून काढले आहे. बौद्धकालीन ‘मस्करी’ संप्रदाय आणि आजीवक पंथ यांतील साम्यांवरून ते एकच होत, असेही मत काही विद्वानांकडून प्रतिपादिले जाते.

एके काळी अवंतीपासून (माळवा) तो अंग देशापर्यंत (बिहार व बंगाल) या पंथाचा प्रसार झालेला होता. गोशालाचा व त्याच्या पंथाचा बौद्ध व जैन धर्मीयांनी निषेध केला असला, तरी त्या पंथाचे काही आचार आणि तत्त्वे त्यांनी हळूहळू आत्मसात केलेली आढळतात इतकेच नव्हे, तर एक प्रबळ प्रतिस्पर्धी पंथ म्हणून आजीवकांची त्यांना दखलही घेणे भाग पडले.

आजीवकांची विचारसरणी ‘नियतिवादी’ आहे. त्यांच्या मते काहीही कृती न करता वस्तू परिणतावस्थेप्रत पोहोचतात. सातत्याने चालू असलेल्या जन्ममरणाच्या फेऱ्यातूनच नैसर्गिक आणि आध्यात्मिक विकासक्रम चाललेला असतो. त्यांचे हे मत कर्मप्रधान (क्रियावादी) विचारसरणीच्या अगदी उलट आहे कारण त्यात मानवी प्रयत्‍नास काहीही अर्थ नाही, असा विचार आहे. क्रियावादी मतात नैतिक आचरण हे व्यक्तीच्या व समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक मानले जाते. आजीवक आत्मवादी होते, तसेच पुनर्जन्म व मोक्ष यांवर त्यांचा विश्वास होता. ‘नियतिवाद’ हा त्यांचा प्रमुख सिद्धांत होय. जगात मानवी प्रयत्‍नाने काहीही घडत नाही. जे जे घडते, ते ते नियतीनुसारच घडून येते. जीवाला भोगाव्या लागणाऱ्या सुखदु:खास काही कारण असत नाही आणि ते मनुष्यास टाळताही येत नाही, असे उल्लेख उवासगदसाओ, दीघनिकाय इ. ग्रंथांत आलेले आहेत. प्रा. ए. एल्. बाशम यांच्या मते हा पंथ जैन व बौद्ध मतांप्रमाणे निरीश्वरवादी होता. दक्षिण भारतातील आजीवक पंथाचे बौद्ध धर्मातील महायान विचारसरणीशी बरेच साम्य आहे, असेही प्रा. बाशम यांचे मत आहे.

सर्व प्राण्यांची वर्गवारी एकेंद्रिय ते पंचेंद्रिय अशा पाच वर्गांत करण्यात आणि सर्व मानवांची सहा अभिजातांमध्ये करण्यात महावीर आणि गोशाल यांच्यात एकमत होते. परंतु महावीराने मानलेल्या आत्म्याच्या बद्ध व मुक्त ह्या दोन भेदांशिवाय आणखी एक तिसराही भेद– ना बद्ध न मुक्त– गोशाल मानीत होते. पुनर्जन्मकल्पनेशी ‘चैतन्य-संक्रमणा’च्या नवीन तत्त्वाची सांगड गोशालाने घातली. गोशालाच्या चरित्रास अनुसरून त्याच्या शिष्यांनी ‘अष्टचरमवाद’ नावाचा सिद्धांत पुरस्कारून त्याचा प्रचार केला. महावीर आणि गोशाल यांच्यातील मतभेद प्रामुख्याने तात्त्विक स्वरूपाचे नसून आचारविषयक होते. न शिजविलेले अन्न खाणे, स्त्रीसंग करणे, शीतलजल प्राशन करणे व मुद्दाम तयार केलेल्या वस्तूंचा परिग्रह करणे ह्या चार गोष्टींबाबत महावीराने घातलेले निर्बंध गोशालास मान्य नव्हते. परस्त्रीगमन केल्याने मुनीस कसलेही पाप लागत नाही, असे गोशालाचे मत असल्याचे महावीराने नमूद केलेले आहे. गोशालाच्या स्वैर वर्तनामुळे महावीरास ब्रह्मचर्यासारख्या कठोर व्रताची जैनधर्मात योजना करावी लागली असावी. पंथीयांनी जरुरीपुरते कटिबंधनवस्त्र वापरावे असे महावीराचे मत होते तर गोशाल हा संपूर्ण नग्नतेचा पुरस्कर्ता होता. तसेच भिक्षापात्रात भिक्षा मागावी असे महावीराचे मत होते, तर ती हातांच्या ओंजळीत घ्यावी असे गोशालांचे मत होते. या कारणास्तव लवकरच महावीराचे व गोशालाचे वितुष्ट आले आणि तो महावीराचा प्रतिस्पर्धी बनला. पुढे हा पंथ दिगंबर जैन पंथात विलीन झाला असावा, असे काही विद्वान मानतात.

संदर्भ 1. Barua, B.M. Ajivakas, Calcutta, 1920.

           2. Basham, A. L. History and Doctrines  of the Ajivivakas, London, 1951.

 

 सुर्व, भा. ग.