हानयांग : चीनच्या हूपे प्रांतातील वूहान नगरसमूहातील एक प्राचीन व ऐतिहासिक शहर. तसेच परिसरातील एक औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ७१,०५३ (२०१२). ते यांगत्सी व हान या नद्यांच्या संगमावर हान नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे.

 

इ. स. ५८१–६१८ या काळात सू राजवटीत हानयांगची स्थापना झाली. हानयांग शहरावर अनेक राजघराण्यांची सत्ता होती. प्रत्येक राजवटीत यास वेगवेगळी नावे दिली गेली. शेवटी युआन (मंगोल) राजवटीत हानयांग हे नाव देण्यात आले आणि त्याकाळातच या शहरास राजवटीच्या मुख्यालयाचा दर्जा देण्यात आला. १९५० पासून हानयांग, हान्को आणि वूचांग या तीन नगरांच्या समूहाला मिळून ‘वूहान’ या नावाने ओळखले जाते. तरीसुद्धा यातील प्रत्येक शहरास स्वायत्तता आहे. हानयांग हे रस्त्याने व रेल्वेमार्गाने हान्कोशी व वूचांगशी जोडलेले आहे.

 

ताइपिंग बंडखोरांनी १८५० मध्ये या शहराचे मोठे नुकसान केले होते परंतु लवकरच त्याची उभारणी करण्यात आली. १९२९ मध्ये हानयांगचा पूर्वेकडील भाग हान्को शहरास जोडला होता. दोन वर्षांनी हूपे प्रांताच्या शासन निर्णयानुसार तो भाग हानयांगला परत मिळाला. १८९१ ते १९३८ पर्यंत हानयांग हे लोह व पोलाद, युद्धसाहित्य, बंदुकीची दारू, धातु व धातुके इत्यादींच्या निर्मिती उद्योगांनी गजबजलेले होते. १९३८ नंतरजपानने यावर ताबा मिळविल्यानंतर येथील युद्धसाहित्यनिर्मितीचाकारखाना सेचवानला स्थलांतरित करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर येथील लोह व पोलाद कारखान्यांचे मोठ्या सूतगिरण्यांमध्ये रूपांतर करण्यात आले.

 

हानयांगमध्ये अरुंद रस्ते असून कारखाना क्षेत्राशिवाय शहरात कामगार राहत असलेली गलिच्छ वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. यांगत्सी नदीच्या टोकावर असलेल्या ‘दाबीशान’ टेकडीला स्थानिक लोक ‘ टॉरटॉईझ हिल’ म्हणतात. या टेकडीवर मंदिरे व बौद्ध भिक्षूची पवित्र चैत्यभूमी आहे. याशिवाय हार्प ग्राऊंडच्या खाली असलेले ‘मून लेक’ हे उन्हाळ्यातील कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध असून येथील ‘पॉमग्रॅनेट फ्लॉवर पॅगोडा’ प्रेक्षणीय आहे.

 

पहा : वूहान.

कुंभारगावकर, य. रा.