हाडमोड : (हिं. बांदा इं. मिसलटो लॅ. व्हिस्कम आल्बम कुल-लोरँथेसी ). या लहान अर्धजीवोपजीवी वनस्पतीचा प्रसार ग्रेट ब्रिटन ते उत्तर आशिया आणि यूरेशियात सर्वत्र आहे. ती हिमालयात ( काश्मीर ते नेपाळ) सस.पासून ९३०–२,१७० मी. उंचीपर्यंत आढळते. ती सामान्यतः सफरचंदाच्या वृक्षावर व क्वचितच ओक वृक्षावर वाढते. पॉप्लर, विलो, मॅपल इत्यादींवरही ती चांगलीच फोफावते. व्हिस्कम प्रजातीत एकूण ८० जाती असून त्यातील १४ जाती भारतात आढळतात.
हाडमोड झुडपाचे खोड साधारणपणे काष्ठमय, हिरवे, १५–७५ सेंमी. लांब व द्विशाखाक्रमी असते. पाने अंडाकृती, भाल्यासारखी, समोरासमोर, ५–७ सेंमी. लांब, देठरहीत, चिवट, पिवळसर हिरवट व अखंड असतात. फुले ३–५, टोकाकडील पानांच्या बगलेत झुबक्याने फेब्रुवारी ? एप्रिलमध्ये येतात. ही एकलिंगी (विभक्तलिंगी) वनस्पती असून पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे वेगवेगळ्या झुडपांवर येतात. पुं-पुष्पे स्त्री–पुष्पापेक्षा आकाराने दुप्पट मोठी असून त्यात संदल नसतो परंतु स्त्री–पुष्पात तो लहान असून त्याचे चार खंड स्पष्ट दिसतात. मृदुफळे मादी झुडपावर येतात. ती चिकट, १ सेंमी. व्यासाची व हिरवट पांढरी असून त्यावर उभ्या रेषा असतात. त्यात एक पांढरी सुरकुतलेली अर्धगोल बी असते. बीजाभोवती चिकट पदार्थ असतो. त्यामुळे बीजे पक्ष्यांच्या चोचींना चिकटतात व त्यांचा इतर आश्रयी वनस्पतींवर प्रसार होतो. वारा, पक्षी किंवा कीटक यांच्या साहाय्याने त्याचे परागण होते. ही जीवोपजीवी वनस्पती आश्रयी वनस्पतींतून अन्नघटक व पाणी शोषून घेते. तिचा नैसर्गिक मृत्यू आश्रयी वनस्पतीवर अवलंबून असतो. आश्रयी वनस्पती मेल्यावरच तिचा मृत्यू होतो. संपूर्ण जीवोपजीवी वनस्पती आश्रयी वनस्पतीपासून काढून टाकणे, हा एकमेव प्रतिबंधक उपाय आहे.
हाडमोड वनस्पतीमध्ये विषारी प्रथिनांचे मिश्रण असून त्यांमध्ये विस्कोटॉक्सिने व लॅक्टिने हे घटक असतात. फळांपेक्षा पाने व खोडांमध्ये विषारी घटक अधिक असतात. ती ज्या आश्रयी वनस्पतीवर वाढतेत्यावर विषाक्तता अवलंबून असते. तसेच या वनस्पतीमध्ये ॲसिटिल कोलीन व प्रोपिऑनिल कोलीन ही दोन क्रियाशील द्रव्येही असतात. हिची फळे, पाने व कोवळ्या फांद्या उपयुक्त आहेत. हिच्या पानांची भुकटी करतात. तसेच होमिओपॅथीमध्ये पाने व पक्व मृदुफळे सारख्या प्रमाणात घेऊन टिंक्चर (अल्कोहॉली अर्क) तयार करतात. फळ सारक, पौष्टिक, कामोत्तेजक, मूत्रल व हृदयास शक्तिवर्धक असते. प्लीहा वाढणे, जखमा, गुल्म, कानांचे विकार इत्यादींवर ही वनस्पती देतात. तसेच ती आकडी, अपस्मार व कर्करोग यांवर उपयुक्त आहे. जेव्हा चाऱ्याची कमतरताअसते तेव्हा पाने व खोडाचा वापर बकऱ्यांसाठी खाद्य म्हणून केला जातो.
पहा : जीवोपजीवन लोरँथेसी.
जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.
हाडमोड |
“