हाझारिका, अतुलचंद्र : (९ सप्टेंबर १९०३– ?१९८६). आसाममधील विख्यात कवी, नाटककार, समीक्षक व लेखक. ‘चित्रदास’ या टोपणनावानेही त्यांनी काही लेखन केले. त्यांचा जन्म कानपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आरंभीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून असमिया भाषा हा विषय घेऊन एम्.ए. बी.एल्. आणि बी.टी. ह्या पदव्या संपादन केल्या. सुरुवातीस त्यांनी अध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर गौहाती येथील कॉटन महा-विद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते. तेथूनच असमिया भाषा विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले (१९६०). गौहाती विद्यापीठाच्या शिक्षण विभागा-मध्येही त्यांनी १९६८ पर्यंत अध्यापन केले.
अतुलचंद्र यांनी निरनिराळ्या साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यामध्ये काव्य, नाटक, जागतिक साहित्यातील काही प्रसिद्ध कथा व नाटके यांचे अनुवाद इत्यादींचा समावेश आहे तथापि त्यांची कीर्तीमुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांच्या नाट्यलेखनावर. त्यांच्या नाटकांचेतीन प्रकार आहेत : (१) पौराणिक कथा-आख्यानावर रचलेली, (२) ऐतिहासिक घटनांवर आधारलेली व (३) विविध विषयांवर लिहिलेली. बेउला (१९३३), नंद-दुलाल (१९३५), कुरुक्षेत्र (१९३६), श्रीरामचंद्र (१९३७), नरकासुर (१९३९), शकुंतला (१९४०) ही त्यांची काही पौराणिक नाटके. शकुंतला व बेउला ही नाटके वगळता बाकीची सर्व नाटके रामायण-महाभारत ही महाकाव्ये किंवा भागवत यांतील कथांवर आधारलेली आहेत. त्यांचे माध्यम निर्यमक कविता आहे. रुक्मिणीहरण या नाटकामधील वेदनिधीनामक विदूषकाचे घर हे कोणत्याही प्रकारची थट्टा किंवा द्वेष न बाळगता केलेले वास्तव चित्रण होय. त्यांच्या ऐतिहासिक नाटकांमध्ये कनोज-कुंवारी (१९३०), बनीज कोवार (१९४५) व छत्रपती शिवाजी यांचा समावेश होतो. मर्जियाना (१९३९), मानसप्रतिमा (१९४८), आहुती (१९५२), रंगमहाल ही त्यांनी विविध विषयांवर लिहिलेली नाटके. त्यांनी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस या नाट्य-कृतीचे बनीज-कोवार व किंग लिअर या नाट्यकृतीचे अश्रुतीर्थ (१९५२) या नावाने केलेले असमिया अनुवाद लोकप्रिय ठरले. त्यांच्या अनेक नाटकांचे असमिया रंगभूमीवर प्रयोग झाले. त्यांनी आपल्या नाटकांमध्ये निर्यमक कविता व गीते यांचा वापर केला. विशेषतः असमिया रंगभूमीच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी नाट्यलेखन केले. त्यामुळे असमिया रंगभूमीवरील बंगाली नाटकांचे वर्चस्व नष्ट करण्यास त्यांची नाटके कारणी-भूत ठरली. त्यांच्या नाट्यलेखनाने अनेक लेखकांना असमिया रंगभूमीसाठी लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. दिपाली (१९३८), कौमुदी (१९३९), मणिमाला (सुनीते, १९४१), तपोवन (१९५५), रण-झंकार (१९६२), जयतु-जननी (गीते, १९६३), झंकार (गीते, १९६४), रंगधाली( प्रहसनात्मक कविता, १९७१), मणिकुट (१९७३), अपराजिता (१९७४), आयकेतन (१९७६), गागनेर सूर (१९७८) हे त्यांचे काही उत्कृष्ट काव्यसंग्रह. यांमध्ये त्यांची भावकविता व गीते यांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. याशिवाय त्यांनी लहान मुलांसाठी ऐतिहासिक-पौराणिक घटनांवर आधारित केलेल्या कथालेखनात कथाकीर्तन (१९४५), कथादेसम् (भाग-१,१९४६ भाग-२, १९५१), काव्यकथा (१९५३), अँडरसेनेर साधु (१९६१), आयतार साधु (१९६८) यांचा समावेश होतो. रुनुक-गुणुक (१९५३), फेहुजली (१९७४), रुरजुनार झिलमिल (१९८०) हे त्यांनी मुलांसाठी लिहिलेले काही प्रसिद्ध काव्यसंग्रह.
अतुलचंद्र हे आसाम छात्र संमेलनाच्या मीलन या दर्जेदार वाङ्मयीन मासिकाचे साक्षेपी संपादक होते. ⇨ लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ⇨ ज्योति-प्रसाद आगरवाला या प्रतिभासंपन्न असमिया साहित्यिकांचे साहित्य या मासिकातून प्रसिद्ध होत असे. मानछलेखा (१९६७) या ग्रंथात अतुलचंद्र यांनी १४६८–१९६९ मधील असमिया नाटक व रंगभूमीयांचा ऐतिहासिक मागोवा घेतला आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादेमीचे पारितोषिक प्राप्त झाले (१९६९). स्म्रितिर पापेरी (१९७७), स्म्रितिलेखा (१९८०) या त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारलेल्या संस्मरणिकांचे वाङ्मयीन मूल्य असाधारण आहे.
अतुलचंद्र यांना अनेक मानसन्मान लाभले. आसाम साहित्य सभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९५९). भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केला (१९७१). आसाम साहित्य सभेने ‘ साहित्याचार्य’ ही उपाधी त्यांना बहाल केली (१९८२).
पोळ, मनीषा
“