हाउप्टमान, हर्बर्ट एअरन :(१४ फेब्रुवारी १९१७– २३ ऑक्टोबर २०११). अमेरिकन गणितज्ञ व स्फटिकशास्त्रज्ञ. त्यांनी रासायनिक संयुगांच्या स्फटिकांमधून जाणाऱ्या क्ष-किरणांच्या विवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या आकृतिबंधांवरून रेणवीय संरचनांचे अनुमान काढण्या-करिता गणितीय पद्धती शोधून काढल्या व त्यांचा विकास केला. या संशोधन कार्याबद्दल त्यांना जेरोम कार्ले यांच्यासमवेत १९८५ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

 

हाउप्टमान यांचा जन्म ब्राँक्स (न्यूयॉर्क सिटी, अ.सं.सं.) येथे झाला. त्यांनी सिटी कॉलेज ऑॅफ न्यूयॉर्क येथून गणितातील बी.एस्. पदवी (१९३७) आणि कोलंबिया विद्यापीठामधून एम्.ए. पदवी (१९३९) मिळविली. तसेच त्यांनी मेरिलँड विद्यापीठातून पीएच्. डी. पदवी संपादन केली (१९५५). नौदलामध्ये असताना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी दक्षिण पॅसिफिक समुद्रातील हवामानाचे अंदाज वर्तविण्याचे काम केले. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी नेव्हल रिसर्च लॅबोरेटरी (वॉशिंग्टन, डी. सी.) येथे कार्ले यांच्यासमवेत स्फटिक संरचनेसंबंधी संशोधन केले. ते बफेलो (बफालो) येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे जीवभौतिकी विषयाचे प्राध्यापक होते (१९७०). ते मेडिकल फाउंडेशन ऑफ बफेलो (१९९४ पासून हाउप्टमान-वुड्वर्ड इन्स्टिट्यूट) या खाजगी संशोधन संस्थेत उपाध्यक्ष व संचालक होते (१९७२–८९).

 

हाउप्टमान व कार्ले यांनी तयार केलेल्या गणितीय समीकरणांनी स्फटिकांमधून जाणाऱ्या क्ष-किरणांच्या विवर्तनामुळे छायाचित्रण पटलात निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या ठिपक्यांच्या मांडणीचे स्पष्टीकरणदेता येते. या समीकरणांमुळे स्फटिक रेणूतील अणूंचे स्थान ठिपक्यांच्या तीव्रतेचे विश्लेषण करून अचूकपणे ठरविता येते. १९४९ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची ही पद्धत पुढील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिली, परंतु नंतर स्फटिकतज्ञांनी हळूहळू त्यांच्या गणितीय पद्धतींचा वापर हजारो सूक्ष्म जैव-रेणूंच्या त्रिमितीय संरचना ठरविण्यासाठी केला. यांमध्ये अनेक हॉर्मोने, जीवनसत्त्वे व प्रतिजैविके यांसारख्या रेणूंचाही समावेश होतो. १९८० च्या दशकाच्या मध्याला त्यांनी मोठ्या रेणूंच्या संरचनांचे पृथक्करण करण्यावर लक्ष केंद्रित केले.

 

हाउप्टमान व कार्ले यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याआधी साध्या जैवरेणूंच्या संरचनांचे अनुमान करण्याकरिता जवळजवळ दोन वर्षे लागत असत. परंतु, १९८० च्या दशकात प्रगत संगणकाच्या वापरामुळे गुंतागुंतीचे हिशोबसुद्धा दोन दिवसांत करता येऊ लागले.

 

हाउप्टमान हे फिलॉसॉफिकल सोसायटी ऑफ वॉशिंग्टन आणि ॲसोसिएशन ऑफ इन्डिपेंडंट रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांचे अध्यक्षहोते. त्यांना डिरॅक मेडल सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कचे बेल्डन ॲवॉर्ड (१९३६) सायंटिफिक रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिकाचे प्युअरसायन्स ॲवॉर्ड (१९५९) अमेरिकन क्रिस्टलोग्राफिक ॲसोसिएशनचे पॅटरसन ॲवॉर्ड (१९८४) यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले.

 

हाउप्टमान यांचे बफेलो येथे निधन झाले.

मगर, सुरेखा अ.