हॅमंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इंडियाना राज्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या ७९,६८६ (२०१२). हे इंडियाना राज्यातील लेक परगण्याच्या वायव्य कोपऱ्यात, मिशिगन सरोवराच्या द. टोकाशीग्रँड कॅल्युमेट नदीवर वसलेले आहे. इलिनॉय-इंडियाना राज्यांच्या सरहद्दी-वरील हे शहर शिकागो व गॅरी यांदरम्यानच्या औद्योगिक क्षेत्रात असूनते शिकागोच्या आग्नेयीस ३२ किमी.वर आहे.

 

अर्नेस्ट होह्मन याने १८५१ मध्ये येथे पहिली वसाहत स्थापन केली व तिला होह्मन असे नाव दिले. त्यानंतर या वसाहतीचे स्टेट लाइन असे नामकरण झाले. १८६८ मध्ये जॉर्ज हॅमंड याने मांस आवेष्टनाचा देशातील पहिला प्रकल्प येथे सुरू केला व लोहमार्गाद्वारे शीतकपाटांमधून ते बोटींपर्यंत नेण्याची सुविधा निर्माण केली. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला. त्याच्या नावावरूनच १८७३ मध्ये या शहराचे हॅमंड हे नामकरण करण्यात आले. १८८४ मध्ये याला शहराचा दर्जा देण्यात आला. इंडियाना व इलिनॉय या दोन्ही राज्यांना या शहरांद्वारे मिशिगन सरोवरातून वाहतूक करता येते.

 

अलिकडे हॅमंड हे कॅल्युमेट प्रदेशातील महत्त्वाचे औद्योगिकी-करण झालेले केंद्र आहे. येथे लोह व पोलाद ओतकामाच्या भट्ट्या, पेट्रोलियम पदार्थ, रेल्वे सामग्री, संदेशवहन यंत्रे, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि सौंदर्यप्रसाधने इ. निर्मितिउद्योग विकसित झाले आहेत.यांशिवाय येथे पुस्तकछपाई व प्रकाशन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

 

कॅल्युमेट कॉलेज ऑफ सेंट जोझेफ आणि हेल्स अँडरसन कॉलेज ही महाविद्यालये आणि पर्ज्यू विद्यापीठ, कापलन विद्यापीठ आणि इंडियाना डॅब्ने विद्यापीठ या शिक्षणसंस्थांतून उच्च शिक्षणाची सुविधा शहरात उपलब्ध आहे.

कुंभारगावकर, य. रा.