हर्डलिचका, ॲलेश : (२९ मार्च १८६९–५ सप्टेंबर १९४३). अमेरिकन शारीरिक मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म हम्पोलेक (बोहीमिया) येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्याच्या बालपणीच त्याच्या कुटुंबाने अमेरिकेत स्थलांतर केले. त्याने आपल्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि काही काळ वैद्यकी केली. नंतर तो एल्. पी. मनौव्हरिअर याच्याबरोबर मानवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पॅरिसला गेला (१८९६). तेथून तो अमेरिकेत परत आला आणि रोगनिदानशास्त्र संस्थेत (न्यूयॉर्क) मानवशास्त्रविषयक सहायक म्हणून नोकरीस लागला. त्याची अमेरिकन म्यूझीअम ऑफ नॅचरल हिस्टरी या ख्यातनाम संस्थेने नियोजित केलेल्या शारीरिक मानवशास्त्रविषयक मोहिमांचा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८९९–१९०२). पुढे तो स्मिथसोनियन संस्थेमधील शारीरिक मानवशास्त्र विभागाचा (संग्रहाचा) सहायक अभिरक्षक झाला (१९०३–१०). त्यानंतर त्याला अभिरक्षक पदावर बढती मिळाली. या पदावर असताना (१९१०–४२) त्याने पुष्कळ प्रवास केला आणि पिथेकॅन्थ्रोपसचा अथवा होमो इरेक्टसचा वावर होता, अशा अनेक स्थळांचे सर्वेक्षण केले. याशिवाय पुराणाश्मयुगीन स्थळांचा वेधही त्याने घेतला आणि होमो निअँडरथेलेन्सिस यांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध लिहिला. त्याने १९२७ मध्ये ‘निअँडर फेज ऑफ मॅन’ या शीर्षकार्थाने लिहिलेल्या आपल्या शोधनिबंधात मानवशास्त्रा-विषयी काही उपपत्ती मांडल्या. त्यांत त्याने होमो सेपियन हा होमो निअँडरथेलेन्सिस मधून उत्क्रांत झालेला एक गट असून सर्व मानववंशाचे मूलस्थान एकच असल्याचे प्रतिपादन केले. पुढे त्याने मानवजात ही अतिप्राचीन काळातच उत्क्रांत झाल्याचे गृहीततत्त्व प्रतिपादिले.

हर्डलिचकाने १९२७ मध्ये अलास्का व बेरिंग सामुद्रधुनी येथे संशोधनार्थ मोहिमा आखल्या आणि अशी उपपत्ती मांडली की, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मूळ रहिवासी (अमेरिकन इंडियन्स) हे आशियातून बेरिंग सामुद्रधुनी ओलांडून आलेले आशियायी लोक असावेत. त्याच्या कार्यकर्तृत्वाला अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी त्याच्या स्मरणार्थ नामांकन केलेले हर्डलिचका म्यूझीअम ऑफ मॅन (प्राग) हा सर्वोत्तममान होय. त्याने काही संशोधनात्मक निवडक ग्रंथ लिहिले. त्यांपैकी एन्शन्ट मॅन इन नॉर्थ अमेरिका (१९०७), फिजिकल ॲन्थ्रोपॉलॉजी प्रॅक्टिकल ॲन्थ्रोपॉमेट्री (१९२१), द ओल्ड अमेरिकन्स (१९३०), द स्केलेटल रिमेन्स ऑफ अर्ली मॅन (१९३०) हे ग्रंथ विशेष उल्लेखनीयअसून मान्यवर झाले आहेत. अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल ॲन्थ्रोपॉलॉजी या नियतकालिकावर त्याचा विशेष प्रभाव होता. त्याचा तो १९१८ पासून संस्थापक-संपादक होता. त्यातून त्याचे काही शोधनिबंध प्रकाशित झाले होते.

अल्पशा आजाराने त्याचे वॉशिंग्टन डी. सी. (अमेरिका) येथे निधन झाले.

कुलकर्णी, वि. श्री.