हमिंग पक्षि : पक्षी वर्गातील ॲपोडिफॉर्मिस गणाच्या ट्रोचिलीडी कुलात यांचा समावेश होतो. ते विविध रंगांचे आकर्षक पक्षी असून त्यांच्या सु. ३२० जाती आहेत. त्यांच्या अनेक जाती दक्षिण अमेरिकेत आढळतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व कॅनडात या पक्ष्याच्या सु. १२ जाती आढळतात. रूबी-थ्रोटेड हमिंग पक्ष्याचे (आर्चिलोकस कोलूब्रिस) प्रजनन पूर्व-उत्तर अमेरिकेत होत असून ते नोव्हा स्कोशा ते फ्लॉरिडा या भागांत आढळतात. उत्तर भागांत आढळणाऱ्या रूफोज हमिंग पक्ष्याचे (सेलॅस्फोरस रुफस) प्रजनन दक्षिण-पूर्व अलास्का ते उत्तर कॅलिफोर्निया या भागांत होते.
सर्व हमिंग पक्षी आकाराने लहान असतात. त्यांपैकी पश्चिम-दक्षिण अमेरिकेत आढळणारा जायंट हमिंग (पॅटॅगोना गिगॅस) हा सर्वांत मोठा असून त्याची लांबी सु. २० सेंमी. व वजन सु. २० ग्रॅ. असते. बी हमिंग (मेलिशुगा हेलेनी) ही जाती क्यूबामध्ये आढळते. तिची लांबी सु. ५.५ सेंमी. व वजन सु. २ ग्रॅ. असते. हा जगातील सर्वांत लहान पक्षी आहे. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या ठिकाणी आढळणारे छोटे हमिंग पक्षी मागेमागे उडत जाऊ शकणारे एकमेव पक्षी आहेत.
हमिंग पक्ष्याचे स्नायू बळकट व पंख पात्यासारखे लांब असतात. त्यामुळे ते फुलांच्या वर-खाली आणि पुढे-मागे अशा हालचाली सहजपणे करू शकतात. नरामध्ये पंखांची फडफड ८० प्रतिसेकंद, तर मादीमध्ये ६० प्रतिसेकंद असते. या पक्ष्यांमध्ये लहान आकारमानाच्या पक्ष्यांपेक्षा मोठ्या आकारमानाच्या पक्ष्यांमध्ये पंखांची फडफड कमी होत जाते. उदा., जायंट हमिंगमध्ये पंखांची फडफड फक्त १० प्रतिसेकंद असते. पक्ष्यांचे पंख धातुसदृश रंगाचे असतात. त्यावर प्रकाश पडल्यावर ते विविध रंगांचे असल्यासारखे वाटतात.
हमिंग पक्ष्यांमध्ये नर-मादी दिसायला सारखेच असतात. ते फुलांतील मधुरस व कीटक खातात. बी हमिंगची चोच लांब व निमुळती होत गेलेली असते. थॉर्नबिलची चोच लहान असते. सोअर्डबिलची चोच लांब असून ती त्याच्या लांबीच्या अर्धी (सु. १० सेंमी.) असते, तर सिकलबिलमध्ये चोच किंचित बाकदार असते.
हमिंग पक्ष्यांमध्ये नर-मादी फार काळ एकत्र राहत नाहीत. व्हायोलेटइअर पक्षी जोडी जमवितात. नर-मादी एकत्रितपणे पिलांचे संगोपन करतात. नर संरक्षणासाठी मदत करतात. या पक्ष्याच्या बहुतेक जातींत नर पक्षी मादीचे लक्ष वेधून घेण्याकरिता उड्डाणांच्या कसरती करतात. तो मादीला त्याच्या कंठावरील पट्ट्यातील रंग दिसतील अशा रीतीने तिच्या समोरून उड्डाण करतो. ते यू (U) या इंग्रजी अक्षराच्या आकारात हवेत उड्डाण करताना त्यांच्या पंखांचा हमिंग, हिसिंग अथवा पॉपिंग असा आवाज होतो. हा आवाज अनेकांना इतर पक्ष्यांच्या गाण्यासारखा वाटतो. या पक्ष्याच्या काही जातींत शेपटीच्या पंखांचा असा आवाज होतो.
हमिंग पक्ष्याचे घरटे वनस्पतीचे धागे, कोळ्याचे जाळे व दगडफूल यांपासून तयार केलेले असते. ते कपाच्या आकाराचे असून झाडाच्या दोन फांद्यांच्या बेचक्यात असते. काही वेळा ते झाडाच्या मोठ्या पानांवर व खडकांवरही असते, कधीकधी तर झाडाला टांगलेले असते. काही घरटी एका बाजूने वनस्पतीचा काडी कचरा व दुसऱ्या बाजूस माती-चिखल यांपासून बनविलेली असतात. मादी पांढऱ्या रंगाची व वाटोळ्या आकाराची एक किंवा दोन अंडी घालते. अंडी पक्ष्याच्या शरीराच्या सु. १०% वजनाची असतात. मादी १५–२० दिवस अंडी उबविते. अंड्यातून बाहेर पडलेली पिले सुरुवातीस दृष्टिविहीन व पंखविरहित असतात. तीन आठवड्यांनंतर पिले उड्डाण करू शकतात. या पक्ष्याचे विविध जातींमध्ये आयुर्मान ४–१२ वर्षे असते. त्याचे कावळे व बहिरी ससाणा हे नैसर्गिक शत्रू आहेत. (चित्रपत्र).
पाटील, चंद्रकांत प.; वाघ, नितिन भरत