स्विटोनिअस

स्विटोनिअस : (सु.७० – सु.१६०). रोमन ग्रंथकार. लॅटिन भाषेत लेखन. त्याचा जन्म बहुधा रोम येथे एका सरदार घराण्यात झाला. उत्तर आफ्रिकेतील हिप्पो रेजिअस या ठिकाणी तो जन्मला असावा,असाही एक तर्क आहे. रोममध्येच त्याचे बहुतेक शिक्षण झाले,असे दिसते. कायद्याचा अभ्यास त्याने केला होता तथापि वकिलीचा व्यवसाय त्याने सोडून दिला. रोमन प्रशासक ⇨ धाकटा प्लिनी (इ. स. ६१ – सु. ११३) हा स्विटोनिअसचा मित्र होता. धाकटा प्लिनी जेव्हा बिथिनीआचा गव्हर्नर म्हणून नेमला गेला, तेव्हा स्विटोनिअस त्याच्या बरोबर तेथे गेला असावा. धाकट्या प्लिनीचा मृत्यू झाल्यानंतर स्विटोनिअसला सेप्टिशिअस क्लॅरस ह्या मित्राने पाठबळ दिले. सेप्टि-शिअसच्या प्रयत्नांमुळे त्याला रोमन सम्राट ट्रेजन (कार. ९८-११७) याच्याकडून राजसेवेतली विविध पदे प्राप्त झाली. त्यांत सम्राटाच्या व्यक्तिगत ग्रंथालयाचा अधिकारी ह्या पदाचाही समावेश होता. रोममधील सार्वजनिक ग्रंथालयेही त्याच्या नियंत्रणाखाली आली होती. सम्राट ट्रेजन याच्या मृत्यूनंतर रोमन सम्राट एड्रिअन (कार. ११७-३८) याच्या कारकीर्दीत स्विटोनिअसला असे एक पद मिळाले, की त्यामुळे त्याला सम्राटाचा अधिकृत पत्रव्यवहार पाहण्याची संधी मिळाली होती परंतु लवकरच सम्राटाने त्याला त्या पदावरून काढून टाकले. या घटनेनंतरच्या काळात तो रोममध्ये किंवा हिप्पो रेजिअस येथे निवृत्त जीवन जगू लागला आणि ह्या दोन ठिकाणांपैकी जेथे राहिला, तेथेच त्याचे निधन झाले असावे.

स्विटोनिअसच्या लेखनापैकी ऐतिहासिक स्वरूपाचे जे लेखन होते, त्यातील बरेचसे लेखन नष्ट झालेले आहे. त्याचे उपलब्ध असलेले ग्रंथ असे : De Vita Caesarum (इं. शी. ‘द लाइव्ह्ज ऑफ द सीझर्स’), De viris illustribus (इं. शी. ‘कन्सर्निंग इलस्ट्रिअस मेन’).

‘द लाइव्ह्ज ऑफ द सीझर्स’ मध्ये जूलिअस सीझरपासून डोमिशिन पर्यंतच्या रोमन सम्राटांची चरित्रे आहेत. ह्यांपैकी प्रत्येक सम्राटाची पूर्वजपरंपरा, त्याची कारकीर्द स्विटोनिअसने दिलेली आहे मात्र ह्या चरित्रांत ऐतिहासिकतेचे भान फारसे सांभाळलेले दिसत नाही. ऐकीव माहिती, आख्यायिका यांवर भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे ही चरित्रे रंजक करण्याकडे त्याचा कल आहे. ‘कन्सर्निंग इलस्ट्रिअस मेन’मध्ये काही छोटे ग्रंथ अंतर्भूत आहेत ते असे : ‘De Grammaticis’, ‘De Rhetoribus’. ‘De Grammaticis’ मध्ये व्याकरण म्हणजे काय, हे सांगून वीस प्रमुख व्याकरणकारांची काही माहिती दिली आहे. ‘De Rhetoribus’ मध्ये वक्तृत्वशास्त्राचा रोममध्ये विकास कसा झाला, हे सांगून वक्तृत्वशास्त्राच्या पाच प्रमुख अध्यापकांची माहिती सांगितली आहे. यांशिवाय यात आणखीही एक ग्रंथ अंतर्भूत असून त्यात महत्त्वाच्या रोमन कवींबद्दल – उदा., व्हर्जिल, जूव्हेनल, ल्यूकन – मनोरंजक माहिती सांगितली आहे. ती देतानाही आख्यायिकांवर भर दिलेला आहे.

कुलकर्णी, अ. र.