स्फटग्रंथि : (जिओड). हा चापट, गोलाकार व पोकळ खनिजपिंड असून त्याच्या आतील बाजूस लहान स्फटिकांचे अस्तर तयार झालेले असते आणि या स्फटिकांची वाढ पोकळीच्या मध्याकडे झालेली असते. स्फटग्रंथी चुनखडकांच्या थरांमध्ये पुष्कळ वेळा आढळतात. काही शेल खडकांतही त्या आढळतात. बहुतेक स्फटग्रंथी बेसबॉलएवढ्या असतात. त्यांचा सरासरी व्यास २·५–३० सेंमी. पेक्षाही जास्त असू शकतो. आतील स्फटिकी अस्तराच्या थराभोवती ⇨ कॅल्सेडोनी खनिजाचा घट्ट व पातळ थर असतो. या थरावर स्फटिकांचा पहिला, त्यावर दुसरा असे लागोपाठ थर निर्माण होत जाऊन पोकळी जवळजवळ भरते. हे स्फटिक बहुधा क्वॉर्ट्झ खनिजाचे, कमी प्रमाणात कॅल्साइटाचे आणि कधीकधी ॲरॅगोनाइट, अँकेराइट, हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, पायराइट, कॅल्कोपायराइट व स्फॅलेराइट या खनिजांचे असतात. पुष्कळदा धातूची सल्फाइडे सर्वांत आतील बाजूस असतात. कॅल्सेडोनीच्या थराच्या लगेच आतला थर कॅल्साइटाचा असतो. मात्र कधीकधी कॅल्सेडोनीचा दुसरा थरही असतो. अशा रीतीने स्फटग्रंथीत कोणत्या तरी प्रकारचे असे स्तरण झालेले आढळते. यावरून तेथील अवसादनाची क्रिया लयबद्ध रीतीने झाली असल्याचे सूचित होते.

लवणद्रव व वायू यांनी म्हणजे द्रायूने भरलेल्या शिंपल्यासारख्या मूळ पोकळीत प्रसरण होत जाऊन स्फटिक निर्माण होतात. या लवण विद्रावाभोवतीच्या त्याला वेगळ्या ठेवणाऱ्या सिलिका जेलपासून मूळ कॅल्सेडोनी थर तयार होतो. स्फटग्रंथीभोवतीच्या पाण्याची लवणता कमी झाली की, तर्षण दाब निर्माण होतो. त्यामुळे लवण बाहेर जाऊन पाणी आत शिरते व स्फटग्रंथीतील विद्राव विरल होऊन रासायनिक समतोल साधला जातो, तसेच आतील दाब वाढून स्फटग्रंथी प्रसरण पावते. चुनखडक व सिलिका (कॅल्सेडोनी) यांच्या आंतरपृष्ठाशी

सभोवतालचा चुनखडक विरघळून किंवा चुनखडक कठीण झालेला नसल्यास चुन्याचा सैल चिखल दूर सारला जाऊन दाबाची भरपाई होते. अशा रीतीने दाबांतील फरक नगण्य होईपर्यंत हे प्रसरण चालू राहून स्फटिकीभवन होत राहते.

मूळ पोकळी जीवाश्मात (शिळारूप झालेल्या जीवावशेषात) असल्यास प्रसरण पावणाऱ्या स्फटग्रंथीने जीवा फुटतो. अखेरीस सिलिका जेलमधील पाणी निर्जलीभवनाद्वारे निघून जाते व सिलिकेचे स्फटिकीभवन होऊन स्फटिक तयार होतात. यामुळे कॅल्सेडोनीचा थर वा भित्ती तयार होते. नंतर या थरांचे आकुंचन होऊन त्याला भेगा पडतात. त्यांतून खनिजयुक्त पाणी आत शिरते आणि त्यातील खनिजे कॅल्सेडोनी भित्तीवर साचत जातात. स्फटग्रंथीभोवतालच्या खडकाचे अपक्षालन होऊन (तो धुपून) स्फटग्रंथी सुटी होऊ शकते. ती पूर्ण भरलेली नसून उघडी असल्यास, फुटली असल्यास किंवा फोडल्यास आतील स्फटिकांचे अस्तर दिसते. त्यातील स्फटिक विविध रंगी असल्यास हा थर सुंदर दिसतो. यूरग्वाय देशामध्ये आढळणाऱ्या एका स्फटग्रंथीला हायड्रोलाइट किंवा जल-अश्म (वॉटरस्टोन) म्हणतात.

ठाकूर, अ. ना.