स्पोरोझोआ : प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील एक वर्ग. या वर्गातील प्राणी परजीवी असून ते इतर प्राण्यांच्या शरीरात राहतात. या वर्गात सु. २,००० जातींचा समावेश होतो. या प्राण्यांच्या जीवनावस्थेतील पहिल्या अवस्थेत ते बीजाणूसारखे (स्पोअरसारखे) दिसतात, म्हणून त्यांना स्पोरोझोआ म्हणतात.

स्पोरोझोआतील प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या कोशिका वा ऊतकांत व शरीरातील रिक्तिकांत राहतात. या प्राण्यांच्या शरीरावर तनुच्छद नावाचे आवरण असते. प्रौढावस्थेत या प्राण्यांमध्ये हालचाल करणारे अवयव व संकोचशील रिक्तिका नसतात. ते प्राणी पोषकाच्या शरीरातील अन्न शोषून घेतात किंवा पोषकाच्या शरीरातील कोशिका-द्रव व देहद्रव शोषून घेतात. या प्राण्यामध्ये तोंड, गुदद्वार व रिक्तिका नसतात. एक केंद्रक सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. या प्राण्यात अलैंगिक प्रजनन द्विभाजन व गुणित विभाजनाने होते. लैंगिक प्रजननानंतर बीजाणू तयार केले जातात. लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन एकांतरण (एकाआड एक) पद्धतीने होते. परजीवी स्पोरोझोआतील ज्या प्राण्यामध्ये बीजाणू तयार केले जातात त्यास ॲसिडोस्पोरिडियन म्हणतात.

स्पोरोझोआ वर्गात पाच उपवर्गांचा समावेश होतो, ते खालील-प्रमाणे आहेत.

टिलोस्पोरिडिया : (अ) प्रौढ प्राण्यात फक्त एकच केंद्रक असते. (आ) या प्राण्यामध्ये तयार झालेले बीजाणू साधे असतात त्यामध्ये ध्रुवीय संपुट नसते. (इ) बीजाणूत अनेक बीजे (स्पोरोझॉइट) असतात. (ई) सर्व जातींत लैंगिक प्रजनन होते. (उ) जीवनचक्राचा शेवट बीजाणू निर्मितीने होतो.

या उपवर्गात ग्रेगराइनिडा, कॉक्सिडिया व हीमोस्पोरिडिया या गणांचा समावेश होतो.

पायरोप्लाझ्मा : (अ) हे पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तकोशिकेत राहणारे परजीवी प्राणी आहेत. (आ) हे गोचिडासारख्या कीटकांच्या शरीरात राहतात. (इ) त्यांचे जीवनचक्र अद्यापही पुरेसे स्पष्ट नाही.

या उपवर्गात पायरोप्लाझ्मिडा या गणाचा समावेश होतो.

नायडोस्पोरिडिया : (अ) यातील प्रौढ प्राण्यात अनेक केंद्रके असतात. (आ) हे जीवनभर बीजाणुनिर्मिती करित असतात. (इ) प्रत्येक बीजाणूला पोषकाच्या शरीरात घट्ट पकडून ठेवण्यासाठी १-४ ध्रुवीय तंतू असतात. (ई) या प्राण्यातील शरीरद्रवामुळे रोग निर्माण होतात.

या उपवर्गात मिक्झोस्पोरिडिया, ॲक्टिनोमिक्सिडिया, हेलिको-स्पोरिडिया व मायक्रोस्पोरिडिया या गणांचा समावेश होतो.

ॲसिडोस्पोरिडिया : (अ) यातील प्रौढ प्राण्यात एकापेक्षा अधिक केंद्रके असतात. (आ) या प्राण्यात तयार होणारे बीजाणू साधे असून त्यांना पुटी व तंतू नसतात. (इ) प्रत्येक बीजाणूत एक बीज असते.

या उपवर्गात सार्कोस्पोरिडिया व हॅप्लोस्पोरिडिया या गणांचा समावेश होतो.

 

टॉक्सोप्लाझ्मिया : (अ) हे पृष्ठवंशी प्राण्याच्या शरीरात राहणारे परजीवी आहेत. (आ) या प्राण्यात लैंगिक प्रजनन व बीजाणुनिर्मिती होत नाही. या उपवर्गात टॉक्सोप्लाझ्मिडा या गणाचा समावेश होतो.

स्पोरोझोआ वर्गातील काही प्राण्यांमुळे निरनिराळे रोग होतात. या वर्गातील प्लास्मोडियम या प्राण्यामुळे माणसाला हिवताप हा रोग होतो. प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स ही महत्त्वाची जाती आहे. या प्राण्याला आपले जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी ॲनॉफेलीस डासाची मादी व मनुष्य यांची गरज असते. आयमेरिया हे प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या लहान आतड्यातील कोशिकेत राहतात. आ. आरलॉइंगी या जातीच्या बदराणूमुळे विशेषतः मेंढ्यांमध्ये रोग आढळून येतो. मोनोसिस्टीस हा प्राणी गांडुळाच्या प्रजनन तंत्रात परजीवी म्हणून राहतो. तो प्रजनन तंत्रात तयार होणाऱ्या शुक्राणूंचा अन्न म्हणून वापर करतो.

पाटील, चंद्रकांत प.