स्तँदाल : (२३ जानेवारी १७८३ — २३ मार्च १८४२). फ्रेंच कादंबरीकार. त्याचे मूळ नाव मारी-आंरी बेल ‘ स्तँदाल ’ हे टोपणनाव. जन्म ग्रनॉबल येथे. त्याचे वडील बॅरिस्टर होते. त्याची आई तो सात वर्षांचा असतानाच वारली. ह्या घटनेचा त्याच्या मनावर तीव्र परि-णाम झाला. आईबद्दल त्याला उत्कट प्रेम होते. तिच्या निधनानंतर तो वडिलांचा—खरेतर कोणत्याही अधिकारी व्यक्तीचा—तिटकारा करू लागला मात्र घरातून त्याला प्रेम मिळत नव्हते, असे नव्हे. विद्यार्थि-दशेत साहित्य आणि गणित ह्या विषयांत त्याला रस होता. त्याच्यावर शैक्षणिक संस्कार झाले ते मानस- शास्त्राच्या अभ्यासकांचे. माणसाच्या मनोव्यापारांचा—विशेषत: त्याच्या भावनांचाड्ढ अभ्यास करून त्याचे आकलन करून घेतले पाहिजे अशा अभ्यासातून भोवतालच्या लोकांवर प्रभाव टाकता आला पाहिजे, असे त्याला वाटे. ‘ स्व ’ ची जाणीव, इच्छाशक्तीचे आद्य स्थान, निरनिराळ्या घटनांचे त्वरित स्मरण होण्याची क्षमता ह्यांना त्याने महत्त्वपूर्ण मानले. सुखाभिलाषा ही मानवी वर्तनामागची मध्यवर्ती प्रेरणा होय, असे तो मानत होता. १७९९ मध्ये तो पॅरिसला आला. वडिलांची सत्ता असलेल्या ग्रनॉबल येथील आपल्या घरापासून त्याला दूर जायचे होते. नाटककार व्हावे, अशी त्याची इच्छा होती पण त्याच्या काही उच्चपदस्थ आप्तांनी त्याला फ्रेंच सैन्यात सेकंड लेफ्टनंटपदावर नोकरी मिळवून दिली आणि तो इटलीत असलेल्या फ्रेंच सेनेत आला (१८००). इटालियन संस्कृती आणि तेथील निसर्ग ह्यांचा खोल परिणाम त्याच्या मनावर झाला. १८०२ मध्ये तो पॅरिसला परतला आणि नाटककार होण्याच्या आपल्या महत्त्वा-कांक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करू लागला. काही लेखन त्याने हातात घेतले ते पूर्ण झाले नाही पण १८०६ मध्ये त्याला फ्रेंच सैन्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक मिळाली आणि त्या निमित्ताने तो जर्मनीत आला. १८१० पर्यंत तो तेथे होता. तेथील वास्तव्यात तो स्तँदाल ह्या शहरात काही काळ राहिला आणि ह्या शहराच्या नावावरूनच त्याने आपले टोपणनाव घेतले. १८१४ मध्ये फ्रेंच साम्राज्य कोसळले आणि स्तँदालने इटलीत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तो मिलानमध्ये राहू लागला.
मिलानमध्ये त्याच्या सर्जनशीलतेला चेतना मिळाली. तेथील उदारमत-वाद्यांशी त्याची मैत्री झाली. तो उत्साहाने लिहू लागला. संगीताचा आणि दृक्कलांचा त्याने अभ्यास केला. त्यातून त्याची पहिली दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘ लाइव्ह्ज ऑफ हेडन, मोट्सार्ट अँड मेतास्ताझ्यो ’ (१८१४, इं. शी.) आणि ‘ हिस्टरी ऑफ पेंटिंग इन इटली ’ (१८१७, इं. शी.) ही पुस्तके लिहिताना त्याने काही उचलेगिरी केली होती तथापि ह्या पुस्तकांतून त्याची मौलिक अंतर्दृष्टीही प्रकट झाली होती. ‘रोम, नेपल्स अँड फ्लॉरेन्स’ (१८१७, इं. शी. ) हे त्याचे प्रवासवर्णनात्मक पुस्तक. स्तँदाल हे आपले टोपणनाव त्याने ह्या पुस्तकावर प्रथम घातले. पण त्याच्यावर हेरगिरीचा संशय आल्याने १८२१ मध्ये त्याला मिलान सोडावे लागले. १८२२ मध्ये ‘ऑन लव्ह’ ( इं. शी. ) हे प्रेमासारख्या अत्युत्कट भावनिक अनुभवाचा वस्तुनिष्ठ, निर्लेप वृत्तीने विचार करणारे त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले. प्रेम करताना आपण आपल्याला हवेसे वाटणारे गुण आपल्या प्रिय व्यक्तीत पाहण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीत प्रत्यक्षात ते गुण फारसे नसतानाही. त्यामुळे प्रेम हा आपल्या अहंकाराचे समाधान करून घेण्याचा प्रयत्न ठरतो, अशी आपली धारणा त्याने त्या पुस्तकात व्यक्त केली आहे. त्याच्या ‘ रासिन अँड शेक्सपिअर ’ (१८२३, इं. शी. ) या ग्रंथात त्याने स्वच्छंदतावादाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. स्वच्छंदतावादी मनोवृत्ती हा सांस्कृतिक इतिहासातील प्रत्येक कालखंडाचा एक जिवंत जिव्हाळ्याचा पैलू असतो असे मत त्याने मांडले. Armance (१८२७) ही त्याची पहिली कादंबरी. ह्या कादंबरीचा नायक नपुंसक आहे. त्यातून क्रांतीनंतरच्या काळातील फ्रेंच समाजाचे हे प्रतीक असल्याचे मानले गेले आहे तथापि ल रूज ए ल न्वार (१८३०, इं. शी. ‘द रेड अँड द ब्लॅक’ ) ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी. त्याच्या काळी घडून आलेल्या एका गुन्हेगारी प्रकरणावर ती आधारलेली आहे. ज्युलियां सॉरेल हा अत्यंत थंड डोक्याने आपला स्वार्थ साधत राहणारा माणूस हा ह्या कादंबरीचा नायक. ही व्यक्तिरेखा बरीच गुंतागुंतीची आहे. नीति-अनीतीची कसलीच तमा त्याला नाही. दुसर्यांवर — विशेषतः स्त्रियांवर — वर्चस्व गाजवणे ही त्याची मानसिक गरज आहे. पण एका बाजूने, स्वत:ला नकळत तो प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई शोधत असतो. त्याची आई तो अगदी लहान असताना मरण पावलेली असते आणि त्याचा बाप व त्याचे भाऊ त्याचा तिरस्कार करीत असतात. सुख आणि प्रेम ह्यांच्या शोधात असणार्या व्यक्ती स्तँदालच्या कादंबर्यांतून आढळतात. ला शार्त्रझ द पार्म (१८३९) ह्या कादंबरीत प्रेमभावनेची सूक्ष्म रूपे त्याने चित्रित केलेली आहेत. १८३० नंतर तो आत्मचरित्रात्मक लेखनाकडे वळला. ‘मेम्वार्स ऑफ ॲन एगोटिस्ट’ (१८९०, इं. शी.), ‘द लाइफ ऑफ आंरी ब्रूलार्द’ (१८९०, इं. शी.) हे त्याचे आत्मचरित्रात्मक लेखन अपूर्णच असून त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले तथापि आज त्याच्या उत्कृष्ट लेखनात त्याची गणना केली जाते. त्याच्या कादंबर्यांतून आणि आत्मचरित्रात्मक लेखनातून त्याचे विचार अधिक पूर्णतेने प्रकट झालेले आहेत. त्याचे व्यक्तिमत्त्व फसवे होते. एकीकडून त्याचा उपहास आणि संशयवाद दिसतो पण एक संवेदनशील आणि जखमी झालेले अंतःकरण लपविण्यासाठी त्याने घेतलेला तो एक मुखवटा आहे, असेही वाटत राहते. ‘बेलिझ्मे’ ( बेल ह्या त्याच्या खर्या कौटुंबिक नावावरून ) हे त्याचे व्यक्तिगत तत्त्वज्ञान त्याने विकसित केले होते. त्यात सुखाचा पाठपुरावा, विवेकाधारित संशयवाद ह्यांचा त्याने पुरस्कार केला.
स्तँदाल स्वतंत्र वृत्तीचा होता. तो स्वच्छंदतावादी होता पण स्वच्छंदतावादी चळवळीपासून अलिप्त होता. अधिकारशाहीबद्दल त्याला तिटकारा होता. फ्रेंच क्रांतिपूर्व जगाबद्दल त्याला आस्था वाटत असे. उत्कट भावगेयता आणि विश्लेषक वृत्ती हे दोन गुण त्याच्या ठायी एकत्रच नांदत होते. त्याच्या समकालीनांना तो नीटसा कळला नाही पण ⇨ ऑनोरेद बाल्झॅकसारख्या लेखकाने स्तँदालच्या हयातीत त्याच्यातला प्रतिभावंत ओळखला होता. स्तँदाल पॅरिसमध्ये मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची कीर्ती हळूहळू वाढत गेली. एकोणिसाव्या शतकाने दिलेला एक थोर साहित्यिक अशी त्याची प्रतिभा निर्माण झाली.
संदर्भ : 1. Adams, Robert M. Stendhal : Notes on a Novelist, १९५९.
2. Brombert, Victor, Ed., Stendhal : A Collection of Critical Essays, १९६२.
3. Brombert, Victor, Stendhal : Fiction and The Themes of Freedom, १९७६.
4. Chaitin, Gilbert D. The Unhappy Few : A Psychological Study of the Novels of Stendhal, १९७२.
5. Hemmings, F. W. J. Stendhal : A Study of His Novels, १९६४.
6. Tillett, Margaret, Stendhal : The Background of the Novels, १९७१.
7. Wood, Michael, Stendhal, १९७१.
कुलकर्णी, अ. र.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..