स्ट्रॉबेरी : ( हिं. रसभरी, कुल-रोझेसी ). या वनस्पतीचे मूलस्थान उत्तर गोलार्ध असून दक्षिण गोलार्धातही तिची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. स्ट्रॉबेरीची प्रजाती फ्रॅगॅरिया असून तिच्या २० पेक्षा अधिक जाती आहेत. त्यासोबत संकरित जाती सुद्धा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रदेशानुसार जातींची लागवड केली जाते. लागवडीसाठी वापरल्या जाणार्या जाती मुख्यत्वेकरून फ्रॅ. व्हर्जिनियाना व फ्रॅ. चिलोएन्सिस या जातींपासून बनविण्यात आल्या असून त्या मूळच्या अमेरिकेतील आहेत. स्ट्रॉबेरीची मुख्य जाती फ्रॅ. व्हेस्का ही असून ती अनेक वर्षांपासून मानवी आहारात अंतर्भूत आहे. पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार अश्मयुगापासून ती वापरात असावी. स्ट्रॉबेरीची लागवड प्रथम प्राचीन पर्शिया ( इराण ) येथे झाली. तेथे लागवड झालेल्या जातीच्या फळांना ‘ टूट फरांगी ’ म्हणत. नंतर या स्ट्रॉबेरीच्या बिया रेशीममार्गावाटे ( पामीर खिंडीतून पर्शियामार्गे सिरियात जाणारा मार्ग ) लागवडीसाठी संपूर्ण यूरोप ते सुदूर पूर्व आशियात नेल्या गेल्या. स्ट्रॉबेरी वनस्पतीचे प्रथम रेखाचित्रित वर्णन १४५४ मध्ये झालेले आढळते. यूरोपातील लोक वसाहतीस जाण्याआधी अमेरिकेतील रेड इंडियन आदिवासी स्ट्रॉबेरी वापरीत होते. असे समजले जाते की, या आदिवासींच्या एका पाककृतीवरून ‘ स्ट्रॉबेरीचा पाव ’ बनविण्यात आला आहे.
सुमारे अठराव्या शतकात फ्रॅ. व्हेस्काऐवजी फ्रॅ. ॲनॅनासा ( बागेतील स्ट्रॉबेरी ) या जातीचा वापर सुरू झाला. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका येथील दोन वेगवेगळ्या जातींपासून १७४० मध्ये बागेतील नवीन स्ट्रॉबेरी ब्रिटनी ( फ्रान्स ) येथे तयार करण्यात आली. अमेरिकेतील स्ट्रॉबेरीचा पहिला संकरित वाण हडसन हा १७८० मध्ये तयार करण्यात आला. फ्रॅ. व्हर्जिनियाना ही जाती अमेरिकेत तिच्या मधुर स्वादासाठी पसंत केली जाते. फ्रॅ. चिलोएन्सिस या जातीची फळे आकाराने मोठी असून ती अमेरिकेत अमीदेई-फ्रांस्वा फ्रेझियर यांनी अर्जेंटिना व चिली देशांतून आणली होती. फ्रॅ. व्हर्जिनियाना व फ्रॅ. चिलोएन्सिस यांतील संकर यशस्वी होऊन बागेतील स्ट्रॉबेरी व्यावसायिक उत्पादन व घरगुती लागवडी-साठी मुख्यतः वापरण्यात येऊ लागली. मोठ्या फळाच्या स्ट्रॉबेरीचे ( फ्रॅ. चिलोएन्सिस ) उत्पादन यूरोपमध्ये अठराव्या शतकात सुरू झाले. हवामान, वातावरण, मृदा, दिवसाचा कालावधी ( सूर्यप्रकाशाची उप- लब्धता), पावसाचे प्रमाण आदी बाबींनुसार एकोणिसाव्या शतकात अनेक देशांनी आपापले स्ट्रॉबेरीचे वाण ( प्रकार ) विकसित केले.
स्ट्रॉबेरी वनस्पती कमी वाढणारे क्षुप असून त्यास तंतुमय मुळे असतात आणि मुकुटावर तलोद्भव पाने उगवतात. पाने हिरवी, संयुक्त, तीन पर्णके असलेली, करवती किनार व लोमकयुक्त असतात. फुले साधारणपणे पांढरी क्वचितच लाल असून लहान झुबक्यांत व जमिनीवर सरपटणार्या वेली- सारख्या वृंतावर येतात. मुळे काष्ठमय असून मुख्य आधारक्षोडापासून जमिनीवर धावते धुमारे फुटतात व त्यामुळे वनस्पती पसरते.
वनस्पतिविज्ञानानुसार स्ट्रॉबेरीचे फळ मृदुफळ नसते. तसेच ते फक्त एक फळच नसून मोठ्या प्रमाणात वाढलेले पुष्पासन असते यात काही प्रमाणात खरी फळे तसेच कृत्स्नफळे ( किंवा बिया ) लगडलेली असतात.
लागवड : स्ट्रॉबेरीची लागवड विविध प्रकारच्या मृदेत व परि-स्थितीत करता येऊ शकते आणि इतर उद्यानीय पिकांपेक्षा स्ट्रॉबेरीसाठी कमी जोरखते लागतात. तिच्या वाढीसाठी आर्द्रता धरून ठेवणारी जमीन आवश्यक असते किंवा तुषार सिंचन, ठिबक सिंचन वा पन्हाळी पद्धतीने पाणीपुरवठा करणे आवश्यक असते. पुढील वर्षीच्या पिकासाठी आदल्या वर्षी वसंत ऋतूत वनस्पतींच्या रोपांची लागवड केली जाते. हिवाळ्यात वा उन्हाळ्याच्या सुरुवातीस रोपण केले असेल तर फुलोरा झाडून टाकण्यात येतो. कारण त्यामुळे पहिल्या वर्षाचे पीक कमकुवत होत नाही. रोपे एक ते चार वर्षांपर्यंत ठेवली जातात. लागवड केलेल्या रोपांमधून धुमारे काढून टाकले जातात. चटई पद्धतीने लागवड केली असेल, तर मुख्य रोपाभोवती काही धुमारे वाढू दिले जातात.
भारतात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशांत होते. नैनिताल व डेहराडून ( उत्तर प्रदेश ), महाबळेश्वर व पाचगणी ( महाराष्ट्र ), काश्मीर खोरे, बेंगळुरू ( कर्नाटक ) आणि कालिपाँग ( पश्चिम बंगाल ) येथे प्रामुख्याने तिचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील पुणे, नासिक व सांगली जिल्ह्यांतील मैदानी भागांत देखील स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.
हवामान आणि मृदा : समशीतोष्ण वातावरणात स्ट्रॉबेरीची चांगली वाढ होते. हे कमी सूर्यप्रकाश आवश्यक असणारे पीक आहे. पीक फुलोर्यावर येत असताना आठ तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश सु. १० दिवस आवश्यक असतो. हिवाळ्यात वनस्पती सुप्तावस्थेत असते व तिची कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही. वसंत ऋतूत जेव्हा दिवस अधिक मोठे होत असतात आणि तापमान वाढते तेव्हा वनस्पतीची वाढ होऊन फुले येण्यास सुरुवात होते. उपोष्ण कटिबंधातील जातींना अतिथंड हवा-मानाची गरज नसते व त्या शिशिर ऋतूत थोड्या फार वाढतात.
स्ट्रॉबेरीच्या वाढीसाठी चांगला निचरा असणारी मध्यम, दमट व सेंद्रिय पोषक तत्त्वांनी भरपूर अशी जमीन आवश्यक असते. मृदेचा सामू ५.७-६.५ अम्लधर्मी [⟶ पीएच मूल्य ] असावा. जमिनीत अधिक प्रमाणात कॅल्शियम असल्यास पाने पिवळी पडतात. हलक्या जमिनीत मात्र भरपूर सेंद्रिय द्रव्ये असल्यास धुमार्यांची चांगली वाढ होते. अनेक वर्षे सलग एकाच जमिनीत स्ट्रॉबेरीचे पीक घेत नाहीत. हिरवळयुक्त प्रदेशांत लागवड चांगली होते. अधिक सामू आणि नेमॅटोडांचे संक्रामण असलेल्या जमिनीत लागवड करीत नाहीत.
स्ट्रॉबेरीचे प्रकार : प्रदेशानुसार स्ट्रॉबेरीचे विविध वाण उपलब्ध आहेत. पर्वतीय प्रदेशांसाठी रॉयल सोविरन, श्रीनगर आणि दिलपसंद योग्य असतात. कॅलिफोर्नियामधून आयात केलेले टोरे, टोईगा आणि सोलॅना हे वाण अत्यंत यशस्वी ठरले आहेत. बेंगळुरू येथे यशस्वी ठरलेल्या वाणाचे नाव बेंगळुरू असेच ठेवण्यात आले आहे. तसेच तो महाबळेश्वर येथेही उत्तम वाढतो. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशासाठी पुसा वाण सुचविला आहे. कॅट्रेन स्वीट हा वाण चव व वासाकरिता उत्तम असतो. प्रिमिअर फ्लॉरिडा-९०, मिशनरी, ब्लॅकमोर, क्लॉनमोर आणि क्लॉनडाईक या अमेरिकेतील वाणांपैकी काही भारतातील मैदानी भागांत लागवडीसाठी यशस्वी ठरण्याची शक्यता आहे.
दिवसाचा कालावधी आणि वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता यांवरून स्ट्रॉबेरीचे दोन प्रकार पडले आहेत : (१) दीर्घ व कमी अशा दोनही प्रकारच्या सूर्यप्रकाशात फुलोर्यावर येऊ शकणारे वाण. (२) फक्त कमी सूर्यप्रकाशात फुलोर्यावर येणारे ( व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे ) वाण.
कमी सूर्यप्रकाशात फुलोर्यावर येणार्या व भारतात आयात करण्यात आलेल्या मातृवृक्षांचे वाण पुढीलप्रमाणे आहेत : स्वीट चार्ली हा वाण पजारो या वाणापासून विकसित करण्यात आला आहे. या वाणाला लवकर फळे येत असून त्याची फळे तुलनेने गोड असतात. विंटर डॉन हा वाण फॅ्र. ॲनॅनासा या जातीपासून तयार करण्यात आला आहे. ह्या वाणा-मध्ये रोपाचा आकार लहान असतानाही मोठ्या आकाराची फळे देण्याची क्षमता आहे. कामारोसा हा वाण कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९९२ मध्ये प्रसारित करण्यात आला असून त्याची फळे आकाराने मोठी असतात. सन २००० मध्ये फेस्टिवल या वाणाची फ्लॉरिडामधून शिफारस करण्यात आली आहे. हा वाण रोसा लिंडा व ओसो ग्रॅण्ड यांच्या संकरातून निर्माण झाला असून आच्छादित लागवडीकरिता उपयुक्त आहे. यांशिवाय दीर्घ व कमी सूर्यप्रकाशात फुलोर्यावर येणार्या अल्बीऑन या वाणाचे मातृवृक्ष कॅलिफोर्नियातून आयात करण्यात येतात.
अभिवृद्धी : स्ट्रॉबेरीच्या अभिवृद्धीसाठी मातृवृक्षाच्या फुलोर्यानंतर आलेल्या धुमार्यांचा ( धावत्या खोडांचा ) वापर केला जातो. रोपाला जास्तीत जास्त धुमारे फुटू देतात, मात्र फळाची वाढ होऊ दिली जात नाही. मुळांची चांगली वाढ झालेली रोपे नवीन लागवडीसाठी वापरतात. योग्य ती काळजी घेऊन निगा राखल्यास एका रोपापासून १२ — १८ धुमारे मिळू शकतात.
लावणी : स्ट्रॉबेरीच्या रोपांची लावणी करण्याआधी जमिनीची खोल नांगरणी व कुळवणी करून घेणे आवश्यक असते. सेंद्रिय पदार्थांची पुरेशी मात्रा मृदेत असावी लागते. सपाट वाफ्यांवर स्ट्रॉबेरीची लावणी उंच-वट्यांसारख्या किंवा चटईसारख्या आखणीत ( पंक्तीत ) केली जाते. सिंचन क्षेत्र असलेल्या भागात वरंब्यावर लावणी करण्याचा सल्ला दिला जातो. महाबळेश्वरमध्ये ४ X ३ मी. किंवा ४ X ४ मी.च्या वाफ्यांवर लावणी केली जाते. दोन रोपांमधील अंतर सु. ४५ सेंमी., तर दोन ओळींमधील अंतर ६० —७० सेंमी. असते. प्रतिहेक्टरी सु. १७,००० ते ४२,००० रोपे लावली जातात. पर्वतीय भागात मार्च-एप्रिल व सप्टेंबर-ऑक्टोबर यांदरम्यान, तर मैदानी भागात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आणि महाबळेश्वर येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लावणी करतात.
रोपांची लावणी करताना मुळे सरळ खाली मृदेत रुजतील याची काळजी घेतात. रोपाभोवती मातीचा घट्ट थर दिला जातो, जेणेकरून मुळांना हवा लागणार नाही. रोपाचा फुटवा मातीच्या अगदी थोडा वर असावा लागतो. लावणी करत असताना रोप कोरडे होणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. आच्छादित लागवड पद्धतीमध्ये रोपांच्या दोन अथवा चार ओळी लावण्यात येतात. यांमध्ये दोन ओळींतील अंतर सु. ४५ सेंमी. व दोन रोपांतील अंतर सु. ३० सेंमी. ठेवण्यात येते. सर्व-साधारणपणे दोन ओळी पद्धतीत ३ मी. रुंदीचा व चार ओळी पद्धतीत ४ मी. रुंदीच्या प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन केले जाते.
रोपांची काळजी : रोपांची मुळे जमिनीच्या पृष्ठभागालगत पसरतात. त्यामुळे आर्द्रतायुक्त मृदा वापरावी लागते. कोळपणी हळुवारपणे करावी लागते आणि कोवळ्या रोपांना तणमुक्त ठेवावे लागते.
विशेष निगा : हिवाळ्यात अतिथंड वातावरणात रोपे नष्ट होऊ नये म्हणून वाळलेल्या गवताच्या अवशेषांनी, प्लॅस्टिक कागदाने अगर कापडाने रोपे आच्छादली जातात. आच्छादनामुळे फळांवर माती किंवा धूळ बसत नाही. फळांचे कुजणे कमी होते, मृदेतील आर्द्रता टिकवून ठेवली जाते तसेच धुरकट हवामानात फुलोरा गळण्यापासून वाचतो. उष्ण वातावरणात जमिनीतील तापमान कमी राहते. यासाठी विविध प्रकारची आच्छादने असतात. त्यात सामान्यपणे ताटाचे आच्छादन वापरले जाते.
सिंचन : स्ट्रॉबेरीची मुळे जमिनीत फार खोलवर जात नसल्यामुळे ती अवर्षणीय ( दुष्काळी ) परिस्थितीला नाजूक असते. वसंत ऋतूच्या सुरुवातीला रोपांची लागवड केली असेल, तर हिवाळ्याचा प्रारंभ होण्याआधी वनस्पतीची शाकीय वाढ चांगली होते. मात्र नवीन लावणी केलेल्या रोपांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल याची काळजी घेतली जाते अन्यथा रोपे करपून जाण्याचे प्रमाण जास्त वाढते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस नसल्यास आठवड्यातून दोनदा पाणी दिले जाते. नोव्हेंबरच्या सुमारास एका आठवड्याच्या अंतराने, तर डिसेंबर आणि जानेवारीत दर दोन आठवड्यांनी पाणी दिले जाते. फळे धरल्यावर पाणी देण्याचे प्रमाण वाढवावे लागते. या अवस्थेत सतत पाणीपुरवठा केल्यास मोठी फळे येतात. याकरिता ठिबक सिंचन पद्धती उपयुक्त ठरते.
खते आणि जोरखते : स्ट्रॉबेरीसाठी माफक प्रमाणात नायट्रोजनाची आवश्यकता असते. एक हेक्टर जमिनीसाठी ५० टन सेंद्रिय खताची मात्रा योग्य असते. यामुळे मुळांची मृदा धारण करण्याची क्षमता वाढते आणि धुमारेही चांगले फुटतात. प्रतिहेक्टरी ८४ —११२ किग्रॅ. नायट्रोजन, ५६ — ८४ किग्रॅ. स्फुरद ( फॉस्फरस ) आणि ५६—११२ किग्रॅ. पोटॅश अशी मात्रा असावी म्हणून रासायनिक खतांचा देखील वापर केला जातो. फॉस्फरसयुक्त खतांचा वापर रोप लावणी करण्याआधी करतात. नायट्रोजनयुक्त खते दोन मात्रेत दिली जातात ( लावणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी आणि रोप फुलोर्यावर आल्यावर ), तर पोटॅशयुक्त खते फक्त फुलोर्याच्या वेळी देतात. नायट्रोजनाच्या योग्य व पुरेशा पुरवठ्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनात खूप वाढ होते.
रोग व किडी : स्ट्रॉबेरीवर मुख्यतः लाल कोष्टी, कुरतडणारी अळी व फुलकिडे या तीन कीटकांचा प्रादुर्भाव होतो. ०.०५% मोनोक्रोटोफॉस आणि ०.२५% आर्द्र सल्फर यांच्या मिश्रणाच्या वापराने या कीटकांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. कुरतडणार्या अळीच्या बंदोबस्तासाठी लावणी करण्याआधी १०% थायमेट फेकतात किंवा ३% कार्बोफ्यूरॉन जमिनीत चांगल्या प्रकारे मिश्रित करतात.
स्ट्रॉबेरीचे दोन सामान्य रोग म्हणजे फायटोप्थोरा फ्रॅगॅरिई या बुरशीमुळे होणारा लाल रंभ (रेड स्टेले ) व काळा मूळकूज हे होत. लाल रंभ रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाला प्रतिबंध करणार्या स्टेलेमास्टर या वाणाची लागवड करणे योग्य असते, तर दुसर्या रोगासाठी पिकांचे ओज (जोम ) कायम ठेवणे व शिंबावर्गीय पिकांची फेरपालट करणे आवश्यक असते. स्ट्रॉबेरीवर पिवळा काठ ( यलो एज ), कुरळी ( क्रिंकल) आणि खुरटेपण यांसारख्या विषाणुजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव होतो. पर्वतीय भागांत रोपवाटिका असल्यास हे रोग तपासणे सोपे जाते. स्ट्रॉबेरीत जननिक विलग्नतेमुळे काही हरिताभावी (हरितकणूंचा अभाव असलेली ) रोपे निर्माण होतात. या रोपांत व विषाणूंच्या संक्रमणातील रोपांत असलेला फरक ओळखून रोपे उपटून नष्ट करतात.
स्ट्रॉबेरीवर पडणारे रोग व त्याला कारणीभूत असलेले सूक्ष्मजंतू आणि किडी पुढीलप्रमाणे आहेत : पानांवरील ठिपके ( मायकोस्फिरिला फ्रॅगॅरिई ), पानांवरील करपा ( डेंड्रोफोमा ऑबस्क्युरन्स किंवा फोमॉप्सीस ऑबस्क्युरन्स ), पानांचे जळणे ( डिप्लोकार्पॉन अर्लियाना ), करडी बुरशी ( बॉट्रिटीस सिनेरा ), फुलोर्यांचे कोमेजणे ( व्हर्टिसिलियम ॲल्बोॲट्रम ) व फुटव्यांची कूज ( फायटोफ्थेरा कॅक्टोरम ) या रोगांच्या नियंत्रणाकरिता मॅकोझेब, बाविस्टीन अथवा ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. फुटवा प्रच्छिद्रक ( टायलोडर्मा फ्रॅगॅरिई ), मुळांवरील टोका ( ओटिओर्हिंकस ओव्हॅटस ), पांढरा डिंभक किंवा भुंगेरा ( फायलोफॅगा ), मुळांवरील कृमी ( पॅरिया फ्रॅगॅरिई ) व मुळांवरील मावा ( ॲफिस फोर्बेसी ) या कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता निंबोळी पेंडयुक्त खते जमिनीतून देण्यात येतात. पाने कुरतडणारे कीटक ( अँकिलिस कॉम्प्टॅना फ्रॅगॅरिई ), मुकुलावरील टोका ( अँथोनॉमस सिग्नॅटस ) इत्यादींच्या नियंत्रणासाठी ३०% डायमिथोएट किंवा १.७% इमिडाक्लोरोप्रीड फवारतात. तसेच कोष्टी ( टेट्रानिकस अर्टिसी आणि स्टेनीओटारसोनीमस पॅलिडस ) यांच्या नियंत्रणाकरिता ८०% गंधकाची फवारणी करतात.
यासोबतच काही पक्ष्यांचा सुद्धा त्रास पिकलेल्या फळांना होतो. त्यासाठी जाळ्या लावणे वगैरे काळजी घेणे आवश्यक असते.
फळ तोडणी आणि उत्पादन : मैदानी भागात फेब्रुवारीच्या शेवटी ते एप्रिलपर्यंत स्ट्रॉबेरी फळे तोडणीयोग्य होतात तर महाबळेश्वर, नैनिताल आणि काश्मीरसारख्या पर्वतीय भागांत मे-जूनमध्ये ती पक्व होतात. फळांची तोडणी दररोज केली जाते. स्थानिक बाजारात विक्री करण्यासाठी फळे पूर्ण पिकल्यावर तोडली जातात, तर दूर अंतरावर फळे पोहोचवायची असल्यास ती टणक व पूर्ण पक्व न झालेली अशी तोडतात. फळे खूपच मृदू ( नाशिवंत ) असल्याने ती सपाट व पसरट खोक्यांत ( कार्डबोर्ड, बांबू, कागद, छोपली इ.) एक किंवा दोन स्तरांत रचली जातात. फळांची तोडणी पहाटेच शुष्क ( कोरड्या ) वातावरणात केली जाते. धुतल्यामुळे फळे खरचटली जातात व त्यांची चमक नाहीशी होते.
स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात नाशिवंत असल्याने तोडणीवेळी आणि हाताळताना खूपच काळजी घ्यावी लागते. तसेच वाहतूक करतेवेळी सुद्धा खूप काळजी घेतली जाते. पहाटे तोडणी करून अथवा संध्याकाळी तोडणी करून थंड जागेत साठवून दुसर्या दिवशी फळे विक्रीसाठी बाजारात नेली जातात.
हवामानानुसार व प्रदेशनिहाय उत्पादनात फरक पडतो. प्रतिहेक्टरी २०—२५ टन उत्पादन उत्कृष्ट मानले जाते. आदर्श परिस्थितीत ५० टनां-पर्यंत उत्पादन मिळाल्याची नोंद आहे. भारतात स्ट्रॉबेरीचे व्यापारी दृष्ट्या उत्पादन हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, हरियाना, दिल्ली या राज्यांत आणि निलगिरी पर्वतात ( केरळ ) घेतले जाते. स्ट्रॉबेरीचे महाबळेश्वर-पाचगणी ( महाराष्ट्र ) येथे सर्वांत जास्त उत्पादन होते. जवळपास ८५% पुरवठा या भागातून केला जातो. सन २०१२ मध्ये १६,०००—१८,००० टन उत्पादन या भागात झाले.
स्ट्रॉबेरीचे जवळपास वीस वाण गोडपणा आणि वापर या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मगजयुक्त आणि रसाळ स्ट्रॉबेरी खाण्यासाठी उत्तम असते. त्यांची चव गोड, उत्तेजक व चविष्ट असते. स्ट्रॉबेरीची एक-मेव द्वितीय चव तिच्यातील ३०० पेक्षा अधिक घटकद्रव्यांपासून निर्माण झालेली असते.
पोषक तत्त्वे : स्ट्रॉबेरीतील अन्नघटक ( प्रति १०० ग्रॅ.) पुढील-प्रमाणे असतात : प्रथिने ०.७ ग्रॅ. स्निग्ध पदार्थ ०.२ ग्रॅ. कार्बोहायड्रेटे ९.८ ग्रॅ. खनिजे ( कॅल्शियम ३० मिग्रॅ., फॉस्फरस ३० मिग्रॅ., लोह १.८ मिग्रॅ. ) जीवनसत्त्वे [ अ-३० आं. ए., ब१ ( थायामीन )-०.०३ मिग्रॅ., ब२ ( रिबोफ्लाविन )-०.०२ मिग्रॅ., निकोटिनिक अम्ल-०.२ मिग्रॅ., क-५२ मिग्रॅर्.] ऊष्मांक ४४ कॅलरी. [⟶ अन्न ].
आरोग्य दृष्ट्या महत्त्व : स्ट्रॉबेरीत असणार्या प्रतिऑक्सिडी-कारक व प्रतिशोथकारक या गुणधर्मांमुळे ती आरोग्य दृष्ट्या पुढील तीन प्रमुख बाबींकरिता महत्त्वपूर्ण ठरते : (१) हृद्वाहिनीला आधार आणि हृद्वाहिनी रोगांची प्रतिरक्षा, (२) रक्तशर्करेचे नियंत्रण वाढविणे व मधुमेह ( प्रकार-२) होण्याची शक्यता कमी करणे आणि (३) कर्करोगांची प्रतिरक्षा उदा., स्तन, ग्रीवा, बृहदांत्र, ग्रसिका इत्यादी. यासोबतच स्ट्रॉबेरीचा उपयोग वार्धक्य आणि त्यासंबंधीच्या क्रियांमध्ये होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, स्ट्रॉबेरी सेवनाने बोधनात वाढ होते तसेच ती तंत्रिका क्रिया ( संतुलन आणि हालचालींतील सुसूत्रता ) वाढविण्यास मदत करते. आंत्रशोथासारख्या विकारांमध्ये देखील सुधारणा दिसून येते. पाने, खोड आणि फुलांपासून औषधी चहा बनवितात. असे मानले जाते की, स्ट्रॉबेरीच्या विविध भागांचा उपयोग अतिसार, संधिवात, मुतखडा, मुखदुर्गंधी, गळ्याचे संक्रामण, ताप, शोथ, उदासीनता, नैराश्य आदी रोगांवर व विकारांवर होऊ शकतो.
उत्पादनातील वापर : स्ट्रॉबेरीचा वापर उकळून, थंड करून किंवा बेकिंगने करता येतो. या फळांना संमिश्रित स्क्वॅश ( लगदा ), जाळीवर भाजणे, कुस्करणे आणि इतर अनेक पद्धतींद्वारा वापरता येते.
पेये : स्ट्रॉबेरीच्या स्वादाची अनेक पेये बनविली जातात किंवा अनेक प्रसिद्ध कॉकटेल ( संमिश्रित पेये ) बनविण्यासाठी वापरतात. मार्गारिटा किंवा डाक्क्युरीमध्ये शीतलीकरण केलेली स्ट्रॉबेरी वापरतात. लेमोनेडसाठी स्ट्रॉबेरीचा गर वापरतात. साखरेचा कमी वापर करून सिरप बनवितात. या सिरपमध्ये फेसाळ ( वायुयुक्त ) पाणी वापरून सोडा बनवितात.
सॅलड : एखाद्या पाककृतीत केळी, व्हॅनिला, कोको, खोबरी दूध, इतर मृदुफळे इत्यादींसोबत स्ट्रॉबेरीचा स्वाद रंगत आणतो. तसेच शाकाहारी सूपांमध्ये ( विशेषतः टोमॅटो, मिरी ) वरून टाकण्यासाठी तिचा वापर होतो. जेवणानंतरचा गोड पदार्थ ( डेझर्ट ) : स्ट्रॉबेरी चॉकलेटे, पाय, केक, मफीन, गोड पाव आणि आइसक्रीम यांसारख्या पदार्थांत स्ट्रॉबेरीचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
इतर उपयोग : स्ट्रॉबेरी जॅम, जेली, स्क्वॅश, सॉस, चॉकलेटे, बिस्किटे यांमध्ये तसेच काही औषधी पेयांत स्वादकारक म्हणून वापरतात. अलीकडे त्वचा उजळविणारी क्रीम, शांपू , साबण आदींसारख्या सौंदर्यप्रसाधनांत देखील स्ट्रॉबेरी वापरली जाते.
स्ट्रॉबेरी वनस्पतीची भुरळ फार प्राचीन काळापासून मानवावर पडलेली आहे. प्राचीन रोममध्ये स्ट्रॉबेरी सौंदर्य, प्रेम आणि प्रजननाच्या देवीचे चिन्ह समजली जात असे. त्याला कारण तिचा लाल रंग आणि हृदया-सारखा आकार हे असावे. मध्ययुगातील दगडांत शिल्पकाम करणारे कारागीर नैतिक दृष्ट्या पूर्णत्व असलेले काम दर्शविण्यासाठी वेदी, चर्च आणि कॅथीड्रल ( मठ ) यांतील कामांत स्ट्रॉबेरीच्या फळाचे उत्कीर्णन किंवा कोरीवकाम करीत असत. स्ट्रॉबेरीचे नाजूक फळ शुद्धता, आवड आणि तब्येतीची सुधारणा करणे आदी वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करते.
वाघ, नितिन भरत
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..